फिल्मी ताऱ्यांचा झगमगाट, कॅमेऱ्याचा चकचकाट, चमचमणारी वस्त्रप्रावरणं, ठेका धरायला लावणारं संगीत आणि रँपवर एकापाठोपाठ एक अवतरणाऱ्या सुंदऱ्या.. गेल्या आठवडय़ात मुंबईतील ग्रँड हयातमधलं वातावरण असं फॅशनमय झालं होतं. अवघ्या फॅशनविश्वाची नजर लागलेला लॅक्मे फॅशन वीक तिथे नुकताच पार पडला. काजोल, जूही चावला, करिष्मा कपूर, सोनाली बेंद्रे, ऊर्मिला मातोंडकर, सोहा अली खान इशा कोप्पीकर या आणि अशा कितीतरी तारका वेगवेगळ्या डिझायनर्ससाठी रँपवर उतरल्या होत्या.
यंदाच्या फॅशन वीकची सुरुवात मनीष मल्होत्राच्या ‘फॅशन शो’नं झाली. भारतीय परंपरा, संस्कृती आणि त्यातील रंग वापरून त्याला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न मनीषच्या ‘रिफ्लेक्शन’ या कलेक्शनमध्ये होता. भारतातला आघाडीचा फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी पाच वर्षांनंतर यंदा पुन्हा एकदा लॅक्मे फॅशन वीकच्या रँपवर आला. त्याच्या ‘शो’नं या फॅशन महोत्सवाची सांगता झाली. या लॅक्मे फॅशन वीक विंटर /फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये भारतीय पारंपरिक पेहरावांना नवीन रूप देण्याबरोबरच ग्लोबल फॅशनचे काही पडसादही दिसले.
परंपरेतून आधुनिकता हेच या वेळच्या फॅशन वीकमधल्या डिझाइन्सचे वैशिष्टय़ जाणवले.  महाराष्ट्र, मणिपूर, बंगाल, काश्मीर, राजस्थान, कच्छ इथल्या पारंपरिक हातमाग आणि कशीदाकारीचा वापर बडय़ा डिझायनर्सनी आपल्या आधुनिक डिझाईन्समध्ये केलेला दिसला.

Story img Loader