|| प्रियांका वाघुले
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून अनेकींवर भुरळ घातलेला आदित्य म्हणजेच ललित प्रभाकर सध्या नाटक-चित्रपट माध्यमांतून आणखी सक्षमतेने वावरतो आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमधून वेगवगेळ्या भूमिका आणि त्यानुसार नवनव्या फिटनेस अवतारांत दिसणारा ललित सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. प्रत्येक चित्रपटातून आपला लुक, देहबोली यातले नावीन्य सहजतेने साकारणारा ललित फिटनेसचे हे अवघड समीकरण प्रत्येक चित्रपटामागे कसे सांभाळत असेल? या प्रश्नावर फिटनेससाठी एकच एक प्रकार नाही तर जे जे आवश्यक आहे ते सबकु छ करणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.
‘चि. व चि. सौ कां.’, ‘तुझं तू माझं मी’, ‘हम्पी’ ते आता प्रदर्शित झालेला ‘आनंदी गोपाळ’ अशा प्रत्येक चित्रपटातील त्याचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याबद्दल बोलताना आपल्या भूमिकांमधून पुरेपूर उतरण्यासाठी मानसिक क्षमता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी असल्याशिवाय कलाकाराला अशा भूमिका साकारणे शक्यच नाही, असे ललित सांगतो. फिटनेसचा विचार करताना शारीरिक समतोल साधणे ही कलाकाराची गरज असते, असे तो म्हणतो. त्यामुळे आवश्यक तसा आणि तेवढा व्यायाम करणे आवश्यक ठरते, पण कलाकार म्हणून जगत असताना परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करून घेण्याची अधिक आवश्यकता असते, असे तो स्पष्ट करतो. कामाच्या लांबलचक वेळा सांभाळताना एकाच पद्धतीने व्यायाम करणे शक्य नसते. त्यामुळे आहे त्या परिस्थितीनुसार फिटनेसचे गणित सांभाळणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.
अनेक तास सलग काम करत असताना व्यायाम करण्याची ताकद उरत नाही. अशा वेळी कलाकारांकडून अनेकदा व्यायाम करणे टाळले जाते, पण अशा परिस्थितीतही व्यायाम करणे शक्य नसले तरी कमीत क मी मेडिटेशन हे केलेच पाहिजे, असे ललित म्हणतो. शरीराची गरज म्हणून व्यायाम करताना त्याचबरोबर स्वत:ला काय आवडते त्या गोष्टी करणे फिटनेसच्या दृष्टीने तितकेच हिताचे असल्याचे ललित सांगतो.
फिटनेससाठी जिम आणि मशीनच्या साहाय्याने अनेकविध प्रकारचे व्यायाम करणे कलाकारांना आवश्यक असते. मात्र इतर वेळी केवळ अशा प्रकारच्या व्यायामाचा विचार न करत राहता सगळ्यात साध्या-सोप्या आणि तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या चालण्याच्या व्यायामावर आपण जोर देत असल्याचे त्याने सांगितले. छोटय़ा-छोटय़ा गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, तेच आपल्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे तो सांगतो. चालणे हे सगळ्यात सोपे आणि कधीही अमलात आणण्याचा प्रकार. त्यातून शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे फायदा होतो. त्यामुळे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा जेव्हा, जिथे शक्य असेल तेव्हा चालणेच फायद्याचे ठरते, असे तो पुन्हा पुन्हा सांगतो.
viva@expressindia.com