हॉस्टेलमधून घरी जाणं खरं तर किती आनंददायी असायला पाहिजे, पण अनेक मित्रमत्रिणींना याचं वाईट वाटतं. अनेकजणांना इथे स्वतचा नव्याने शोध लागलेला असतो. रूमवरची एन्डलेस मजा मिस होणार असते. खूप अॅडजस्टमेंट असूनही हे वातावरण आपलंसं वाटत राहतं आणि मग तिथून पाय निघत नाही, मन तिथेच घुटमळत राहतं.
परीक्षा संपल्या तरी हॉस्टेलला राहणारी मत्रीण म्हणावी तितकी खूश दिसत नव्हती. ‘काय गं घरी जायचा कंटाळा आला वाटतं तुला?’ असं तिला गमतीने म्हणाले. तर त्यावर ती म्हणाली, ‘अगदी खरंय गं.. नाही जावसं वाटत. पण आता परीक्षा संपली म्हणजे रूम खाली करावी लागणार. सुरुवातीला ‘सोय’ वाटणाऱ्या हॉस्टेलची आता ‘सवय’ झालीये.!!’
खरोखरच कॉलेजनिमित्त पुण्या-मुंबईला आलेल्या मुला-मुलींकडे हॉस्टेलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातही सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींचे पालक तर पीजी किंवा रूम घेऊन राहण्यापेक्षा हमखास कॉलेज हॉस्टेलला पसंती देतात. घरापासून नाइलाजाने लांब राहावं लागतं आणि मग बघता बघता हॉस्टेल ‘सेकण्ड होम’ होऊन जातं.
आईबाबांपासून दूर राहताना, गोंधळलेले-घाबरलेले काही जण हॉस्टेलमध्येच घर शोधू लागतात. नवीन रूम पार्टनर, जेवण्यासाठीची मेस, काही हॉस्टेलमध्ये असणारी इनटाइमची डेडलाईन, रविवारी संध्याकाळी मेस बंद असल्यामुळे जेवण्यासाठी हॉटेल शोधणं, घरून मिळालेल्या पॉकेटमनीमध्ये सगळं मॅनेज करणं.. या सगळ्या गोष्टींनी हॉस्टेल लाईफ सुरू होतं. स्वत:ला सांभाळायची ही कसरत नकळत एक ‘लाइफटाइम एक्स्पीरिअन्स’ देऊन जाते.
‘नुकतेच शाळा सोडून कॉलेजमध्ये आलेल्या मित्रमत्रिणींना तर हे असं अचानक आलेलं ‘स्वातंत्र्य’ अंगावरही येतं. पण कालांतराने त्यातली मजा कळू लागते आणि आपल्याच वयाचे बाकीचे मित्रमत्रिणी या स्वातंत्र्याचा ‘स्वैराचार’ होणार नाही याची काळजीही घेतात,’ असं निखिलेशा म्हणते. नंतर नंतर ओळख वाढत जाते. मोठमोठ्ठे ग्रुप्स तयार होतात. आपली रूम सोडून एकाच्याच खोलीत सगळ्यांचा अड्डा जमतो. मिक्स-अप न होणाऱ्या एखाद्याला किंवा एखादीला खुलवण्यासाठीही प्रयत्न होतात. जेवायला जाणं असो किंवा सिनेमा पाहायला जाणं.. भलीमोठी गँगसोबत घेऊन जायची सवय होते.
एकमेकांचे दणक्यात साजरे केलेले बर्थडे, परवानगी नसताना केटलमध्ये केलेली मॅगी आणि कॉफी, घरच्यांची आठवण आल्यावर रडणाऱ्या एखादीला समजावण्यासाठी केलेले एन्टरटेन्मेंट शोज्, परीक्षांच्या काळात डय़ुटी लावून केलेली जागरणं, आजारी असणाऱ्या एखादीच्या उशाशी रात्रभर बसणं, मेसचा कंटाळा आला म्हणून न जेवणाऱ्यांना रागावून-दटावून नेणं..या सगळ्या गोष्टींमधल्या मजेमुळे अगदी वेगळ्याच जगात असल्याचा फील येत राहतो.
हे सगळं कितीही छान वाटत असलं तरी प्रत्यक्ष राहताना काही अडचणीही येतातच. हल्ली रॅगिंगसंदर्भातले नियम आणि कायदे स्ट्रिक्ट झाल्याने रॅिगगचं प्रमाण कमी झालं असलं तरी काही ठिकाणी ज्युनिअर-सीनिअर वाद असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व जबाबदाऱ्या स्वतलाच पार पाडायच्या असतात. ऐश्वर्याच्या मते, ‘सिनेमात जशी छान हॉस्टेल्स आणि रंगतदार हॉस्टेल लाईफ दाखवतात तसं छान आणि आणि गुडीगुडी, सोप्पं नसतं सगळं. प्रचंड प्रमाणात अॅडजस्टमेंट करावी लागते. रूम शेअर करताना सवयी बदलाव्या लागतात. अभ्यास करताना एखाद्याला रात्री अभ्यास करायची सवय असते तर एखादीला मोठय़ाने वाचून..मग आपला एकमेकांबद्दलचा टॉलरन्स वाढतो.’ जेवणापासून ते अॅडमिशनपर्यंत सगळं एकटय़ालाच हँडल करावं लागतं. पण ऋत्विजच्या मते, ‘घरापेक्षा हॉस्टेलमध्ये जास्त शिकायला मिळतं. इथे खरं तर खूप जबाबदाऱ्या असतात. परंतु त्याचं ओझं जाणवत नाही.’
इतकं छान सगळं चालू असतानाच कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा हे सगळं सोडावं लागतं. हॉस्टेलमधून घरी जाणं खरं तर किती आनंददायी असायला पाहिजे. पण अनेक मित्रमत्रिणींना याचं वाईट वाटतं. अनेकजणांना इथे स्वतचा नव्याने शोध लागलेला असतो. रूमवरची एन्डलेस मजा मिस होणार असते. खूप अॅडजस्टमेंट असूनही हे वातावरण आपलंसं वाटत राहतं आणि मग तिथून पाय निघत नाही, मन तिथेच घुटमळत राहतं. कोमल म्हणते, ‘ती वास्तू सोडण्याचं तितकंसं वाईट नाही वाटत, पण माणसं मागे सोडून चाललोय याचं वाटतं. इतका वेळ एकमेकांसोबत जगल्यावर असं झालं नाही तरच नवल. आणि मग सतत तेच तेच आठवत राहतं.’ पण कितीही काही झालं तरी सगळं मागे सोडून पुढे तर जावं लागतंच. कालांतराने या वाईट वाटण्याची तीव्रता कमी होतेही, पण ‘ती’ जागा मात्र आयुष्यभर ‘स्पेशल’ बनून राहते. अनेकांच्या आयुष्यातला ‘सॉफ्ट कॉर्नर’ असते..हॉस्टेल लाइफ!! या छोटय़ाशा छान अशा हॉस्टेलच्या आयुष्यातल्या त्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडताना त्रास तर होणारच. पण काही गोष्टी कायमच आपल्यासोबत राहतात, त्या म्हणजे..असंख्य आठवणी.
हॉस्टेल सोडताना.
हॉस्टेलमधून घरी जाणं खरं तर किती आनंददायी असायला पाहिजे, पण अनेक मित्रमत्रिणींना याचं वाईट वाटतं. अनेकजणांना इथे स्वतचा नव्याने शोध लागलेला असतो. रूमवरची एन्डलेस मजा मिस होणार असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last moment in college hostel