रात्रीच्या वेळी घडय़ाळाचा काटा जसजसा पुढे सरकतो तसतशी नानाविध कारणांसाठी घराबाहेर पडणारी खवय्यांची गर्दी काही अफलातून ठिकाणांची वाट धरते. रात्रीचे हे खाऊकट्टे वेळेपलीकडे जाऊनही खवय्यांची भूक भागवत असतात. साध्या चहापासून ते भुर्जीपाव, इडली-चटणी, पावभाजीसारखे पदार्थ रात्रीच्या भुकेची खबर घेतात आणि रात्री गप्पांचा फड तिथेच जमतो.
गंमत म्हणून केलेलं नाइटआऊट असो किंवा प्रोजेक्टची कामं वा प्रेझेन्टेशन्ससाठी मित्रांसोबत एकत्र केलेली जागरणं असोत, हे खाऊ अड्डे सहसा कोणाला निराश करत नाहीत. रात्रीचा फेव्हरेट मेन्यू असतो भुर्जीपाव आणि पावभाजी. कधी कधी कबाब त्यामध्ये वेगळी रंगत आणतो. हे पदार्थ गाडीवरच झकास मिळतात. मोठय़ा हॉटेल्सची शानशौकत नसली तरीही हातगाडय़ांवरच्या तव्यावर पाणी शिंपडल्यावर होणारा तो ‘चर्र्र्र्र’ असा आवाज आणि तिथे येणाऱ्या पदार्थाचे खमंग वास मॉडर्न क्युझिनलाही मागे टाकतात, असं अनेक खवय्यांचं मत.
मुंबईत कुलाब्याला ताज हॉटेलच्या मागे एका हातात ‘बडेमियाँ’च्या रेशमी, जिभेवर विरघळणाऱ्या कबाबची प्लेट आणि जोडीला रात्रीच्या किंचित थंड वाऱ्याची झुळूक म्हणजे क्या बात! कांदिवली वेस्टला रात्रीच्या वेळी मिळणारी भगवती पावभाजीसुद्धा अशीच ‘फेमस’. तसं बघायला गेलं तर रात्र, निवांत वेळ आणि गरमा गरम चहा हे धम्माल कॉम्बिनेशन. त्यामुळे रात्रभर तशा चहाच्या टपऱ्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतातच. रुग्णालयं, वृत्तमाध्यमांची कार्यालयं यांच्याबाहेर अशा गाडय़ा असणारच. त्यातही मोहम्मद अली रोडला चारमिनार मस्जिद लेनवर रात्रीचा शेवट आणि पहाटेची पुसटशी चाहूल लागताना उघडणारी ठरावीक चहाची दुकानं म्हणजे ‘जन्नत’! रेल्वे स्टेशनही रात्रीच्या खाऊ अड्डय़ांसाठी प्रसिद्ध आहेत. दादर स्टेशनबाहेर मिळणारा तवापुलाव आणि चॉकलेट टी, मालाड – गोरेगाव एक्स्प्रेस वेवर लागणारी भुर्जीपावची गाडी, एल्फिन्स्टन स्टेशनच्या भागात मिळणारा इडली-वडा-सांबार आणि अगदी पहाटे मिळणारे शिरापोहे ही काही ‘ऑन द वे’ असणारी खादाड ठिकाणं. तुमच्याही शहरात, तुमच्या भागात किंवा मित्रमंडळींच्या नजरेत जर असे काही ‘वेळेपलीकडचे खाऊअड्डे’ असतील तर ते लोकसत्ता ‘व्हिवा’सोबत जरूर शेअर करा.
मुंबईतले काही रात्रीचे खाऊअड्डे
* भगवती पावभाजी कांदिवली
* बडेमियाँ कुलाबा
* चॉकलेट चहावाला दादर स्थानकासमोर (प.)
* कलेजी पाव दादर
* फ्रेंच टोस्ट आणि चहा मोहम्मद अली रोड, चारमिनार मस्जिद लेन, मुंबई.
तुमच्या शहरातले, उपनगरातले असे खाऊअड्डे आम्हाला कळवा viva.loksatta@gmail.com या पत्त्यावर.