अमुक एका सोशल नेटवर्किंग साइट किंवा मोबाइल अ‍ॅपची सवय होतेय न होतेय तोवर बाजारात नवीन काही येतं आणि मग त्यात आपण कधी गुरफटून जातो ते कळतच नाही. तीच तर या ई जनरेशनची गंमत आहे.
स्मार्टफोन आणि व्हॉट्सअ‍ॅप ही आताच्या काळातली पॉप्युलर जोडगोळी. चॅटिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्रास वापरले जाते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्हणजे दुसरा कट्टाच! हा हा म्हणता व्हॉट्सअ‍ॅप सर्व स्मार्टफोनधारकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. आता व्हॉट्सअ‍ॅपशिवाय पानच हलत नाही अशी परिस्थिती आहे. तू व्हॉट्सअ‍ॅपवर कशी नाहीस? असं अगदी आश्चर्यानं विचारण्याचे हे दिवस. पण उडती उडती अशी खबर आलीये की परदेशात जसे व्हॉट्सअ‍ॅप चार्जेबल झालेय तसे ते लवकरच आपल्या भारतातही होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपले फ्री मेसेजिंग अ‍ॅप आता पेड होऊ शकतं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप जुनं व्हायची वेळ जवळ आलीय, अशी चर्चा आहे.
व्हॉट्सअ‍ॅप विरुद्ध हाइक
व्हॉट्सअ‍ॅप हे गेल्या वर्षभरात एवढी लोकप्रियता मिळवलेले अ‍ॅप्लिकेशन आहे. आता त्याच्या जोडीला इतरही काही मेसेजिंग अ‍ॅप्स चर्चेत आली आहेत. तरुणाईमध्ये सध्या फिरत असलेलं अ‍ॅप म्हणजे हाइक. हाइक हे सध्याच्या घडीला हिट असून व्हॉट्सअ‍ॅपला उत्तम पर्याय म्हणता येईल असं अ‍ॅप आहे. हाइक अ‍ॅप भारतीय आहे आणि फ्री मेसेजिंग तसंच ऑफलाइन चॅट हे त्याचं वैशिष्टय़ सांगितलं जातं. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड, ब्लॅकबेरी, िवडोज, आयफोन, नोकिया या सर्व फोनना सपोर्ट करतं. व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे हाइकवरसुद्धा ग्रुप चॅट करता येतात. या अ‍ॅपचं वैशिष्टय़ म्हणजे यात संपूर्ण भारतात कुठेही अनलिमिटेड फ्री मेसेज पाठवण्याची सोय आहे. तुमच्या ‘हाइक’वर नसणाऱ्या तसंच स्मार्टफोन वापरत नाहीत अशा मित्रमंडळींशीसुद्धा त्यामुळे तुम्ही बोलू शकता.
प्रायव्हसी हवी
व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपमध्येही अनेक तरुण मुला-मुलींना आणखी प्रायव्हसी फीचर्स हवी असल्याचं त्यांचं मत आहे. ‘हाइक’वरचा हिडन मोड हे आणखी एक तरुणांच्या प्रायव्हसीसाठी उपयुक्त फीचर या अ‍ॅपमध्ये आहे. प्रायव्हेट चॅट हाइड करू शकता म्हणजे सेलफोन कोणाच्याही हाती लागला तरी टेन्शनचं कारण नाही.
तसंच ‘लास्ट सीन’ वेळसुद्धा आपल्या आवडत्या आणि हव्या त्याच लोकांसाठी मर्यादित ठेवता येते. ‘हाइक’च्या माध्यमातून पी.पी.टी., पी.डी.एफ., डॉक फाइल, एमपीथ्री फाइल फॉरवर्ड करणं सहज शक्य होतं. फाइलची मोठी साइज या अ‍ॅपमध्ये अडथळा बनत नाही. ‘व्हॉट्सअ‍ॅप’प्रमाणेच तुम्ही केलेला मेसेज समोरच्याला सेंड झालाय का? तो पोहोचलाय का? इतकेच नव्हे, तर समोरच्याने तो वाचलाय का? हेही समजून येते.
स्माइलीजऐवजी स्टिकर्स
‘हाइक’च्या वापरामध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. त्याचं कारण म्हणजे कलरफुल थीम्स, लार्ज साइज आयकॉन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेसिव्ह स्टिकर्स. इथे स्माइलीजसारखाच स्टिकर्सचा वापर करता येतो. स्नगल्स द डॉग आणि मिली द कॅट ही कुत्रा-मांजराची जोडी स्टिकर्समध्ये धुमाकूळ घालतेय. हाइक भारतीय अ‍ॅप असल्याने स्टिकर्समध्ये ‘बॉलीवूड’लाही स्थान आहे. त्यात दबंग सलमान आणि रजनीकांत भाव खात आहे.
हाइकमध्ये प्रत्येक चॅटसाठी वेगळ्या थीम्स आहेत. तसंच हा अ‍ॅप सातत्याने अपडेट होत आहेच. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपचा वार्षकि रिचार्ज सहज शक्य होईल, पण व्हॉट्सअ‍ॅपने अपडेट व्हावं हीच इच्छा असेल. हाइक युजरची वाढती संख्या, जॉइन हाइक असे येणारे मेसेज आणि नुकत्याच झळकू लागलेल्या अ‍ॅड्सच्या माध्यमातून हाइक जोमानं पुढे येतेय. व्हॉट्सअ‍ॅपवरचे फ्रेण्ड हाइकवर शिफ्ट होऊ लागले आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे कट्टे हाइकवर भरू लागले तर इतर फ्रेण्ड्स तिथे नक्कीच शिफ्ट होतील. कितीही सवय झाली तरी सोय पाहण्याचा सुज्ञपणा आणि नावीन्याची आस तरुणांमध्ये नक्कीच आहे. बदल ही काळाची गरज आहे. जर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सकारात्मकरीत्या बदल दिसून आला नाही तर ‘हाइककरांच्या’ संख्येत वाढ होईलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा