ती गोष्ट आठवत्येय.. पुराणकाळातली.. ध्यासाची.. एकलव्याची.. त्याच्या चिकाटी, निर्धार नि ध्यासानं असंख्यानं स्फूर्ती मिळाली होती. तीच गोष्ट नृत्यनाटिकेच्या माध्यमातून ‘ती’ नि ‘तिच्या’ ग्रुपनं सादर केली होती. त्यांना ‘बेस्ट बॅले’चं अ‍ॅवॉर्ड मिळालं आणि ती अर्जुनाची गोष्ट आठवत्येय.. केवळ पक्षाचा डोळा दिसत्योय, असं सांगणारी.. आता ‘तिला’ही अर्जुनाप्रमाणं ध्यास लागलाय नृत्याचा.. नृत्याच्या साधनेचा.. ती आहे केतकी देऊस्कर! ती ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’त टी.वाय.बी.ए.ला असून तिनं पूर्ण संस्कृत घेतलंय. तिला मुळातच संस्कृत आणि मायथॉलॉजी जाणून घ्यायची आवड आहे. पुढं ती भरतनाटय़ममध्येच करिअर करणार असून संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचा नृत्यकलेशी संबंधित विविध गोष्टी, कथास्तोत्रं संस्कृतात असल्यानं ती समजून घेऊन नृत्य करताना नि बसवताना उपयोग होतो. शिवाय ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’मध्ये पाचवीपासूनच तिला संस्कृत विषय होता. तिच्या आई-वडिलांनाही संस्कृतची आवड आहे. त्यामुळं तिनं संस्कृत विषयच घेतलाय.
तिला शालेय स्पर्धासह विविध कार्यक्रमांत नृत्य करण्याची लहानपणापासूनच आवड होती. तिच्या आईलाही नृत्याची आवड असल्यानं त्यांनी केतकीला सतत प्रोत्साहन दिलं. पुढं तिनं शास्त्रीय नृत्याचं रीतसर शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आपोआप अंगवळणी पडणारी शिस्त आणि व्यवस्थितपणा तिला आवडून नृत्यात अधिकच रस वाटू लागला. दहावीनंतर पालकांसोबत तिनं नृत्यातील करिअरविषयक दिशा ठरवण्यासाठी गुरुंशी संवाद साधला. तेव्हा ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’मध्ये जाण्याआधी ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं ठरलं.
कुणी मुळातच नृत्य शिकलं नसल्यास ‘नालंदा’त फाऊंडेशन कोर्स करून नृत्यातली मुळाक्षरं गिरवता येतात. ‘नालंदा’शी संलग्न संस्थेतून डिप्लोमा कोर्स केला असल्यास परीक्षा देऊन अ‍ॅडमिशन मिळू शकते. येथील बॅचलर इन फाइन आर्ट्स आणि मास्टर्स इन फाइन आर्ट्स हे कोस्रेस ‘मुंबई विद्यापीठा’शी संलग्न असल्यानं ‘मुंबई विद्यापीठा’चं सर्टििफकेट मिळतं. शाळेच्या गॅदिरगमध्ये वगरे ती लोकनृत्यात वगरे सहभागी व्हायची. शाळेतर्फे तिनं नॅशनल लेव्हलच्या ग्रुप डान्समध्येही भाग घेतला होता. सातवीपासून तिनं शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. आपल्या आवडत्या नृत्यप्रकाराविषयी ती सांगते की, ‘भरतनाटय़म् हा सर्वात पुरातन नृत्यप्रकार असून, त्याच्या प्राचीनत्वाचे पुरावे शिल्पकलेतून, प्राचीन वाङ्मयातून नि इतिहासातून मिळतात. ते तामिळनाडूमध्ये उगम पावलं व त्याचं जतन आणि जोपासना देवदासींनी केली, म्हणून त्यास ‘दासीआट्टम्’ असंही म्हणतात. पुढं अधिक संशोधन नि अभ्यास झाल्यानं ते आपल्यापर्यंत पोहचू शकलं. यात नृत्य या घटकाला अधिक प्राधान्य आहे. अलारिपू, जतिस्वरम्, शब्दम्, वर्णम्, पदम्, जावळी, तिल् लाना इत्यादी नृत्यप्रकार या शैलीतील आहेत.
गेल्या सात वर्षांच्या नृत्यशिक्षणात तिला ‘ए’ ग्रेड मिळाल्येय. पाचव्या वर्षांला शिकत असताना नृत्यातच करिअर करण्याविषयी तिचं गुरूंशी बोलणं झालं. त्यांनी तिला शिकवण्याविषयी विचारलं. तिच्या होकारावर त्या म्हणाल्या की, ‘तू शिकवशील, तशा हळूहळू नृत्यातल्या डिटेल गोष्टी कळतील. समोरच्यांना शिकताना बघून आपल्याला आपल्या चुका टाळता येतील.’ केतकीनं आधी बेसिक लेव्हलच्या मुलींना गुरूंसमोर शिकवायला सुरुवात केली. हळूहळू तिच्याकडं काही बॅचेसची जबाबदारी आली. आता बेसिक ते चौथ्या वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तिला चांगलं वाटतं. ती सांगते की, ‘त्यांची’ ताई होणं, मला खूप आवडतं. या लहान मुलींना शिकवण्याचा फायदा म्हणजे आता मी अ‍ॅडव्हान्स लेव्हल शिकताना आधी शिकलेल्या गोष्टी एरवी विसरायला झाल्या असत्या, आता त्यांची उजळणी होते. माझ्या गुरू वृषाली पाटकर-ठाकूर यांनी बी.कॉम केलं असून त्यांनी ‘नालंदा’त फाऊंडेशन, बॅचलर आणि मास्टर्स पूर्ण केलंय. त्यांच्या बॅचला त्या प्रत्येक वर्षी पहिल्या यायच्या. त्यांना स्कॉलरशिपही मिळाली होती. त्यांनी १० वर्षांपूर्वी पनवेलमधील भरतनाटय़म्च्या नृत्यसाधकांसाठी ‘कलाश्रुत अ‍ॅकॅडमी ऑफ परफॉरिमग आर्ट्स’ या संस्थेची स्थापना केली असून आता ठाण्यालाही बॅचेस चालतात. आम्ही गुरूंना ‘ताई’ म्हणतो.’
संस्थेतील सहाव्या वर्षांच्या आठ जणींनी गोव्याला म्हाळसा देवीसमोर कोजागिरी उत्सवात रात्रभर नृत्यप्रकार सादर केले होते. तो केतकीसाठी खूपच छान आणि वेगळा अनुभव होता.. मंदिराच्या गाभाऱ्यात नृत्य करताना देवीचं दर्शन होत होतं. रात्रभराच्या सादरीकरणानंतर थकव्याचा लवलेशही नव्हता, उलट अतिशय प्रफुल्लित वाटत होतं. खूप एनर्जी मिळाल्यासारखी वाटली. छान रिफ्रेिशग वाटलं. सध्या केतकी इयत्ता तिसरी, चौथी, पाचवीच्या मुलींना नृत्याच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षांसाठी शिकवत्येय. त्यात प्रॉपर शास्त्रीय नृत्य शिकवलं जातं. त्यापकी नृत्य म्हणजे शास्त्रीय नृत्याच्या स्टेप्स असतात. त्या दिसायला छान दिसतात. तर अभिनय म्हणजे नृत्य अधिक अभिनय होय. त्यातून काही अर्थही सांगितला जातो.
केतकी म्हणते की, ‘क्लासमध्ये मुख्यत: गुजराती मुली येतात. नृत्य शिकवताना पटकन एखादी म्हण तोंडी आली तर मुली गोंधळून विचारतात, ‘दीदी, इसका मतलब क्या है?’ मग त्यांना त्या म्हणीचा अर्थ िहदी-इंग्लिशमध्ये समजावा लागतो. आमच्या संस्थेतल्या सीनियर्सचा कार्यक्रम बघायला ज्युनियर्सनी जायची पद्धत आहे. त्यातून खूप काही शिकायला मिळतं. कार्यक्रम बघितल्यावर त्याविषयी मुलींनी लिहून आणायचं असतं. मात्र एखाद्या सादरीकरणातला तात्त्विक अर्थ न कळल्यानं मुली ‘दीदी, ये डान्स हमें पसंद नही आया,’ असं निरागसपणं म्हणतात. मग वाटतं, त्यांच्या वयाला हे कसं काय समजावायचं ?..’
अलीकडंच ताईंनी मुलींकडून एक अ‍ॅक्टिव्हिटी करून घेतली. अ‍ॅडव्हान्स लेव्हलच्या मुलींसह ज्युनिअर्सना सामावून घेऊन एकूण पंधरा जणींचे चार गट करण्यात आले. विविध कथांवर आधारित वीस मिनिटांची नृत्यनाटिका सादर करणासाठी लागणारे म्युझिक पीसेस, कॉस्च्युम, कोरिओग्राफी हे सगळं मुलींनीच ठरवायचं होतं. तयारीसाठी महिन्याभराचा कालावधी देण्यात आला होता. केतकी नि तिच्या मत्रिणीनं लीड करून सादर केलेल्या ‘एकलव्य’च्या गोष्टीला ‘बेस्ट बेले’चं अ‍ॅवॉर्ड मिळालं. या स्पध्रेमुळं ग्रुपमध्ये नकारात्मक भावनेचा लवलेशही नव्हता. उलट एकीच्या बळाचं महत्त्व अधोरेखित झालं.
अकरावीत असताना दादरला फुलवा खामकर यांच्या डान्स क्लासला ती जात होती. त्या सुमारास शिवाजी पार्कवरील पंडित जसराज यांच्या कॉन्सर्टमध्ये १५ मिनिटांचा डान्स परफॉर्मन्स तिनं केला होता. मात्र दर शनिवारी पनवेलहून दादरला येणं, अभ्यासला वेळ देणं आदींचं गणित न जमल्याने हा क्लास तिनं सोडला. आता ‘कलाश्रुत’मधल्या मत्रिणींसोबत एन.सी.पी.ए., चेंबूर फाइन आर्ट, चेंबूरचं नटराज मंदिर आदी ठिकाणी होणाऱ्या नृत्याचे कार्यक्रम बघायला ती आर्वजून जाते. त्यातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
केतकी म्हणते की, ‘या सगळ्या धावपळीत अभ्यासाचं गणित सहज जमून गेलं. आम्हाला क्रेडिट सिस्टीम आहे. माझ्या गुरूंनी खूप अ‍ॅडजेस्ट केलं. माझ्या प्रोजेक्ट नि अभ्यासासाठी आवश्यक तो वेळ त्यांनी अ‍ॅडजस्ट केला. घरच्यांनीही कधी वेळेचं दडपण आणलं नाही. अभ्यास नि डान्स क्लासच्या शेडय़ुलमुळं माझं अभ्यासाकडं कधीही दुर्लक्ष झालेलं नाही. चांगल्या ग्रेड्स मिळतायत. कॉलेजच्या ग्रुपमधल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटिज चालू असल्यामुळं सगळ्यांच्या सोईनुसार एकत्र जमून आम्ही एन्जॉय करतो. घरून १०० टक्के सपोर्ट आहे. रोज कॉलेज क्लासमधून आल्यावर नि वीकएण्डला आई-बाबांशी गप्पा होतात. मी खूप वाचत नसले तरी मला वाचनाची आवड आहे. मला नवीन पदार्थ ट्राय करायला नि करून बघायला आवडतात. मला गाणी ऐकायला नि सिनेमा बघायलाही आवडतं.
आता नृत्य शिकायचंय किंवा शिकवायचंय, असं काही तिला मनाशी ठरवावं लागत नाही. ती एकाग्रता आपसूकच साधली जाते. ‘नालंदा’तील अभ्यासक्रमानंतर काय करायचं, याचा अजून विचार केलेला नाही. पण ताईच्याच हाताखाली काम करायचं तिच्या मनाशी आहे. शिवाय मॅन्युस्क्रिप्ट, मायथॉलॉजीसारखे कोर्स करण्याचाही विचार आहे. मायथॉलॉजीमधलं तिचं ऑलटाइम फेव्हरेट कॅरेक्टर आहे श्रीकृष्ण! त्याच्या संदर्भातली बरीच माहिती तिनं गोळा केल्येय. तिच्या सध्याच्या आवडत्या व्यक्तिरेखा ‘देवों के देव महादेव’ नि ‘शिवा ट्रायोलॉजी’मुळं शंकर-पार्वती आहेत. तिच्या या आवडत्या व्यक्तिरेखांचे आशीर्वाद तिला लाभोत. मेहनती, ध्येयासक्त नि नृत्याच्या ऊर्जेनं भारलेल्या केतकीला पुढच्या यशस्वी करिअरसाठी खूप शुभेच्छा!

लर्न अ‍ॅण्ड अर्न या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरुणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.

Story img Loader