नवीन वर्षांचा पहिला आठवडा संपला, तरी अनेक जण अजूनही नववर्ष स्वागताच्या धुंदीत, उत्साहात आहेत. सोशल मीडियावर अजूनही न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो अपलोड होताहेत. त्यातलं हे हटके सेलिब्रेशन.
एक समाजभान जपणारा
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनच्या भाऊगर्दीत काही तरुणांनी याच सोशल मीडियाचा वापर करून एक खरोखर हटके प्लॅन केला होता. त्याचं नाव होतं ‘अ कप ऑफ स्माइल’. मुंबईच्या एच.आर. महाविद्यालयात शिकणारी ज्ञानेश्वरी वेलणकर हिची ही आयडिया. नेमकं काय करायचं हे ठरल्यावर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून दोस्तमंडळींना ऑनलाइन आवाहन करण्यात आलं. नववर्षांचं स्वागत सेलिब्रेशनने करत असताना आपली पार्टी निर्विघ्न व्हावी, आपण सुरक्षित राहावं यासाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून काम करणाऱ्या पोलीस दलासाठी काही तरी करायचं या ग्रुपनं ठरवलं. किमान कपभर चहा पाजून त्यांना ताजतवानं करावं आणि आम्हालासुद्धा तुमची काळजी आहे, ही जाणीव त्यांना करून द्यावी, हे एकमताने ठरलं आणि ‘अ कप ऑफ स्माइल’चा प्लॅन ठरला.
३१ डिसेंबरच्या रात्री सर्वात जास्त पोलीस तैनात असतात मरिन ड्राइव्ह परिसरात. याच परिसरात गिरगाव चौपाटीवरून रात्री १० वाजता या मंडळींना आपल्या या उपक्रमाला सुरुवात केली. ‘सहाशेहून अधिक पोलिसांना चहा पाजून त्यांच्या चेहऱ्यावर ‘स्माइल’ खुलवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं,’ असं ज्ञानेश्वरी सांगते. आपल्या पॉकेटमनीमधूनच या उपक्रमाचा खर्च सर्वानी उभा केला. समाजभान राखणाऱ्या या तरुणाईच्या उपक्रमशीलतेला सलाम!

Story img Loader