वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

बाय, टाटा, अच्छा, येतो, निघतो, भेटू परत..अशा शब्दांनी निरोप घेण्याची पद्धत कधी काळी अस्तित्वात होती. ज्यांचा निरोप घेतोय ते जर वडीलधारे असतील, मानाने मोठे असतील तर त्यांना नमस्कार करून, त्यांचा आशीर्वाद घेऊन निरोप घेतला जात असे. नंतर जशा पद्धती पुढारत गेल्या आणि नात्यांमधलं अंतर कमी होऊन जवळीक वाढायला लागली तसं गळाभेटी घेऊन निरोप द्यायला सुरुवात झाली. ‘निरोप घेणं’ किंवा कोणाला तरी ‘निरोप देणं’ यातल्या दुरावण्याच्या भावनेशी आताच्या तरुणाईचा फारसा परिचय नाही. हा विरह कमी करण्यासाठी फोनपासून ते व्हिडीओ कॉलपर्यंत सगळ्या तंत्रज्ञानाने प्रयत्न केले. त्यामुळे माणूस अगदीच दुरावत नाही हे खरं असलं तरी तो लांब आहे ही जाणीव मनात राहतेच. काळानुसार माणसांची व्यग्रता वाढत गेली आणि विरहभावना मात्र तशीच राहिली.

स्वत:च्या कामातून मिळालेल्या तुकडय़ा तुकडय़ांतल्या वेळात सोशल मीडियाच्या मदतीने आणि चॅटिंग वगैरे करत आपल्या जवळच्या व्यक्तींशी जोडलेलं राहायचा प्रयत्न आताची तरुणाई धडपडून करत असते. त्या गप्पाटप्पा चालू असतानाच मध्येच काम उद्भवलं तर ‘टेम्पररी’ निरोप घ्यावा लागतो. या टेम्पररी निरोप घेण्याची घाई मात्र इतकी असते की सविस्तर कारणं सांगून मग त्या गप्पाटप्पा सोडून बाहेर पडण्याइतका वेळ मिळत नाही. अशा वेळी शॉर्टफॉम्र्स हा तरुणाईचा आवडता प्रकार परत जागृत होतो. वाट्टेल त्या वाक्यांचे वाट्टेल ते शॉर्टफॉम्र्स करणाऱ्या तरुणाईने ‘टी.टी.वाय.एल.’, ‘बी.आर.बी.’, ‘जी.टी.जी.’ असे काही शब्द मात्र हुकूमी ठेवले आहेत.

‘टी.टी.वाय.एल.’ म्हणजे ‘टॉक टू यू लेटर’, ‘बी.आर.बी.’ म्हणजे ‘बी राइट बॅक’ आणि ‘जी.टी.जी.’ अर्थात ‘गॉट टू गो’ हे चॅटमधून घाईने काढता पाय घेण्यासाठी वापरले जातात. तरुणाई तरी या शॉर्टफॉम्र्सवरून एकमेकांना समजून घेऊ  शकते आणि कोणतेही जास्तीचे प्रश्न न विचारता त्याला ‘इमर्जन्सी’ समजून सोडून देते. फॅमिली ग्रुप्सवर मात्र असे शॉर्टफॉम्र्स टाकून कोणी ऑफलाइन निघून गेलं की उरलेले लोक त्याचा अर्थ लावण्यात आपला सगळा वेळ आणि शक्ती खर्च करतात. ही पद्धत

तरुणाईच्या इतकी अंगवळणी पडली आहे की काही वेळा फोनवर बोलतानासुद्धा पटकन टी.टी.वाय.एल. म्हणून फोन ठेवला जातो.

तरुणाई असो वा मोठी माणसं, परमनंटली बाय-बाय करायची स्टाइल मात्र बदललेली नाही. तेव्हा आपसूकच सायोनारा आणि अलविदाच मनात येतं आणि खरं तर तेच हा कॉलम आज सगळ्या वाचकांना म्हणतो आहे. तेव्हा सगळ्यांना अ‍ॅडव्हान्समध्येच हॅपी न्यू इयर!

 

Story img Loader