गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला, त्यात अतिरेक्यांनी विमान अपहरण करून अमेरिकेचे भूषण मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १,३६८ फूट उंचीच्या गगनचुंबी इमारतींना उडवून दिले. अडीच हजारांहून अधिक नागरिक या हल्ल्यात मारले गेले. अमेरिकेने शंभर मजली इमारतींची पुन्हा उभारणी केली. पण दहशतवाद्यांच्या आधी या इमारतींवर चढाई करून फिलिप पेटिट या धाडसवीराने एक विक्रम केला होता. या इसमाला दोरीवरून चालायचे वेड होते. या इमारती बनत असल्यापासून त्यांच्या गच्च्यांवरून दोर बांधून चालण्याचे त्याचे स्वप्न होते. ७ ऑगस्ट १९७४ साली २०० किलो दोर गुपचूप नेऊन त्याने या इमारतींवरून ४५ मिनिटांचा डोंबारी खेळ केला. दीड हजार फुटांवरून पडण्याची भीती न बाळगता केल्या गेलेल्या या धाडसाच्या क्लिप्स आज उपलब्ध आहेतच. पण ‘मॅन ऑन द वायर’ नावाचा माहितीपट आणि दोन वर्षांपूर्वी आलेला ‘द वॉक’ हा व्यावसायिक सिनेमा पाहता येऊ शकतो. ध्येयाने किंवा विशिष्ट वेडाने झपाटलेल्या माणसांची जगात कमी नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी प्राण पणाला लावणाऱ्यांमध्ये फिलिप पेटिट या वीराचे नाव प्रथम घ्यावे लागेल. या माणसाच्या कैक मुलाखती आणि व्हिडीओज् यूटय़ूबवर पाहायला मिळतात. पेटिटला गुपचूप धाडस करण्याबद्दल अटक झाली. पण त्याच्या कलेचा सन्मान करीत त्याला मुक्तही केले गेले. शिवाय लहान मुलांना खेळ दाखविण्यासाठी त्याला करारबद्धही केले. बुलफायटिंग ही शक्तिदर्शनाची हजारो वर्षे चालत आलेली कला आहे. क्रीडा म्हणून तिची ओळख असली, तरी युरोपातील स्पेन आणि दक्षिण अमेरिकेमध्ये या धाडसी खेळातील कलाबाज्या आपल्याकडे क्रिकेट-फुटबॉल ज्या पद्धतीने पाहतात त्या पद्धतीने बघितल्या जातात. या कला-खेळात मेटाडोर हा बुलफायटर समोर असलेल्या सांडाला नुसता झुंजवतच नाही तर त्याचा खात्माही करतो. या खेळात बुलफायटरला अनेक जखमाही होतात. हा पौरुषी खेळ असल्याचा समज ख्रिस्टिना सांचेझ या तरुणीने पालटून टाकला. स्पेनमधील ही कलाकार पहिली मेटाडोर म्हणून मान्यता मिळविलेली बुलफायटर आहे. तिच्या अनेक लढाया आणि करामती यूटय़ूबवर पाहायला मिळतात. उधळलेल्या बैलाला पळविण्याचा आणि त्याला चकविण्याचा उद्योग दक्षिण अमेरिकेतही खूप प्रसिद्ध आहे. फक्त पुरुषांसाठी असलेल्या या खेळात धाडस पणाला लावून लोक ‘आ बैल मुझे मार’चा धोशा करतात. आता त्यात महिलाही आपला जोश दाखविण्यासाठी पुढे येत आहेत. लोक जखमी होतात. तरीही मैदानात लढण्याचे सामथ्र्य आणि धाडस दाखविणे हे या खेळाचे वैशिष्टय़. यात अनेक विनोदी व्हिडीओज्ही बनविण्यात आले आहेत. बंजी जम्पिंग हा प्रकार न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक पद्धतीने अवतरला. ए. जे. हॅकेट यांच्या नावावर या धाडसउडय़ांचा शोध आहे. सर्व सुरक्षाकवचे बांधून एखाद्या व्यक्तीला अगदी उंचावरून, दरीत, नदीत किंवा घळीत उडी मारण्याची संधी देणाऱ्या या क्रीडा प्रकारातील सर्वात अवघड उडय़ांचे व्हिडीओज् वेगवेगळ्या वेळी नोंदविण्यात आले. या व्हिडीओज्चे एकत्रीकरण नुसते पाहतानाही आपल्याला गरगरायला होते.

दुबईमधील सर्वात उंच इमारतीवरून मारलेल्या उडय़ांचा विक्रमही पाहायलाच हवा. हे उडीवीर त्यांच्या धक्कादायक करामतींनी अंगावर काटा आणतात. यातल्या एखाद्या सेकंदाची चूक जिवावर बेतू शकत असल्याने त्यांच्या नजरेतून उडी पाहताना भीती वाटायला लागते. यातील कित्येक व्हिडीओज् उडी मारताना अंगावर लावलेल्या कॅमेराने टिपले आहेत. त्यामुळे उंचावरून पडत असल्याचा भास आपल्याला स्क्रीनवर काही काळ व्हायला लागतो.

ब्राझीलमध्ये विंगसूट घालून उंच कडय़ांवरून घेण्यात आलेल्या उडय़ा सुंदरपणे चित्रित झाल्या आहेत. पॅरेशूट उघडेस्तोवर निसर्गाच्या अस्पर्शित भागातून फिरण्याचा आनंद घेणाऱ्या लोकांच्या नजरेतून आपल्याला या उडीचा अनुभव मिळतो. अवघड भागातून जाताना कॅमेराने टिपलेली आणि बेतीव नसलेली दृश्ये यातून उपलब्ध होतात. स्केटबोर्डचा आधार घेऊन, स्कूटर वापरून आणि विमानाच्या पंखांवरून लांबवर उडी मारण्याचा विक्रम करणाऱ्या धाडसांच्या चित्रफिती हव्या तितक्या पाहायला मिळतात. लोक हे धाडस का करतात, त्यांना जीव प्यारा नसतो का, हे प्रश्न त्यांचे धाडस पाहिल्यावर पडत नाहीत. जगात नव्वद टक्क्यांहून अधिक नागरिक धाडसविहीन जगणे जगतात. दहा टक्क्यांच्या आसपास असलेल्या या धाडसवीरांच्या चित्रफिती प्रेरणादायी ठरू शकतात.

viva@expressindia.com

Story img Loader