मितेश जोशी
रशियामधील मॉस्को शहरात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एरोबिक्स रशियन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन तरुण चेहऱ्यांनी यशाची मोहोर उमटवली. डोंबिवलीमधील अमेय शिंदे याने दोन सुवर्ण, तर ईश्वरी शिरोडकर हिने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत या क्षेत्रातही अटकेपार झेंडा रोवण्याची भारतीय तरुणाईची क्षमता सिद्ध केली आहे.
ईश्वरीचा भाऊ हा जिम्नॅस्टिक खेळाडू होता. त्याच्याबरोबरीने धाकटी ईश्वरीही जिम्नॅस्टिकला जाऊ लागली. तेव्हा ती साडेतीन वर्षांची होती. ईश्वरी सांगते, कोणत्याही खेळातली स्पर्धा डोळ्यासमोर आणा. झोनलमधून जिल्हास्तरीय स्तरावर, तिथून राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय हा प्रवास ठरलेला असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदा खेळाडू पोहोचला, की त्याला सगळी दारं खुली होतात; पण जिम्नॅस्टिकमध्ये मात्र हा असा आखून दिलेला प्रवास नसतो. खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तरी त्याला पुन्हा एकदा झोनलपासूनच सुरुवात करावी लागते. हा या खेळाचा नियमच आहे, असं ती सांगते. सध्या ईश्वरी बारावीला असल्याने मार्च महिन्यापासून ती सरावाला व पुढच्या स्पर्धाच्या तयारीला लागणार असल्याचे तिने सांगितले.
या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरणाऱ्या अमेयला तर त्याच्या आईवडिलांनी फिटनेसच्या उद्देशानेच जिम्नॅस्टिक प्रशिक्षण सुरू केलं होतं. कारण अमेय मुदतपूर्व बाळंतपणात जन्मलेला होता. त्याच्या जन्मानंतर तो काही दिवसच जगेल, असे सांगितले गेले होते. अथक प्रयत्नांनी तो वाचला. त्यामुळे त्याच्या जन्मानंतर तो धाकड व्हावा या उद्देशाने अमेयचे जिम्नॅस्टिक शिक्षण सुरू झाले होते. आता जिम्नॅस्टिक त्याचा ध्यास झाला आहे. जिम्नॅस्टिक सर्व खेळांची जननी आहे. जिम्नॅस्टिक खेळाडू क्रिकेट, हॉकी खेळू शकतो; पण क्रिकेटपटू जिम्नॅस्टिक खेळू शकत नाही. अथक प्रयत्न व जिद्द यांची पराकाष्ठा म्हणजे जिम्नॅस्टिक होय, असं अमेय सांगतो. गेल्या दोन वर्षांपासून अमेय एरोबिक्स जिम्नॅस्टिक खेळतोय. एरोबिक्स जिम्नॅस्टिक हा जिम्नॅस्टिकचाच एक प्रकार असल्याचे तो सांगतो. परदेशात खेळाला आणि खेळाडूंना खूप महत्त्व दिले जाते. आता आपल्याकडेही हळूहळू सर्वच खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. वेगवेगळ्या खेळांसाठीच्या चषक स्पर्धा आयोजित होतात. त्यामुळे खेळाडूंना वाव मिळतो. बदलत्या काळानुसार खेळात करिअर करण्याबाबतीत विशेषत: एरोबिक्स, जिम्नॅस्टिक खेळाकडेही करिअरच्या दृष्टीने बघितले जाईल, असा विश्वास अमेय व्यक्त करतो. एरोबिक्स रशियन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी या दोघांनी कशी तयारी केली याबाबतीत सांगताना स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस करावा लागला, असं ते सांगतात. ईश्वरीचं बारावीचं वर्ष असूनही तिने छंद आणि अभ्यास या दोघांचाही अचूक मेळ साधला. ईश्वरी, अमेय ज्या बंदिस्त क्रीडागृहात सराव करतात तिथे नेहमीच सोयीसुविधांची बोंब असते, असं ते सांगतात. अनेकदा सरावासाठी अंथरलेली मॅट दुसऱ्या दिवशी सकाळी गायब होते. परदेशात मात्र हे चित्र पाहायला मिळत नाही. तिथे सोयीसुविधांनी युक्त अशी क्रीडागृहे आहेत हा अनुभव सांगतानाच आपल्याकडे मॅटशिवाय सराव करण्याचा प्रकार तिला भलताच तापदायक ठरल्याचेही तिने सांगितले. मॅट नसल्याने सराव करताना तोल जाऊन पडली आणि तिच्या पायाला जबर मार बसला. मात्र तरीही आपला खेळ चांगला व्हावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम केल्याचेही त्यांनी सांगितले.
एरोबिक्स जिम्नॅस्टिकबाबत अनेक गैरसमज आहेत, असंही या दोघांनी सांगितलं. कोलांटय़ा उडय़ा मारणे म्हणजे जिम्नॅस्टिक हाच समज आपल्याकडे आहे; पण या उडय़ा कशाही मारल्या की झालं असं होत नाही. क्रिकेटपटूने षटकार मारला की सगळे आनंदतात. तो कसा मारला याच्याकडे कोणाचं इतकं लक्ष नसतं; परंतु जिम्नॅस्टिकमध्ये जिम्नॅस्टच्या हातापायांच्या स्टेप्सकडे परीक्षकांचं बारीक लक्ष असतं, असं अमेय सांगतो. वयाच्या पाचव्या वर्षांपासून जिम्नॅस्टिकचा कोणताही प्रकार शिकवा, ते वय योग्य असतं, असा सल्लाही त्याने दिला.
एरोबिक्स जिम्नॅस्टिक व एरोबिक्स फिटनेस हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. आज अनेक तरुण मुलं यात गोंधळ घालतात, असं तो म्हणतो; पण एरोबिक्स जिम्नॅस्टिकमध्ये फिटनेसचा, वजन कमी-जास्त करण्याचा काहीही संबंध येत नाही, असे त्याने स्पष्ट केले. एरोबिक्स फिटनेस म्हटलं की तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते; पण उगीचच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडेतिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. हा प्रकार खूप व्यवस्थित आणि विचारपूर्वक ठरवलेल्या ‘स्टेप्स’वर करायचा असतो. रोज तेच तेच करायचा कंटाळा येऊ नये म्हणून सतत वेगवेगळ्या ‘काँबिनेशन्स’मध्ये हालचाली केल्या जातात. त्यामुळे आज एरोबिक्स फिटनेसमध्ये नवीन काय करणार याची उत्सुकता टिकून राहते. आजच्या धावपळीच्या व तणावग्रस्त जगात सर्वानी केवळ मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी एरोबिक्स फिटनेसकडे जरूर वळायला हवे, असे तो आग्रहाने नमूद करतो.