आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजची पिढी वाचन करत नाही. पुस्तकं तर अजिबात वाचत नाही, असं तरुणाईविषयी बोललं जातं. पुस्तकाचा ठोकळा दिसला की, चार पानं वाचायचंही अनेकांच्या जिवावर येतं. अमृत देशमुख या युवकाने आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत, पण स्वत: पुस्तक वाचून तो थांबला नाहीये, ही वाचलेली पुस्तकं बाकीच्या लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवली आहेत. कशी? २३ एप्रिलच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त या अभिनव उपक्रमाची गोष्ट.

अमृत देशमुख. मुंबईचा एक तरुण. व्यवसायाने सी.ए. पण वाचनाची प्रचंड आवड. खरं तर अमृतवर ही वाचनाची सवय लहानपणी तशी लादलीच गेली. होय.. म्हणजे पुस्तकाची गोडी नाही, नुसतं हुंदडायला आवडतं.. असं अमृतच्या घरच्यांनाही वाटत होतंच. अमृतला त्याच्या मोठय़ा भावाने वाचनाची गोडी लावली. अमृतचा वाढदिवस असला की, त्याचा भाऊ  त्याला पुस्तक गिफ्ट द्ययचा. स्वत: तर पुस्तकच गिफ्ट द्यायचा, पण अमृतच्या मित्र-मैत्रिणींना, त्यांच्या पालकांना, नातेवाईकांना त्याला पुस्तकच गिफ्ट द्यायला सांगायचा. हळूहळू पुस्तकांशी त्याची गट्टी जमली, ती कायमची.

एकदा अमृत मित्रासोबत सिनेमा बघायला गेला होता. सिनेमा सुरू व्हायला थोडा अवकाश होता, त्या वेळात काय करायचं म्हणून त्याने नुकताच वाचलेल्या पुस्तकाचा सारांश थोडक्यात सांगितला. त्याला हे असं संक्षेपातलं पुस्तक फार आवडलं. त्यातूनच अमृतला एक कल्पना सुचली. आठवडय़ाला एक पुस्तक वाचायचं आणि त्याचा सारांश सोप्या भाषेत मित्र-मैत्रिणींना पाठवायचा. हे सारांशवाचन सगळ्यांना आवडू लागलं आणि तिथूनच अमृतच्या ‘मेक इंडिया रीड’ या मिशनचा शुभारंभ झाला. त्याच्या मित्रांनी त्याचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला. ज्याला असं संक्षेपात पुस्तक वाचायचं असेल त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर त्या नंबरवर ‘बुकलेट’ असा मेसेज करायचा आणि दर बुधवारी एका नवीन पुस्तकाचा सारांश तुम्हाला वाचायला मिळणार.

या मिशनला एका आठवडय़ात हजार लोकांचा रिस्पॉन्स मिळाला. पुढे तो वाढतच गेला. तीन-चार महिन्यांनी अमृतने एक छोटासा सव्‍‌र्हे केला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की, हा त्याचा सारांशही अनेक जण वाचायला वेळ नाही, असं म्हणत वाचत नाहीत. म्हणजे इच्छा आहे, पण वेळ नाही वगैरे कारणं ऐकू यायला लागली. व्हॉट्सअपवर एवढा मजकूर वाचायचा कंटाळा येतो असा फीडबॅक मिळाल्यावर त्याने नवीन कल्पना राबवली. त्याने  एक मायक्रोफोन विकत घेतला आणि पुस्तकाचा त्यानं तयार केलेला सारांश रेकॉर्ड करून सगळीकडे पाठवू लागला. या कल्पनेला उत्तम प्रतिसाद लाभला. तो लोकांच्या ‘विश लिस्ट’प्रमाणेसुद्धा पुस्तकांचे सारांश पाठवतो. त्याने मागच्या वर्षी जागतिक पुस्तक दिनानामित्त ‘बुकलेट’ नावाचं फ्री मोबाईल अ‍ॅप लाँच केलं. या अमृतच्या उपक्रमात त्याला फरीद सय्यद आणि सुशील धनावडे या दोन मित्रांची साथ लाभली आहे. अमृतच्या ‘मेक इंडिया रीड’ या मिशनला फॉलो करणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात आहे. वर्षअखेपर्यंत ती कोटीपर्यंत जाईल याची खात्री अमृतला आहे.

हातात पुस्तक घेऊन वाचा असा हट्ट नको, टेक्नॉलॉजीचा वापर करून का असेना पुस्तक वाचा, असं माझं मत आहे. आपण तरुण वर्ग व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावरती येणाऱ्या फालतू विनोद आणि चुकीच्या गोष्टी वाचण्यात वेळ घालवतो. त्यापेक्षा चांगल्या पुस्तकातून उत्तम दर्जाचं वाचन करा, असं माझं सांगणं आहे. आपण किती वेळ वाचतो त्यापेक्षा आपण काय वाचतोय हे जास्त महत्त्वाचं आहे.

अमृत देशमुख

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrut deshmukh read more than 700 books