वेदवती चिपळूणकर
कधी काळी फक्त जुळ्या मुलांना सारखे कपडे घालायची पद्धत होती. आईबाबांची हौस म्हणून जुळ्यांना एकसारखं नटवलं जायचं. केवळ कपडे नव्हे तर चपला, केसातल्या पिना, टोप्या असं जमेल ते सगळं ‘मॅचिंग’ करून त्या जुळ्यांना मिरवत त्यांचे पालक बाहेर न्यायचे. लहानपणीचे फोटो बघून मोठेपणी ती जुळी मुलं मग स्वत:लाच हसतात. मात्र आताची तरुणाई हाच सो कॉल्ड ‘वेडेपणा’ स्वत:ही करताना दिसते. आपल्या खास मित्रमैत्रिणींसोबत अगदी एकसारखे कपडे घालून फोटो काढणं, ते सोशल मीडियावर पोस्ट करणं अशा सगळ्या कृती या ‘ट्विनिंग’मध्ये अंतर्भूत आहेत.
केवळ कपडय़ांपासून सुरू झालेलं हे वेड हळूहळू अॅक्सेसरीजपर्यंत पोहोचलं आणि आता तर ते अजूनच वाढत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या दोन मैत्रिणी एकाच वेळी एकच पदार्थ खात असतील तर त्याचाही अंतर्भाव ‘ट्विनिंग’मध्ये होऊ लागला आहे. ज्यांना ‘सख्ख्या मैत्रिणी’ म्हणता येईल अशाच मैत्रिणींची अशी जोडी अनेकदा पाहायला मिळते. आता मैत्रिणीच का? मित्र का नाही?, त्याचं कारण काही ठाऊक नाही, मात्र हा ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यांमध्ये मुलींचीच संख्या तुलनेने प्रचंड दिसून येते. टीशर्ट वगैरे तर एकसारखे सहज मिळून जातात. पण ड्रेसही मुली एकाच ताग्यातले शिवल्यासारखे ‘डिट्टो’ घालतात, फोटो काढतात आणि मिरवतातही!
कॉलेजमध्ये वेगवेगळे ‘डे’ज साजरे करण्याची प्रथा-परंपरा आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे असलेल्या प्रथा-परंपरांमध्ये आपण नेहमीच आपल्या अकलेने काही ना काही भर घालत असतो. तशीच भर इथेही घालून ट्रॅडिशनल डे, साडी डे, टाय डे, इत्यादींसोबतच ‘ट्विनिंग डे’ असाही खास दिवस आजकाल अनेक कॉलेजेसनी सुरू केला आहे. सेम टीशर्ट्सवर अगदी सेम हेअरस्टाइलसुद्धा मुली करतात. कॉलेजमध्ये मात्र बऱ्यापैकी मुलांची संख्याही यात सामील झालेली दिसते. आता ट्रेण्डच आहे म्हणून सगळे करतात म्हणा, पण असे एकाच ताग्यातील दिसणारे कपडे घातलेल्यांना कधी काळी लोक ‘बॅण्डवाले’ म्हणत एवढं आपण लक्षात ठेवू या म्हणजे झालं!
viva@expressindia.com