वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शॉवर हा खूप साधा आणि सामान्य इंग्रजी शब्द आहे. कधी काळी शॉवर हे अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या, ‘पाण्याचा वर्षांव’ करणाऱ्या एका साधनाला म्हटलं जात असे. टू शॉवर हे एक क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ ‘वर्षांव’ करणं. वर्षांव कसला असला पाहिजे असं काही बंधन याच्या अर्थाला तरी नाही. या शॉवरच्या सध्याच्या कल्पनेत मात्र काही विशिष्ट गोष्टींचा अंतर्भाव होतो जसं की गिफ्ट्स, ड्रिंक्स, फुलं, वगैरे वगैरे. सामान्यत: शॉवर हा मुलीचा केला जातो. एक तर तो ब्रायडल शॉवर असतो किंवा बेबी शॉवर. या दोन्ही संकल्पना तशा परदेशीच पण आता अनेकांनी त्या अगदी आपल्यात मिसळून घेतल्या आहेत.

ब्रायडल शॉवर हा जनरली ‘ब्राइड टू बी’च्या मैत्रिणींकडून आयोजित केला जातो, प्लॅन केला जातो. मैत्रिणी, बहिणी आणि जवळच्या नातेवाईकांपैकी फक्त बायका अशा मिळून हा ब्रायडल शॉवर घडवून आणतात. नवऱ्या मुलीची सगळी कौतुकं त्या दिवशी केली जातात. तिच्या आवडीच्या फ्लेवरचा केक आणि तिला आवडणारी ड्रिंक्स आणि स्नॅक्स या प्रमुख गोष्टी. तिला आवडेल अशा एखाद्या थीमने सगळी सजावट केली जाते आणि त्याच थीमला अनुसरून आऊ टफिट्सचाही विचार केला जातो. ‘ब्राइड टू बी’ला ती सगळ्यांमध्ये उठून दिसेल अशा रीतीने तयार केलं जातं. ब्रायडल शॉवर एखाद्या थीम पार्टीप्रमाणे प्लॅन केला जातो. ‘ब्राइड टू बी’ची प्लॅकार्ड्स, वेगवेगळ्या इमोजीची प्लॅकार्ड्स, मास्क्स, फुगे, वेगवेगळ्या प्रॉप्स अशा सगळ्याची अरेंजमेंट केली जाते आणि त्यासाठी फोटो बूथही उभारला जातो. प्रोफेशनल फोटोग्राफर्स यासाठी बोलावले जातात. एकंदरीत बऱ्यापैकी खर्च करून इंग्रजी सिरियलमध्ये शोभेल असा ‘प्री-वेडिंग’ सोहळा केला जातो.

काहीशी हीच पद्धत बेबी शॉवरच्या वेळीही वापरली जाते. मात्र कितीही आवडत असतील तरी कोणतीही हार्ड ड्रिंक्स यावेळी घेतली जात नाहीत. परदेशात अनेक ठिकाणी जन्माच्या आधी बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगितलं जातं. त्यामुळे त्यानुसार हे बेबी शॉवर प्लॅन केले जातात. मुलगी असेल तर अनेकदा गुलाबी रंग किंवा मिनी माऊ स किंवा डिज्नी प्रिन्सेस अशा थीमने आणि मुलगा असेल तर निळा रंग किंवा सुपरहिरो किंवा ट्रान्सफॉर्मर्स वगैरे थीम घेऊ न बेबी शॉवरसाठीची सजावट केली जाते. येणाऱ्या बाळाच्या दृष्टीने गिफ्ट्स दिली जातात. थोडक्यात काय तर ‘मदर टू बी’ची सगळी कौतुकं पुरवली जातात. आपल्याकडे कधीकाळी लग्नाआधी केळवण आणि बाळाच्या जन्माआधी आईचं डोहाळेजेवण ही संकल्पना अस्तित्वात होतीच. त्यांचंच खरं तर हे परदेशी रूप. मात्र हे परदेशी रूप सगळ्यांना जास्त भावत असल्याने शॉवर या शब्दाला अतोनात महत्त्व प्राप्त झालं आहे!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about english word shower