रश्मी वारंग
हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
भारताची ओळख प्राचीन काळापासून विविध गोष्टींशी जोडलेली आहे. त्यातील महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे मसाल्यांचा देश. साऱ्या जगाचं लक्ष या देशाकडे ज्या गोष्टीमुळे वेधलं गेलं ते मसाले इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग! मसाल्यांच्या मिश्रणाने इथे होणारी पाकसिद्धी पाहता मसाल्यांचे ब्रॅण्ड किती महत्त्वाचे आहेत ते ध्यानात यावं. अगदी स्थानिक गिरणीतील मसाल्यांपासून पॅकबंद मसाल्यांपर्यंत इथे अगणित पर्याय आहेत पण यशाचं शिखर सर करणारा महत्त्वपूर्ण ब्रॅण्ड म्हणजे एव्हरेस्ट. याच ब्रॅण्डची ही कहाणी!
वाडीलाल शहा यांचं मुंबईत छोटंसं म्हणजे अगदी २०० चौरस फुटाचं दुकान होतं. दुकानदार वाडीलाल स्वातंत्र्यपूर्व काळात वावरत होते तरी देशाला स्वातंत्र्य मिळालं की भविष्यात होणाऱ्या बदलांचा त्यांना उत्तम अंदाज होता. त्याच अंदाजानुसार मसाल्यांचा व्यापार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
भारतासारख्या देशात त्या काळी मसाल्यांचा व्यापार प्रांतागणिक होई. एक तर वर्षभराचा मसाला घरगुती पद्धतीने तयार होत असे. ‘रेडीमेड’युग तोवर अवतरलेलं नव्हतं. शिवाय विशिष्ट प्रांतातील पदार्थासाठी विशिष्ट मसाले हे गणित पक्कं होतं. आज जितक्या सहजपणे पंजाबी घरात इडली बनते आणि सांबार मसाला आणला जातो किंवा दाक्षिणात्य घरात छोले बनवण्यासाठी छोले मसाला लागतो तितकी प्रांताप्रांतातील पदार्थाची देवाणघेवाण वाढलेली नव्हती. बाहेरून विकतचे मसाले ही कल्पनाही पचनी पडणारी गोष्ट नव्हती. अशा काळात वाडीलाल यांनी सगळ्या भारतभरासाठी प्रमाणित मसाले बनवण्याचं स्वप्न पाहणं तसं धाडसाचं होतं. वाडीलाल यांनी अतिशय परिश्रम घेऊन, अभ्यासपूर्वक मसाल्यातील घटकांचं प्रमाण निश्चित करून हा ब्रॅण्ड बाजारात आणला आणि त्याला नाव दिलं एव्हरेस्ट!
सर्वात आधी मुंबईत एव्हरेस्ट ब्रॅण्डचे तीन मसाले ग्राहकांसमोर ठेवले गेले. त्यात गरम मसाला, चहा मसाला आणि केशरी दूध मसाला यांचा समावेश होता. त्या तिन्ही मसाल्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातून प्रेरणा घेऊन विविध मसाले जसं की, सांबार मसाला, छोले मसाला, सब्जी मसाला, पुलाव बिर्याणी मसाला, चिकन मसाला असे विविध स्वाद वाढत गेले. यामागे वाडीलाल यांनी एक तंत्र आवर्जून पाळलं. ज्या प्रांतातील मसाला असेल त्याच प्रांतातून गोळा केलेले घटक मसाल्यासाठी वापरायचे. यामुळे त्या प्रांताचा स्वाद तो पदार्थ धारण करू लागला. याशिवाय साधारणपणे भारतात सर्वत्र सामाईक असणारे लाल मिरचीचे तीन स्वाद काश्मिरी लाल, तिखालाल आणि कुटीलाल कायम ठेवण्यात आले. वर्षभराचा मसाला घरी कुटणाऱ्या महिलावर्गाने या मसाल्यांना भरघोस प्रतिसाद दिला.
छोटय़ा पाकिटात मसाले विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा पहिला मान एव्हरेस्टला जातो. या गोष्टी वरकरणी छोटय़ा वाटल्या तरी त्यामुळे भारतीय स्वयंपाकघर आमूलाग्र बदललं. दुसऱ्या प्रांतातील पदार्थाचा प्रयोग करून पाहण्यासाठी लागणारे मसाले छोटय़ा पाकिटात उपलब्ध झाल्याने प्रांतांच्या सीमारेषा ओलांडत हे पदार्थ नियमितपणे स्वयंपाकघरात तयार होऊ लागले.
आज एव्हरेस्ट हा भारतातील क्रमांक एकचा मसाला ब्रॅण्ड आहे. या मसाल्याचे ४५ विविध स्वाद २० लाखांहून अधिक भारतीय घरात पोहोचले आहेत. हजारभर शहरात या मसाल्यांचा स्वाद दरवळतोय. केवळ भारतातच नाही तर मध्य पूर्व देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आफ्रिका, अमेरिकेतही हे मसाले पोहोचले आहेत.
या ब्रॅण्डने मसाल्यांसारख्या गृहकृत्य वर्गातील पदार्थाला रेडीमेड वर्गात आणून बसवलं. अनेक यशस्वी पाककृतींच्या मागे त्या सुगरणीचं मसाल्यांचं खास गुपित असतं. त्यामुळे तो पदार्थ अनोखा किंवा खासमखास स्वाद घेऊन अवतरतो हे गणित लक्षात घेऊन एव्हरेस्टने आपली टॅग लाइन अतिशय हुशारीने आखली. आईच्या हातची चव हा सगळ्यांच्याच मनाचा हळवा कोपरा हे जाणून हा ब्रॅण्ड म्हणतो, ‘जो खाने को बनाए माँ के हात का खाना’ किंवा ‘टेस्ट में बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट.’ यात स्वत:कडे घेतलेला विनम्र उणेपणा मनाला भावतो.
२००३/२००६/२००९/२०१५ अशा विविध वर्षांत हा ब्रॅण्ड सुपरब्रॅण्ड म्हणून नावाजला गेला आहे. पण त्याहीपेक्षा स्वयंपाकघरातलं त्याचं अढळ स्थान दखल घेण्याजोगं आहे. अनेक भारतीय घरात एव्हरेस्ट मसाल्याचं एखादं तरी पाकीट तर असतंच. हेच या ब्रॅण्डच्या यशस्वी असण्याचं उदाहरण म्हणता येईल.
पदार्थ छान होण्यासाठी काय लागतं? तर मसाल्यांचं अचूक मिश्रण आणि करणाऱ्याने त्यात ओतलेलं मन. तुम्ही फक्त मन ओतून तो पदार्थ बनवा, स्वादिष्ट चवीचं शिखर गाठायला एव्हरेस्ट आहेच सोबतीला!
viva@expressindia.com