पंकज भोसले – viva@expressindia.com
नव्वदीच्या दशकांतील अखेरच्या वर्षांपर्यंत राज्यातील दुर्गम भागातील गावांप्रमाणेच मुंबई-पुण्यातील घरांमधील पहाट रेडियोवरच्या भक्तीगीतांनी व्हायची त्यामुळे सारखीच असायची. ‘सगुण-निर्गुण’ भक्तीरसपूर्ण संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीवर अद्यापही सुरू असला, तरी रेडिओवर ती वेळ साधत ऐकणारा शहरीवर्ग आज पूर्वीइतका खचितच नाही. पहाटेच्या वेळा निद्रेत अथवा जिम, वॉकमध्ये घालविणाऱ्या शहरी वेगवेडय़ांना रेडिओवरील भक्तीस्वरांचा आस्वाद घेता येणे अवघड झाले आहे. ही अशी एक शांत वेळ आहे ज्यात मशिदीतील अजान वा मंदिरातील भजनातही स्वरसौंदर्य सापडू शकते. मात्र कॉलसेंटर्स आणि इतर सेवाक्षेत्रातील शिफ्ट्सनी शहरांतील कालचक्रच बिघडवून टाकले. परिणामी पूर्वी दिवसात सकाळ आणि संध्याकाळी सुरू असणाऱ्या व्यायामशाळा दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत उघडय़ा राहू लागल्या.
या व्यायामशाळांच्या आर्थिक वकुबानुसार त्यांमध्ये गाण्यांचा वापर असतो. महागडय़ा व्यायामशाळांमध्ये इंग्रजी गाण्यांचा किंवा एफएमच्या गाण्यांचा मारा असतो. तर काही हनुमानभरोसे व्यायामशाळांमध्ये बॉलीवूड गाण्यांचा वाटेल तसा मारा असतो. या गाण्यांनी व्यायाम करण्याच्या प्रक्रियेला स्फूर्ती मिळावी, असा हेतू वगैरे काही नसतो. हाती लागतील त्या गाण्यांवर सूर्यनमस्कारापासून विविध वजनांच्या पुलीजवर घाम काढण्याचा प्रकार सुरू असतो. मोबाइल आल्यानंतर चालत संगीत ऐकण्यासाठीचा वॉकमन कालबाह्य़ झाला. आता पहाटे चालण्याचा व्यायाम करणाऱ्या बहुतांश आबालवृद्धांच्या हाती मोबाइलमधील प्ले लिस्ट असते. दिनक्रमानुसार झालेल्या पहाटे चालणारा, धावणारा किंवा व्यायाम करणारा संगीतहौशी आपल्या कानवकुबाप्रमाणे आपली स्वरप्रभात साजरी करीत असतो. त्यात कुणाला किती वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आवडू शकेल याचा नियम नाही. धावताना कुणाला किशोर-रफी-मुकेश-लता-आशा यांची गाजलेली आणि नंतर अंताक्षरी, आयडॉल स्पर्धामधून चावून चोथा केलेली गाणी आवडू शकतात. तर कुणी वाद्यसंगीताला कवटाळू शकतो. कुणाला ताज्या बॉलीवूडमधील अर्जित सिंग यांचा प्रेमार्क भावू शकतो, तर कुणाला कोक स्टुडिओत तयार झालेली गाण्यांची नवी व्हर्जन्स पकडून ठेवू शकतात.
रागदारी संगीताचा उत्तम आस्वाद घेण्यासाठी जसा दरेक रागाचा काळ असतो, तोच नियम लोकप्रिय संगीतासाठी लावला तरी चालू शकतोच. व्यायामशाळेत अथवा पहाटकाळी धावण्यासाठी कुणी काय ऐकावे याचा नियम नसताना, जुळवलेल्या आजच्या प्रभातगाण्यांच्या विषयामध्ये नेहमीपेक्षा वेगळे संगीत ऐकूयात. सोकोलोम हा हंगेरी-रोमानिया राष्ट्रांमधील लोकसंगीत वाजविणारा जिप्सी बॅण्ड आहे. व्हायोलिन आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या आधारे बनविलेली त्यांची गाणी त्यांच्या लोकभाषेतील असली, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. ‘एव्हरीथिंग इज इल्युमिनिटेड’ नावाच्या अमेरिकी चित्रपटात या बॅण्डचे वापरलेले ‘आमरी सी आमारी’ हे गाणे प्रवासात किंवा व्यायामासाठी चालताना आवर्जून ऐकत राहावे. गाण्यातील शब्द कळाले नाही, तरी संगीताचा आणि चालीचा प्रभाव खूप काळ आपल्या मनावरून पुसता येणार नाही. हे भक्तीगीत नाही, कुणा एका सासूने आपल्या सुनेवर लिहिलेले गाणे आहे (गाण्यातील शब्दांचा इंग्रजी अनुवाद सहज उपलब्ध आहे.). पण शब्दांची माहिती नसली, तरी आपली सकाळ सुंदर करण्यात हे गाणे उपयुक्त ठरू शकते. कोअर्स भगिनी आणि त्यांचा एक भाऊ यांनी जगभरामध्ये पॉपस्टार्स म्हणून आपली ओळख निर्माण केल्यानंतर सर्वात पहिले काय केले असेल तर आयरिश लोक संगीतातील सर्वोत्तम आपल्या लाइव्ह कन्सर्ट्समधून वाजवायला सुरुवात केली. त्यांचे जॉय ऑफ लाइफ किंवा वेडिंग साँग पुन:पुन्हा ऐकत राहण्यासाठी दिवसातील कोणतीही वेळ उत्तम असली, तरी सकाळी ही वाद्यगाणी मनाला भरीव खाद्यपुरवठा ठरू शकतात. शिटीहून थोडी वरची पट्टी घेणारी टीन व्हिसल हा बासरी, व्हायोलिन आणि आयरिश डफ यांच्या आधारावर या तिघी बहिणींनी मांडलेला स्वरखेळ थक्क करून टाकणारा आहे. या परभूमीतल्या संगीत आकर्षणाइतकेच भारतीय कलाकारांनी करून ठेवलेले काम थोर आहे. इंडस क्रीड हा भारतात ऐंशीच्या दशकात स्थापन झालेला पहिला प्रसिद्ध बॅण्ड. एमटीव्हीच्या आधी प्रचंड काळापुढे असलेल्या या बॅण्डने अत्यंत शुद्ध आणि श्रवणीय संगीताची निर्मिती केली. या बॅण्डचे ‘प्रीटी चाईल्ड’ हे गाणे नव्वदीतले भारतीय सुपरहिट गाणे होते. जे इतर देशांमध्येही वाजले आणि गाजले होते. निली फुर्टाडो या कॅनडियन गायिकेची ‘आय अॅम लाइक द बर्ड’ किंवा ‘पॉवरलेस’ ही गाणी बरीच लोकप्रिय आहेत. तिचे ‘टर्न ऑफ द लाईट’ सकाळी ऐकायच्या यादीत ठेवल्यास आणखी वेगळी गंमत येईल. हे गाणे हिप-हॉप, रॅप यांचे मिश्रण असले, तरी प्रभातकाळात चांगला परिणाम देणारे आहे. शकीरा ही तिच्या नृत्यगीतांसाठी प्रसिद्ध असली, तरी तिचे ‘जिप्सी’ हे गाणे तिच्या शैलीशी फटकून वागणारे म्हणूनच दिवस आरंभाला सुखसंवेदनांची बरसात करणारे आहे.
चालताना, धावताना किंवा व्यायाम करताना आपल्याला भावणारी प्ले लिस्ट आपण तयार करणे केव्हाही इष्टच. पण त्याचा कंटाळा येत असेल, तर ही गाणी आठवडय़ाची प्रभातगाणी करायला हरकत नाही.
म्युझिक बॉक्स
Csokolom – Amari Szi Amari
the Corrs – Joy Of Life
The Corrs – Haste to the Wedding
Indus Creed – Pretty Child.
Nelly Furtado – Turn Off The Light
Shakira – Gypsy
Alanis Morissette – ‘Hand In My Pocket’