मितेश जोशी

सुरुवातीला अगदी मोजक्याच समविचारी, जिद्दी व कष्टाळू मित्रांचा चमू तयार होतो. हळूहळू या चमूत सदस्यांची संख्या वाढते तशी कामाची जबाबदारीही वाटली जाते. असे अनेक समाजाचे मैतर आजघडीला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहेत.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जगभर ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या आवडत्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर किंवा संपूर्ण टोळीबरोबर हा हक्काचा दिवस मजा, मस्ती करत व्यतीत केला जातो. खरं तर हा दिवस वगळता उर्वरित ३६४ दिवसदेखील कॉलेजकट्टय़ावर आपण आपल्या टोळीबरोबर दंगाच करतो. मैत्री दिन हे केवळ नव्या दंग्याचं निमित्त !! मैत्रीचे बंध खरं तर इतके घट्ट की ठरवलं तर ते आपल्याकडून चांगलं काही घडवू शकतात. कोणत्याही आशा-अपेक्षेशिवाय एकत्र जोडणारं हे मैत्रीचं नातं कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक मैतर जोडून देतं. ट्रेनमधून एकत्र सफर करणारा एक भाई, नोट्स शेयर करणारा एक भाई, चाय पे चर्चा रंगवणारा एक भाई वगैरे वगैरे.. परंतु या पलीकडे जात एकत्र आलेली काही मंडळी समाजाशी मैतर जोडू पाहतात. समाजात एकत्र येऊन समाजोपयोगी काम करतात. सुरुवातीला अगदी मोजक्याच समविचारी, जिद्दी व कष्टाळू मित्रांचा चमू तयार होतो. हळूहळू या चमूत सदस्यांची संख्या वाढते तशी जबाबदारीही वाटली जाते. असे अनेक समाजाचे मैतर आजघडीला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहेत.

जून २०१७ मध्ये दादरच्या हिंदुजा कॉलेजमध्ये शिकणारा मल्हार कळंबे हा तरुण त्याच्या मित्रांसोबत बाली येथे फिरायला गेला होता. तेथे पाण्यातले खेळ खेळताना त्याने समुद्राचं अंतरंग पाहिलं आणि त्याला भुरळ पडली. मुंबईत परतल्यावर गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात दादर चौपाटीवर फेरफटका मारताना त्याच्या एक गोष्ट मनात आली की समुद्रकिनारी वसलेल्या आपल्या मुंबई शहराला खूप मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. परंतु या किनारपट्टीवरची अस्वच्छता पाहावत नाही. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी दररोज सकाळ-संध्याकाळ कचरा गोळा करतात. किनारपट्टी स्वच्छ करतात. परंतु दुसऱ्या दिवशी अवस्था ‘जैसे थे’ असते! हे कुठे तरी थांबवायला हवं. लोकांमध्ये समुद्र स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करायला हवी, या निश्चयाने मल्हारने वर्षभरापूर्वी ‘बीच प्लीज’ (एक रविवार समुद्राच्या स्वच्छतेसाठी) ही मोहीम सुरू केली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी २५ जणांचा चमू त्याच्यासोबत होता. आता ऑगस्ट २०१८ मध्ये त्याचा ८० सदस्यांचा चमू आहे. दर रविवारी सकाळी ८ वाजता त्यांची स्वच्छता मोहीम सुरू होते आणि साधारण दुपारी १२ वाजेपर्यंत संपते. ‘जेवढा या रविवारी मी कचरा गोळा करतो. तेवढाच तो पुढच्या रविवारी आमची वाट पाहत असतो. आतापर्यंत आम्ही ४७ आठवडय़ांत ३०० टन कचरा गोळा केला आहे. याचा आनंद तर आहेच परंतु कधी कधी रोज रोजची ही स्थिती बघून कामावरून मन उडतं. परंतु आज जर तरुणाईत ही जनजागृती घडवली, त्यांच्याकडून कसून काम करून घेतलं तरच ते उद्या कचरा टाकताना स्वत:ला आणि कचरा टाकणाऱ्याला विरोध करतील. ज्यामुळे किनारपट्टी स्वच्छ व सुंदर दिसेल,’ असं मल्हार सांगतो. दर रविवारी सकाळची सुखद झोप मोडून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे कॉलेज विद्यार्थी एकत्र येऊन समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम राबवत आहेत.

श्रीमंत आणि गरीब यांच्या राहणीमानात जेवढा फरक आहे तितकाच फरक त्यांच्या शिक्षणात देखील आहे. इयत्ता सातवीपर्यंत गरीब मुलांचं शिक्षण होतं. दप्तर, गणवेश, वह्यापुस्तकं, दुपारचं सकस जेवण सगळं काही मिळतं. पण त्यानंतरच्या शिक्षणाचं काय? कोणाचे आई-वडील मोलमजुरी करतात. कोणाची आई घरकाम करते, अशा परिस्थितीत शिक्षणाचा व इतर शैक्षणिक वस्तूंचा एकदम सगळाच खर्च कसा उचलायचा? कुठून पैसे गोळा करायचे, हा प्रश्न त्या मुलांच्या पाल्यांच्या पुढय़ात उभा राहतो. मग अशा वेळी पैसे नाहीत म्हणून त्यांना शिक्षणाला मुकावे लागते. समाजातलं हेच चित्र ठाण्यातला ‘रद्दी-पेपर स्क्रॅप’ हा ग्रुप बदलू पाहतोय. प्रणव प्रकाश पाटील या तरुणाने दोन वर्षांपूर्वी अवघ्या पाच मित्रांच्या मदतीने हा ग्रुप सुरू केला. घरोघरी जाऊन रद्दी गोळा करून ती एकदम विकून त्यामधून मिळालेला पैसा हा समाजोपयोगी कामांसाठी वापरणे हा त्यांचा हेतू आहे. पहिल्याच दिवशी प्रणवने त्याची व इतर चार मित्रांच्या घरची रद्दी एकदम विकली. ज्यातून त्याला ३५० रुपये मिळाले होते. त्या पैशातून त्याने ठाणे स्टेशन परिसरातील गरीब मुलांना सकस अन्न दिलं. नंतर नंतर त्यांच्या चमूत सदस्यांची संख्या वाढत गेली. त्याच वर्षी दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी ठाण्यातील तीन हात नाक्यावरील गजरे बनवणाऱ्या मुलांना नवेकोरे कपडेही घेऊन दिले. ज्याप्रमाणे आपण नवीन कपडे घालून दिवाळी साजरी करतो. तशीच त्यांनीही दिवाळी साजरी करावी, हा त्यांचा उद्देश सफल झाला. त्या दिवशी ती मुलं नवीन कपडे आणि त्याचा वास अनुभवण्यात गुंग झाली होती, असं प्रणव सांगतो. बरोबर वर्षभराने त्याच परिसरात ‘सिग्नल शाळा’ सुरू झाल्याची बातमी प्रणवला मिळाली. प्रणव व त्याचे खास मित्र त्या शाळेला भेट देण्यासाठी तेथे पोहोचले. गेल्या वर्षी ज्यांना दिवाळीत आपण नवीन कपडे दिले. तीच मुलं तिथे अभ्यास करत होती. त्यातील कोणी एक मुलगा त्याला चटकन म्हणाला ‘तूच ना तो दादा ज्याने आम्हाला दिवाळीत नवीन कपडे दिले होते..’ त्या दिवसापासून ‘रद्दी-पेपर स्क्रॅप’ या ग्रुपने ‘सिग्नल शाळे’तील मुलांच्या शैक्षणिक व शैक्षणिकेतर गरजा भागवण्यास सुरुवात केली. सध्या ते ठाण्यातील जिल्हा परिषद शाळा सोनारपाडा व वीटभट्टी वस्त्यांवरील शाळेसाठीसुद्धा काम करतायेत.

प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं आहे की, ‘झाडांनाही संवेदना असतात.’ पर्यावरण संतुलनात झाडांचा वाटा लक्षात घेतला पाहिजे. जाहिरातबाजीचं साधन म्हणून झाडांचा होणारा वापर, त्यांची झालेली दुरवस्था वेळीच रोखली नाही तर पर्यावरणाचं संतुलन अधिकच ढासळायला वेळ लागणार नाही. कारण खिळे ठोकून झाडं केवळ विद्रूप नव्हे तर ती तीळ तीळ मारली जात आहेत. याच विचारांचा पुरस्कार करत झाडांना ठोकलेले खिळे काढण्याचं एक अनोखं काम मुंबई व पुण्यात ‘अंघोळीची गोळी’ या ग्रुपअंतर्गत होतंय. त्यांनी या मोहिमेला ‘नेलफ्रीट्री’ हे नाव दिलं आहे. या मोहिमेची नांदी याच वर्षी एप्रिलमध्ये झाली. पहिल्या दिवशी झाडांवरील खिळे काढण्यासाठी १५ जण उपस्थित होते. पण आता या कामाची व्याप्ती अनेक कॉलेजमधील एनएसएस विभागाने देखील घेतली आहे. त्यामुळे उपक्रमातील सहभागींची संख्या वाढली असून गेल्या चार महिन्यांत या मुलांनी ५२० झाडांना २००० खिळ्यांपासून मुक्त केलं आहे. जेव्हा आपण एखाद्या झाडावर खिळा ठोकतो ,तेव्हा ऊतींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. सुमारे दहा खिळ्यांमुळे झाडाला आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊन झाड दगावण्याची भीती असते. खिळ्यांमुळे तयार झालेली छिद्रं म्हणजे एक प्रकारची झाडाला झालेली जखमच असते जी कीटक आणि इतर रोगांना सहज प्रवेश देऊ  शकते. या कारणांमुळेच नेलफ्रीट्री ही मोहीम सध्या मुंबई शहरात जोरदार काम करते आहे.

पुस्तकी किडा असणाऱ्या तरुणाचं घर म्हणजे एक मिनी लायब्ररीच जणू! घरात वाचून झालेल्या धूळ खात पडलेल्या पुस्तकांचं पुढे काय करायचं, हा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतो. पण याला एक सर्वोत्तम उत्तर म्हणजे ‘बुकशेअर इंडिया’ हा प्रकल्प. २०१६ मध्ये डहाणूकर कॉलेजचे तीन विद्यार्थी परशुराम खवले, क्रितिका वर्मा आणि मनस्वी वाधवा या तिघांनी मिळून ‘बुक शेअर इंडिया’ हा प्रकल्प सुरू केला. हा एक सामाजिक प्रकल्प असून तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीत पुस्तकांची देवाण-घेवाण इथे होते. मे २०१६ ते जुलै २०१८ पर्यंत तब्बल ७०,००० पुस्तकं या प्रकल्पाच्या माध्यमातून दान केली आहेत. पुस्तक दान करण्यासाठी हा ग्रुप सामाजिक संस्थांची भेट घेऊन त्यांना पुस्तकं देतो. व पुढे गरजू मुलांपर्यंत ही मंडळी पुस्तकं पोहोचवतात. सध्या या ग्रुपमध्ये ३० जण कार्यरत असून या माध्यमातून भविष्यात मुलांना चांगल्या अर्थाने पुस्तकी किडे बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

‘ध्यास-स्पिरिट ऑफ यंगस्टर’ हा ग्रुप समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करतो आहे. हा ग्रुप सध्या तीन उपक्रमांवर काम करतोय. बुक शेअर उपक्रम, शाळा दत्तक उपक्रम व कपडे दान उपक्रम. डहाणू येथील आदिवासी पाडय़ाला भेट देऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पुरवणे, शाळा दत्तक उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक व इतर वस्तू दान करणे, शिक्षकांना वह्यांमधली उरलेली पाने एकत्र करून बायडिंग करून त्या वह्या शाळेच्या शैक्षणिक कामासाठी देणे अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे.

सध्या असे अनेक मैतर ग्रुप समाजकार्यासाठी एकत्र येतायेत. मैत्रीच्या नात्यातून दुर्लक्षित प्रश्नांकडे प्रकाशझोत टाकत सामाजिक क्षेत्रात काम करणारी ही मुलं वेगवेगळ्या पद्धतीने जिवाचं मैतर वाढवतायेत, समाजाशी असलेलं नातं जपतायेत!