मुलींना गिफ्ट द्यायचे तसे पर्याय खूप असतात, पण खूप पर्याय असणं हाच प्रॉब्लेम असतो. अशा वेळी टेक्नॉलॉजी धावून येते. घरबसल्या खरेदीचे पर्याय आता ई शॉपिंगमुळे उपलब्ध आहेत. रक्षाबंधनाच्या  पाश्र्वभूमीवर नवीन कलेक्शन आलंय आणि ऑनलाइन स्टाइलिस्टच्या मदतीने तुम्ही बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट खरेदीही करू शकता. त्यासाठी या काही गिफ्ट आयडियाज..

कुणाला कुठली भेटवस्तू द्यावी हे सिलेक्ट करण्याच्या बाबतीत मुलींचा नंबर पहिला लागतो. कोणाला काय घ्यावं, कुठून घ्यावं, कसं पॅक करावं याची इत्थंभूत माहिती मुलींना असते, पण रक्षाबंधनाच्या सणाला मात्र त्यांची पंचाईत होते, कारण गिफ्ट त्यांना मुलांकडून मिळतं. मुलांचा या बाबतीत जरा घोळच होतो. मुलींना काही गिफ्ट द्यायचं असेल तर यांची तारांबळ उडते. आपापल्या बहिणींना काय द्यायचं याबद्दल विचार चालूच असतील आणि डोकं खाजवत वेगवेगळ्या दिशांकडे बघत बसणंही चालू असेल, पण डोण्ट वरी बॉईज.. तुमच्या बहिणींना गिफ्ट्स देण्याच्या छान छान आयडीयाज देण्यासाठीच हा लेख.

तर गाईज.. सध्या आपण सगळे टेक्नोसॅव्ही झालो आहोत. फक्त गेम्स, म्युझिक किंवा सीरिज याच्या पलीकडे जाऊन आपण टेक्नॉलॉगी वापरायला हवी. ऑनलाइन शॉपिंग हा त्याचाच एक भाग. या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या बहिणीसाठी गिफ्ट खरेदी करता येईल. शिवाय खरेदीचा सल्ला द्यायला काही साइट्स स्टायलिस्टची मदतदेखील देऊ करतात. तेव्हा बहिणीला अमुक एक चांगलं दिसेल का, ही चिंता आता फार करण्याची गरज नाही. बहिणीला देण्यासाठी काही गिफ्ट आयडियाज –

 

१. अ‍ॅक्सेसरीज

मुलींना दागिने प्रिय असतात. आपल्या बहिणीला ज्वेलरी किंवा अ‍ॅक्सेसरीज द्यायची आयडिया एकदम मस्त, पण नेमकी वस्तू सिलेक्ट करायला बाजार गाठायची गरज नाही. ज्वेलरी आणि अ‍ॅक्सेसरीज विकणाऱ्या अनेक साइट्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये तुम्ही दागिने विकत घेऊ  शकता. ‘आत्मन’ या वेबसाइटवर भरपूर गिफ्टिंग ऑप्शन्स दिसले. सध्याच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये गिफ्ट्स देण्यासाठी त्यांनी काही लहान लहान बटवे तयार केले आहेत. या बटव्यामध्ये काही नाजूक दागिने ठेवले आहेत. http://www.aatmanindia.com या साइटवरून तुम्ही ज्वेलरी बटवे ऑर्डर करू शकता. बटव्यासह ज्वेलरी बघून बहीण नक्की खूश होईल.

 

२. कस्टमाइज्ड गिफ्ट्स

बहिणीचा फोटो असणारा कस्टमाइज्ड मग, पिलो, छानसा लॅम्प, फोटोफ्रेम किंवा एखादं छानसं वाक्य असणारा कस्टमाइज्ड टॉप गिफ्ट म्हणून देऊ  शकता. आता त्यावर मेसेज काय लिहायचा, फोटो कोणता छापायचा, काय डिझाइन सिलेक्ट करावं, रंग काय घ्यायचा या सगळ्या गोष्टींत तुम्हाला ऑनलाइन साइट्सची मदत मिळते. काही काही साइट्स तुम्हाला स्टायलिस्ट देतात. त्यांच्या मदतीने तुम्ही स्वत: डिझाइन करून ऑर्डर करू शकता.

 

३. एथनिक गिफ्ट्स

एथनिक गिफ्ट्स बहिणींना नक्कीच आवडतील. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, वेगवेगळ्या सुंदर ओढण्या, छानशा बॅग्ज, नोज रिंग्ज, जुन्या पद्धतीची वॉल क्लॉक्स किंवा अगदी एथनिक चपलासुद्धा तुम्ही बहिणीला गिफ्ट करू शकता.  indiagifts.com, craftsvilla.com, fabfurnish.com, indiaethnicgifts.com अशा अनेक साइट्स तुम्हाला एथनिक गिफ्ट्स घेण्यासाठी मदत करतील.

 

४. ब्रँडेड गिफ्ट्स

मान्सून सेलचा फायदा तुम्ही घेऊ शकता. सध्या अनेक ब्रॅण्डेड स्टोअर्स आणि मोठय़ा मॉलमध्ये ३० ते ७० टक्क्यांपर्यंत सेल चालू आहेत. त्यात तुम्हाला अनेक ब्रँडेड वस्तू आपल्या बहिणीसाठी देता येतील आणि नेहमीपेक्षा त्याच्या किमती नक्कीच कमी असतील. ब्रॅण्डेड गिफ्टमुळे बहीणही खूश होईल.

प्राची परांजपे

 

Story img Loader