रश्मि वारंग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

प्रत्येक देशात एक तरी ब्रॅण्ड असतोच जो तिथल्या भौगोलिक वैशिष्टय़ांना आणि पर्यायाने त्या देशाच्या संस्कृतीला आपल्या नावातून प्रतीत करतो. भारतीयांसाठी असा ब्रॅण्ड म्हणजे ‘हिमालया’. औषधं, वन्यौषधींपासून तयार उत्पादनं, हेल्थकेअर अशा विविध उत्पादनांमध्ये हा भारतीय ब्रॅण्ड महत्त्वाचा आहे त्या ब्रॅण्डची ही कहाणी.

एम मनाल यांनी ‘हिमालया’ ब्रॅण्ड निर्माण केला. त्यामागची प्रेरणा त्यांना एका घटनेतून मिळाली. ब्रह्मदेश येथे जंगल भटकंतीस गेले असताना एका अस्वस्थ हत्तीला काबूत आणणारा माहूत त्यांनी पाहिला. तो माहूत एक मुळी उगाळून त्या हत्तीला देत होता. मनाल यांनी चौकशी केल्यावर ती मुळी ‘सर्पगंधा’ असल्याचे त्यांना कळले. ब्रह्मदेशातून येताना ते सोबत ती मुळी घेऊन आले. त्या मुळीतील औषधीगुणतत्त्वांवर त्यांनी संशोधन सुरू केलं. त्यातून औषधनिर्मिती करता येईल असा मनाल यांना विश्वास वाटत होता. त्यांच्या आईने आपल्या सोन्याच्या बांगडय़ा विकून मनाल यांना पसे उपलब्ध करून दिले. त्यातून १९३० साली, ‘हिमालया’ औषध कंपनीची निर्मिती झाली. डेहराडून येथे मनाल यांचा हा औषधोद्योग सुरू झाला. सर्पगंधाची औषधी तत्त्वं वापरून उच्च रक्तदाबासाठी प्रभावी औषधी गोळ्या त्यांनी निर्माण केल्या. नाव ठेवलं, सर्पीना. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री हातानेच वापरण्याची होती. दिवसभर त्या यंत्रात गोळ्या बनवताना मनाल यांचे हात भरून येत. पण अनेकांना गोळीचा गुणकारी अनुभव येऊ लागला आणि निसर्गातील औषधी तत्त्वांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वसामान्यांपर्यंत आणण्याचा मनाल यांनी ध्यासच घेतला.

या सर्व औषधांचा पाया मात्र आयुर्वेदिकच असेल, ही काळजी घेतली गेली. अनेक औषधी गुणधर्माच्या वनौषधींचा विविध आजारांसाठी कसा उपयोग करून घेता येईल या दृष्टीने संशोधन झाले. संशोधकांची सक्षम टीम कंपनीकडे तनात झाली. आज ही संशोधकांची संख्या २९० इतकी मोठी आहे. ‘हिमालया हर्बल हेल्थकेअर’ वाढत गेले. १९५५ मध्ये आलेले हिमालयाचे एक नामांकित औषध म्हणजे लिव्हर फिफ्टीटू. यकृताशी निगडित कोणत्याही आजारांवर, यकृत अधिक निरोगी व्हावे याकरता दिल्या जाणाऱ्या औषधात लिव्हर फिफ्टीटूची विश्वासार्हता अगदी आजही कायम आहे.

हिमालया कंपनी १९७५ मध्ये डेहराडूनहून बंगळूरु इथे स्थलांतरित झाली. औषधांसह बेबी केअर, पर्सनल केअर, पोषण, अ‍ॅनिमल हेल्थ केअर अशा विविध गोष्टी या ब्रॅण्डमध्ये वाढत गेल्या. हिमालयाच्या अनेक उत्पादनांपकी हिमालया नीम फेस वॉश अधिक लोकप्रिय आहे. आज ९२ देशांत आणि हिमालयाची औषधं रुग्णांना सुचवणाऱ्या ४०,००० डॉक्टर्ससह हा ब्रॅण्ड अमेरिका, मध्यपूर्व, यूरोप इथे विस्तारला आहे.

हा ब्रॅण्ड वन्यौषधी वर्गातील आपलं ज्येष्ठत्वच टॅगलाइनमधून प्रतीत करतो. ‘सिन्स नाईन्टीन थर्टी’ ही हिमालयाची टॅगलाइन आहे. हिमालयाच्या लोगोत एच या अक्षराभोवती वेटोळं घालणारं पान दिसतं. ते पान हिमालया ब्रॅण्डचा वन्यौषधी, निसर्गोषधींचा वारसा सांगताना त्या एच मधल्या हर्बलला अधोरेखित करतं.

हा ८८ र्वष ब्रॅण्ड नंबर वनच्या शर्यतीत कधीच नव्हता. तरीही हिमालयाची उत्पादनं आवर्जून वापरणारा एक मोठा वर्ग आहे. सध्या ‘हर्बल’ आयुर्वेदिक असण्याचा टॅग अनेक उत्पादनांना गरजेचा वाटतो. त्यातले खरेखुरे हर्बल ब्रॅण्ड किती ह्य़ावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण त्या गर्दीत ज्यांच्याकडे विश्वासाने पाहता येतं असा ब्रॅण्ड म्हणजे हिमालया निश्चितच वेगळा आहे. नगाधिराज हिमालयासारखाच जुना आणि विशाल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about himalaya brand story