‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी एखाद्या घरगुती उत्पादनाची निर्मिती कशी होते, हे विद्यार्थ्यांचे कुतूहल शमवण्यासाठी उत्साही असणाऱ्या शाळा कंपन्यांच्या पाहणीच्या सहली आखत. दूधप्रक्रिया उद्योग किंवा पोल्ट्रीजमधील अवाढव्य उलाढाल या दोन गोष्टी प्रामुख्याने अभ्यास सहलींसाठी निवडल्या जात. यूटय़ूब आल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये त्यात एकसुरी व्हिडीओज होते. त्यानंतर दिवसाकाठी लाखो व्हिडीओज जगभरातून अपलोड होऊ लागल्यानंतर त्यातील हौशीपणा कमी झाला आणि व्यावसायिक हेतू वाढू लागले. आत्ता ‘जो जे वांच्छिल तो’ सगळे यूटय़ूबवर उपलब्ध झाल्यामुळे अभ्यास सहलीची हौस शाळाच काय तर कुतूहल वाटणारा कुणीही भागवू शकतो. आजचा पहिला व्हिडीओ आहे ‘साबुदाणा फॅक्टरी’चा. साबुदाणा हा उपवासासाठी म्हणजेच देवाच्या आराधनेसाठी वापरला जाणारा पदार्थ शेतातून येत नाही, तर फॅक्टरीत बनतो. तो संपूर्ण शाकाहारीच असतो आणि त्यामुळे इतर अन्न न खाऊनही उपवास पूर्ण होत असतो. उपवासासाठी साबुदाणा कसा निवडला गेला असावा आणि फॅक्टरीमधून तयार होणारा साबुदाणा देवाला कसा चालतो, याची चर्चा इथे नको. तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असेल, पण खाद्यश्रद्धाळूंना साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे खाण्यासाठी उपवास करावा लागतोच असे नाही, तर या साबुदाण्याविषयी, त्याच्या पदार्थाविषयी माहिती देणाऱ्या कैक व्हिडीओसोबत तो बनतो कसा हे पाहणे उद्बोधक आहे. रताळी फॅक्टरीत गेल्यानंतर किती प्रक्रियांनंतर साबुदाण्याचे दाणे मशीनवर तयार होतात, हे या व्हिडीओमध्ये समजावून सांगितलेले आहे. फापटपसारा न सांगता सबटायटल्समधून या निर्मिती प्रक्रियेला पाहता येते. साबुदाणानिर्मितीविषयी अजिबात माहिती नसल्यास किंवा मनात गैरसमजुतीचे डोंगर असल्यास हा व्हिडीओ नक्की पाहावा.
सणावारात घरी मिठायांचे पुडे येऊन पडतात. त्यात सोनपापडी ही गोडोत्कट मिठाई चाखताना आपल्याला ती कशी बनविली गेली असेल, याचा प्रश्न पडतो; पण खाताना सांडू न देता आत्यंतिक जटिल अवस्थेत ही मिठाई इतकी खुसखुशीत का आहे, याचा पत्ता यातील एका व्हिडीओवरून लागू शकतो. ही मिठाई घरी कशी बनवावी याचीही वैकल्पिक पद्धत एका व्हिडीओमध्ये सांगण्यात आली आहे, तर एका मुलीने चक्क या मिठाईची कृती दाखविणारा माहितीपटच बनवला आहे. पूर्वी ही मिठाई सणांच्या काळात दिली-घेतली जाई. आता मात्र बाराही महिने वाण्याकडे किंवा जनरल स्टोअर्समध्ये विविध ब्रॅण्डची सोनपापडी उपलब्ध असते. या व्हिडीओद्वारे सोनपापडीबाबतचे बरेच कुतूहल शमू शकेल.
सोनपापडीसारखीच पूर्वी दुर्मीळ असलेला आणि आता बारमाही उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे पेठा. अलीकडच्या जत्रांमधला सर्वाधिक खपला जाणारा हा गोड पदार्थ. भल्या मोठय़ा साखरेच्या दाण्यासारखा भासणाऱ्या या पदार्थाचे मूळ गाव आग्रा केव्हापासून पडले, हाही संशोधनाचा मुद्दा आहे; पण वसईची केळी, तसाच आग्य््रााचा पेठा मानले जाते. कोहळ्यापासून (भोपळ्याइतक्याच मोठय़ा) त्याचे पांढऱ्या पारदर्शक पाकात तयार होणारे रूप दाखविणारे व्हिडीओ बरेच आहेत. घरच्या घरी पेठा कसा बनवावा याच्या सुगरणींनी केलेल्या कृतीही पाहायला मिळतात. एकूणच या पेठय़ाचा गोडवा वाढविणारे कैक व्हिडीओ यूटय़ूबमुळे अनुभवता येणे आता शक्य झाले आहे.
बदामी हलवा हा मुंबई हलवा म्हणूनही ओळखला जातो. रबरासारखा वाटणारा हा गोड पदार्थ पहिल्यांदा कोठे बनला, याबाबत प्रचंड वाद आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व आणि वेगवेगळ्या देशांमधून तो भारतात पोहोचला. भारतात आलेल्या हिंसोत्कट मुस्लीम आक्रमकांद्वारे हलवा या देशात स्थिरावला आहे. मुंबई हलवा म्हणून तो जसा लोकप्रिय आहे, तसाच कराची हलवा म्हणूनही त्याची ओळख आहे. साखरेचा पाक, मक्याचे पीठ आणि सुका मेवा यांची बराच काळ गुंतागुंतीची प्रक्रिया करून ही मिठाई बनते. त्याचा घरगुती व्हिडीओ पाहण्यासारखा आहे. आइस्क्रीम, फालुदा आणि दूध कोल्ड्रिंग्जमध्ये हमखास वापरल्या जाणाऱ्या टुटी- फ्रुटीच्या छोटय़ा तुकडय़ांबाबत आपण कधीच ज्ञात नसतो. आइस्क्रीमच्या कोनवर ते टाकावे की टाकू नये, याचा निर्णय अनेकदा आवडीनुसार घेतो. कच्च्या पपयांपासून बनविल्या जाणाऱ्या या टुटी-फ्रुटीच्या निर्मिती प्रक्रियेचा व्हिडीओ आवर्जून पाहण्यासारखा आहे. हे सारे बनते कसे ते आजतागायत आपल्या खिजगणतीत नसले, तरी यूटय़ूब विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीची सहज माहिती करून देते. येथे दर काही मिनिटांनी एक वेगळी अभ्यास सहल करता येणे शक्य असते.
पंकज भोसले viva@expressindia.com