सायली सोमण

मागच्या वेळेस आपण आपलं व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी आणि सौंदर्यप्राप्तीसाठी पूर्वीच्या काळात किती चुकीच्या आणि जिवाला धोकादायक अशा काही फॅशनचा वापर केला जायचा, त्यावर नजर टाकली होती. अशाच आणखी काही चुकीच्या मेकअप आणि ब्युटी ट्रेण्ड्सचा धांडोळा या लेखात घेणार आहोत.

हाय नेक कॉलर

या फॅशन अ‍ॅक्सेसरीचा शोध खरंतर पुरुषांसाठी अत्यंत सोयीची गोष्ट या उद्देशाने लावला गेला होता. फक्त रोज कॉलर बदलायची, शर्ट नाही बदलला तरी चालेल, अशा स्वरूपात ही फॅशन विकसित करण्यात आली होती,पण घडलं वेगळंच. वेल्सच्या राजकुमाराने एकोणिसाव्या शतकात शोध लावलेली ‘हाय नेक कॉलर’ची फॅशन जीवघेणी म्हणून ओळखली गेली. मान आणि गळ्याभोवती अगदी घट्ट अशी कॉलर असल्यामुळे श्वास घ्यायला तर त्रास व्हायचाच पण शिवाय रक्तपुरवठय़ातही अडथळे यायचे. त्यामुळे त्याला ‘फादर किलर’ असं टोपण नाव दिलं गेलं होतं.

लेड फेस पेंट

पूर्वीचे काही संदर्भ नीट तपासून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, फक्त भारतातच नाही तर बाहेर युरोपीयन देशांमध्ये स्त्रियांचे किंवा पुरुषांचे सौंदर्य त्यांच्या वर्णावरून म्हणजेच त्वचेच्या रंगावरून मापले जात असे. इंग्लंडमधील पहिल्या क्वीन एलिझाबेथचे जुने पेंटिंग बघितले तर आपल्या लक्षात येईल की, तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा आहे. गोरे असणे म्हणजे सौंदर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जायचे आणि रापलेला वर्ण जणू काही खालच्या वर्गातील व्यक्तींचे प्रतीक होता. असा लुक मिळवण्यासाठी त्याकाळी सगळे लोक लेड या पदार्थाची पावडर वापरून चेहऱ्यावर मेकअप करत असत. हा पदार्थ अत्यंत हानिकारक असल्यामुळे त्या लोकांच्या त्वचेचे खूप नुकसान झाले, त्याचबरोबर डोकेदुखी, केस गळणे, पोटाचे आजार, पॅरालिसिस, दात किडणे अशा अनेक आजारांना लोक बळी पडत होते.

पावडर्ड विग

पूर्वीच्या काळात पुरुषांचे मोठे केस असणे हा एक ‘हाय स्टेटस सिम्बॉल’ मानला जायचा. म्हणूनच १७ व्या शतकात जेव्हा फ्रान्सच्या राजाचे केस वयामुळे कमी होऊन त्याला टक्कल पडायला लागले, तेव्हा या विग्सचा शोध लागला. फॅशनमधला हा शोध स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने बिलकूल न विचार केला जाणारा शोध मानला जातो.

हे विग्स जास्त करून घोडय़ांच्या किंवा शेळीच्या केसांपासून बनवले जायचे आणि त्यावर मेण, अत्तर आणि पांढऱ्या रंगाच्या पावडरीने प्रक्रिया केली जात असे. हे विग्स धुतले जात नसल्याने उवा, लिखा, इतर किडे आणि कधी कधी उंदीर व पालीसुद्धा या विग्सना आणि ते घातलेल्या व्यक्तींना नुकसान पोहोचवत. आता या विगच्या टेक्नॉलॉजीमध्ये मुळातच खूप आधुनिकता आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील बॅरिस्टर्स ती प्रथा पाळायला हे विग्स अजूनही घालतात.

रेडिओअ‍ॅक्टिव्ह मेकअप

प्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्युरिने ‘रेडियम’चा शोध १८९८ मध्ये लावला. त्यानंतर हा केमिकल पदार्थ बऱ्याच प्रमाणात कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनी ‘थो राडिया’ने कॉस्मेटिक उत्पादनांची एक लाइन तयार केली ज्यामध्ये विविध प्रकारच्या पावडर, क्रीम्स, परफ्युम, लिपस्टिक्स इत्यादी मेकअपला लागणारे सामान होते. त्याचप्रमाणे लंडनमधील बऱ्याच कॉस्मेटिक उद्योजकांनी असे बरेच प्रॉडक्ट्स अस्तित्वात आणले. एका काळापर्यंत रेडिओअ‍ॅक्टिव्ह मेकअप प्रॉडक्ट्स खूप चर्चेत होते. पण हळूहळू त्यामुळे होणारे दुष्परिणाम उदारणार्थ अ‍ॅनिमिया, इंटर्नल ब्लीडिंग, उलटी यासारखे आजार लोकांसमोर यायला लागले.

मसलीन डिसीज

एकोणिसाव्या शतकात एक विचित्र फॅशन ट्रेण्ड युरोपमधील स्त्रियांनी अनुभवला. तो म्हणजे पातळ, हलके मसलीन फॅब्रिकचे फुल लेंग्थ गाऊन्स घालणे आणि ते ओले करून घराबाहेर निघणे. त्या मागचा तर्क हा होता की मसलीन फॅब्रिक असल्यामुळे ते पाण्याने ओले झाल्यावर एक पारदर्शक दृश्य निर्माण होईल आणि शिवाय मसलीन कॉटन असल्यामुळे ते फॅ ब्रिक अंगाला चिकटेल आणि स्त्रियांची शरीराकृ ती अत्यंत कमनीय आणि आकर्षक दिसेल. या ट्रेण्डमध्ये ओले कपडे सतत घातल्यामुळे न्युमोनिया होऊन बऱ्याच स्त्रियांनी आपले जीव गमावल्याचे निदर्शनास आले.

बेळलेदोना रोपांचे आयड्रॉप्स

व्हिक्टोरियन काळात मोठे टपोरे डोळे असलेल्या बायका खूप सुंदर मानल्या जायच्या. म्हणूनच त्यांच्या आयबॉलचा आकार बदलण्यासाठी बऱ्याच बायका बेळलेदोना रोपांच्या अर्कापासून बनवलेले तेल सतत डोळ्यांमध्ये घालायच्या. या तेलाचे अत्यंत विकृत दुष्परिणाम म्हणजे दृष्टी जाणे, स्किनवर रॅशेस येणे, किडनीशी निगडित आजार, तोल जाणे असे प्रकार दिसू लागले. काही स्त्रियांनी जीवही गमावला.

आर्सेनिक डाय

अठराव्या शतकात युरोपियन देशांमध्ये एमराल्ड ग्रीन कलरचे कपडे खूप जास्त चर्चेत असायचे. प्रत्येकाकडे एक तरी त्या रंगाचा ड्रेस असायचाच. म्हणूनच त्या काळातील लोकांची आवड ओळखून ‘पॅरिस ग्रीन’ नावाचा एक आर्सेनिक डायचा शोध लावण्यात आला. यामुळे त्या एमराल्ड ग्रीन रंगाचे गाऊन्स, इतर कपडे लोकांच्या अंगावर, वॉर्डरोबमध्ये जास्त दिसायला लागले. पण नंतर बऱ्याच डॉक्टर्सच्या निदर्शनास यायला लागले की, हा डाय कपडय़ांवर भक्कम बसत नसल्याने तो हळूहळू कपडय़ांवरून सुटतो आणि त्याचा संपर्क थेट आपल्या त्वचेशी येतो. रोजच्या हालचालींमुळे तो नाकात, तोंडातही जाऊ  शकतो ज्यामुळे त्वचेचे आजार, डोकेदुखी, पोटाचे आजार, कॅन्सर यांसारखे गंभीर आजार वाढू लागले होते.

फ्लेमेबल फॅब्रिक

त्या काळातील आणखी एक धोकादायक फॅब्रिक म्हणजे फ्लेमेबल फॅब्रिक. या फॅब्रिकचे रात्री घालायचे शर्ट आणि पायजमे लहान मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये खूप चर्चेत असायचे. हे फॅ ब्रिक ज्वलनशील असल्याने रात्री झोपल्यावर मेणबत्तीमुळे पेट घेऊन अनेक लहान मुले आणि मोठी माणसे दगावल्याचे बरेच प्रसंग ऐकिवात आहेत.

त्या काळी ट्रेण्ड झालेले हे फॅशन आणि ब्युटीचे प्रकार आऊट ऑफ द बॉक्स असले तरी धोकादायक होते. यातली जमेची बाजू हीच की यातही प्रयोग होत राहिले आणि काळ बदलत गेला तसे त्याच्या वापरातील धोके  ओळखून त्यावर तोडगेही काढले गेले. त्यातूनच नवीन सुटसुटीत फॅशन ट्रेण्ड्स जन्माला आले. तमुळे प्रयोगशीलतेतून चुका पुढेही होत राहिल्या तरी ‘बदल कायम असतो’ या तत्त्वावर ठाम विश्वास ठेवून फॅशन इंडस्ट्री कायम बदलती राहिली!

viva@expressindia.com