रश्मि वारंग
हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
कोणत्याही ब्रॅण्डकर्त्यांचं स्वप्न असतं की, त्याच्या ब्रॅण्डशिवाय कोणताही अन्य पर्याय ग्राहकाला दिसूच नये; पण काहींच्या बाबतीत हे स्वप्न इतकं खरं होतं की, मूळ नाव विसरून वस्तू ब्रॅण्डचं नावच धारण करते. पेट्रोलियम जेली ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या ब्रॅण्ड वॅसलीनच्या बाबतीतही तेच घडलं. त्या ब्रॅण्डची ही कहाणी.
अमेरिकेतील ब्रुकलीन इथं राहणारे रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू एक रसायनतज्ज्ञ होते. १८५९ चा काळ त्यांच्यासाठी थोडा कठीण होता. दिवाळखोरीला सामोरं जाणाऱ्या रॉबर्टना एका फायदेशीर व्यवसायाची गरज होती. केरोसीनचं महत्त्व त्या काळात मोठं होतं; पण पेट्रोलियमचा व्यवसायही जोर धरू लागला होता. या व्यवसायाची चाचपणी करण्यासाठी ते पेनसिल्वानिआ येथे गेले. तिथे मोठय़ा प्रमाणात खनिज तेलांचा व्यवसाय चालत असे. या भेटीच्या दरम्यान खनिज तेलाचं उत्खनन जिथे चालू होतं तिथे रॉबर्ट यांना एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट आढळली. तिथल्या ड्रिलिंग रॉडस्भोवती पेस्टसारखा दिसणारा पदार्थ चिकटलेला असायचा. रॉबर्ट यांच्यातील कुतूहल जागं झालं. त्यांनी तिथल्या कामगारांना विचारलं तर त्यांनाही फारशी माहिती नव्हती; पण त्यांच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट रॉबर्टना कळली, की हे जे काही आहे, ते जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. रॉबर्ट यांना त्यावर अधिक संशोधन करणं गरजेचं वाटू लागलं. ब्रुकलीनना परतताना तो लोकांच्या दृष्टीने असलेला पेट्रोलियम कचरा एक किमती ऐवज घेऊन यावा तसा रॉबर्ट घरी घेऊन आले. त्या पेस्टवर त्यांनी संशोधन केलं. त्या पदार्थाचं शुद्धीकरण केलं आणि त्या पदार्थाला ‘पेट्रोलियम जेली’ असं नाव दिलं. ही प्रक्रिया अजिबातच सोपी नव्हती. एक पूर्णत: नवी गोष्ट रॉबर्ट लोकांपुढे आणत होते. त्यांनी स्वत:वरच अनेक प्रयोग करून पाहिले. स्वत:ला छोटय़ामोठय़ा जखमा करत, त्यावर ही जेली लावत जखम कोणत्याही प्रादुर्भावाशिवाय किती काळात बरी होऊ शकते, कोणत्या जखमा बऱ्या होतात, कोणत्या नाही याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी ही जेली बाजारात विक्रीसाठी आणायचं ठरवलं. आपल्या या उत्पादनाचं नाव त्यांनी ‘वॅसलिन’ असं निश्चित केलं. या नावाबाबत दोन गोष्टी सांगितल्या जातात. एक अशी की, रॉबर्ट यांना हे नाव स्वप्नात सुचलं, तर काहींच्या मते पाण्यासाठी वापरला जाणारा जर्मन शब्द ‘वेसर’ आणि ऑलिव्ह तेलासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द ‘इलीऑन’ याच्या मिश्रणातून रॉबर्ट यांनी हा शब्द निर्माण केला. यातील दुसरी गोष्ट सयुक्तिक वाटते.
१८७० मध्ये वॅसलिन विक्रीसाठी एक ब्रॅण्ड म्हणून सिद्ध झालं, पण लोकांना माहितीच नसणारा प्रकार विकणं आव्हानात्मक होतं. रॉबर्ट त्या काळी स्वत: छोटय़ा बरण्यांत वॅसलिन भरून एका घोडय़ाच्या बग्गीतून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वॅसलिन फुकट वाटत असतं; पण त्यांचा आग्रह होता की, याचा फायदा होतोय का नाही किंवा काही वेगळा अनुभव असल्यास मला येऊन सांगा. थंड हवेच्या प्रदेशात ही नवी जेली अनेकांना वरदान वाटली. गंमत म्हणजे रॉबर्टने फक्त कापणं, भाजण्याच्या जखमा समोर ठेवून प्रचार केला तरी लोकांनीच वॅसलिनचे अनेकविध फायदे शोधून रॉबर्टपर्यंत पोहोचवले. महिला वर्गाने कळवलं की, वॅसलिन लाकडी वस्तूंना लावलं की त्या चकचकीत होतात. शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगताना वॅसलिनमुळे शेतकी अवजारं गंजत नसल्याचं कळवलं. जलतरुणपटूंना संपूर्ण अंगाला वॅसलिन लावून पाण्यात उतरणं फायद्याचं वाटलं, स्कायडायव्हर्सना ते तोंडावर लावणं सयुक्तिक वाटलं, बेसबॉल प्लेअर ते ग्लोव्ह्जला लावत ज्यामुळे ते चामडं मऊ राहात असे. असे विविध फायदे कळत गेले. वॅसलिनला मागणी वाढली. रॉबर्टने काही विक्रेते नेमून नव्या १२ बग्गी विक्रीसाठी घेतल्या. फुकट मिळणाऱ्या वॅसलिनकरता लोक एक-एक पेनी मोजू लागले.
या दरम्यान काही घटना अशा घडल्या, की महिन्याभराच्या सामानात वॅसलिन अत्यावश्यक गोष्ट म्हणून घरी येऊ लागलं. १९१२ मध्ये न्यूयॉर्क इथे इन्शुअरन्स कंपनीला लागलेल्या भयानक आगीत जखमी, भाजलेल्या मंडळींवर उपचार करताना रुग्णालयांनी वॅसलिनचा वापर केला. त्यामुळे ते ‘इस्पितळ दर्जा’चं उत्पादन मानलं जाऊ लागलं. रॉबर्ट पेरी या संशोधकाने उत्तर ध्रुव गाठल्यावर तिथे कोरडय़ा पडणाऱ्या त्वचेवर वॅसलिन कसं कामी आलं याची महती सांगितली आणि वॅसलिनमुळे त्वचा मऊ सूत राहण्याचा अनुभव घेतलेल्या राणी व्हिक्टोरियाने या बहुमूल्य संशोधनासाठी रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू यांचा शाही सन्मान केला. या सगळ्या घटनांचा परिणाम असा झाला की, वॅसलिनची कीर्ती अतिथंड देशांत पसरत नंतर जगभरात पोहोचली. रॉबर्ट यांना ९६ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी वॅसलिनची प्रगती स्वत: पाहिली.
युनिलिव्हर कंपनीने हा ब्रॅण्ड विकत घेतला आहे. वॅसलिनची टॅगलाइन आहे ‘द हिलिंग पॉवर ऑफ वॅसलिन’.. दर ३९ व्या सेकंदाला जगभरात कुठे ना कुठे वॅसलिन टय़ूब विकली जाते. अजून तरी या पेट्रोलियम जेलीला कोणताही प्रतिस्पर्धी नाही. वॅसलिन एकहाती सत्ता गाजवतंय.
भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते. वॅसलिनची छोटय़ात छोटी डबी काढून वॅसलिनची रेघ कोरडय़ा ओठांवर फिरवणारी मंडळी तर अनेक. आज वॅसलिन अनेक रूपांत मिळतं, पण थंडीमुळे आलेला हातांचा, चेहऱ्याचा, ओठांचा कोरडेपणा पळवून लावण्याचं त्याचं कार्य तेच. डबीत असताना पांढरट रंगाची दिसणारी ती जेली त्वचेवर लागताच तैलरूपात त्वचेला जो मऊ पणा देते तो १४८ वर्षे जुना मृदू मुलायम स्पर्श हेच वॅसलिनचं यश आहे. कोरडय़ा कठोरपणाला वाकवून मृदुता जपणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच विशेष ठरावा.
रश्मि वारंग viva@expressindia.com