वेदवती चिपळूणकर

वाइब्स हा खरंतर वायब्रेशन या शब्दाचा शॉर्ट फॉर्म! वायब्रेशन म्हणजे कंपन, मात्र वाइब्सचा आणि त्या विज्ञानातल्या कंपनांचा दूरान्वयानेही संबंध नाही. या वाइब्सच्या अर्थाचं साधम्र्य थोडंफार वेव्हजच्या अर्थाशी दिसतं. आसपास असणाऱ्या लहरींना ‘वाइब्स’ हा शब्द वापरला जातो. आजूबाजूचं वातावरण, म्हणजे हवामान नव्हे, जसं असेल तशा वाइब्स तरुणाईला जाणवतात. त्या वातावरणाला साजेशी कोणती गोष्ट केली की त्या वाइब्स जाणवतात किंवा वाइब्स जाणवल्यामुळे त्या वातावरणाला साजेशा गोष्टी केल्या जातात.

इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅग वापरताना अनेकदा दुसऱ्या कशाला तरी जोडून वापरला जातो. उदाहरणार्थ, फेस्टिव्ह वाइब्स, पॉझिटिव्ह वाइब्स, वेकेशन वाइब्स, फील गुड वाइब्स, पार्टी वाइब्स इत्यादी. या वाइब्स येण्यासाठी काही विशिष्ट घडावं लागतं असं नाही, तर या वाइब्स काहीही न घडताही येऊ  शकतात. एक फेस्टिव्ह वाइब्स सोडता बाकी कोणत्याच वाइब्स काळाशी बांधलेल्या नाहीत. या वाइब्सप्रमाणे काही वेळा सोशल वर्कच्या वाइब्स, अभ्यासाच्या वाइब्स, परीक्षेच्या वाइब्सही येतात, अर्थात अपवादानेच! या अपवादात्मक वाइब्स अर्थात काही काळापुरत्याच टिकतात. शब्दश: त्यांना ‘लहरी’ म्हणता येऊ  शकतं, ज्या अल्प काळासाठी टिकतात आणि निघून जातात. तरुणाईच्या स्वभावाप्रमाणे या लहरी असतात. एका क्षणाला एक तर दुसऱ्या क्षणाला वेगळी! सतत बदलणाऱ्या या वाइब्स हा मुख्यत: केवळ एक ट्रेण्ड आहे.

प्रत्येक गोष्ट मोठी करून पाहणाऱ्या आणि शेअर करावीशी वाटणाऱ्यांना या वाइब्स जास्त जाणवतात तर इण्ट्रोवर्ट लोकांना या वाइब्स कमी प्रमाणात जाणवतात. या वाइब्समध्ये सोशल मीडियाचा मोठा सहभाग असतो. सोशल मीडियावर इतरांचे फोटोज, अपडेट्स पाहून संसर्गजन्य रोगासारखी या वाइब्सची अनेकांना लागण होते. एखाद्या मुलाला किंवा मुलीला या वाइब्स तेव्हाच जाणवतात जेव्हा काही सेलेब्रिटी त्या निर्माण करतात, आसपासचे मित्रमैत्रिणी त्या वाइब्स फॉलो करतात आणि इन्स्टाग्रामवर त्या ‘ट्रेण्ड’ बनतात !

या वाइब्सचं खरं छुपं कारण म्हणजे फोटोज ! जेव्हा स्वत:चे फोटो चांगले येतात तेव्हा लोकांना या वाइब्स वगैरे जाणवतात. जेव्हा एखाद्या सणाला एकही फोटो चांगला आलेला नसतो तेव्हा या फेस्टिव्ह वाइब्स जाणवत नाहीत, मात्र एखाद्या दिवशी नुसता साधा सेल्फी चांगला आला तरी लगेच गुड हेअर वाइब्स, मॉर्निग वाइब्स, कॅण्डिड वाइब्स वगैरे जाणवायला लागतात. चांगले आलेले फोटोज पोस्ट करायला काहीतरी कारण पाहिजे म्हणून या वाइब्सची निर्मिती अनेकदा होते. पण चलता है ! या दिवाळीला फेस्टिव्ह वाइब्स घेऊ न एन्जॉय करा!

viva@expressindia.com

Story img Loader