पंकज भोसले
दुसऱ्या महायद्धानंतरच्या तीनेक दशकांमध्ये अमेरिका प्रबळ राष्ट्र बनले. त्यात आर्थिक भरभराटीचा घटक जितका महत्त्वाचा तेवढाच सांस्कृतिक भागाचा वाटाही मोलाचा आहे. नवसाहित्य, नवपत्रकारिता आणि त्याच जोडीला सांगीतिक प्रयोगांनी जगभरातील तरुणाईत अमेरिकी स्वप्नांची उभारणी केली. महायुद्धात ढेपाळलेल्या जपानने जॅझ संगीतातील दर्दीपणा जोपासला. चीन, दक्षिण कोरिया आणि इतर राष्ट्रांमध्ये भारताप्रमाणेच ब्रिटिश मिशनऱ्यांनी पहिले पाय रोवले, पुढे ब्रिटिश आणि अमेरिकी संगीताची पारायणे करून या देशांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय आणि लोकप्रिय संगीत तयार केले. सहा वर्षांपूर्वी साय नावाच्या दक्षिण कोरियाच्या झंझावाताने ‘गन्नम स्टाइल’ या गाण्याने यूटय़ूबवर विश्वविक्रम करून आपल्या स्थानिक भाषेतील गाण्याला प्रत्येक देशांत गाजविले. शब्द न समजताही ते देशोदेशीच्या कानाकोपऱ्यांमध्ये वाजत राहिले. दक्षिण कोरियामध्ये आधीच पॉप संगीताची फॅक्टरी होती. त्यांना सायच्या लोकप्रियतेने सीमेपारची वाट दाखविली. जपान, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया यांच्या संगीतामध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ दिसतो. मूळ ताल आणि तंतुवाद्यांचा वापर करून तयार होणारा ध्वनिपरिणाम या संगीतामध्ये शब्द कळण्याची आवश्यकता त्यांच्या परदेशी श्रोत्यांसाठी ठेवत नाही. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी कोरियन पॉप गाण्यांच्या चालींना उतरवून बऱ्यापैकी हिट हिंदी गाणी तयार झाली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण कोरियामधील बीटीएस नावाचा बॉयबॅण्ड वेगवेगळ्या कारणांसाठी गाजतोय. अमेरिकी बॅकस्ट्रीट बॉइज आणि ब्रिटिश बॉयझोनचेच सांप्रत काळातील अवतार असलेला हा सात कलाकारांचा बॅण्ड आजघडीला जगातील सर्वात मोठा पॉप बॅण्ड म्हणून ओळखला जात आहे. केशभूषा, वेशभूषा आणि गाणी सादरीकरणातील सनृत्य विशेष हातोटी या बळावर या बॅण्डने बिलबोर्ड यादीमध्ये आपले विशेष स्थान पटकावले आहे. इतकेच नाही, तर देशोदेशी या बॅण्डचे सांगीतिक जलसे घडत आहेत. त्यांनी आपल्या सादरीकरणादरम्यान वापरलेल्या टी-शर्ट्स आणि टोप्यांवरील चिन्हांवरून जपान-अमेरिकेमध्ये खळबळ माजली आहे. तरी या बॅण्डचे बिलबोर्ड यादीतील स्थान एका गटातील अढळपद सोडायला तयार नाही.
गन्नम स्टाइल इतकी त्यांची गाणी आपल्याकडे सर्वाना माहिती नाहीत. आयडॉल, ब्लड-स्वीट अॅण्ड टीअर्स, फायर ही गाणी ऐकलीत तर पाश्चिमात्य संगीत आपल्यात मुरवून या बॅण्डने कोरियन छापाची गाणी कशी तयार केलीत याचा अंदाज येऊ शकेल. ही सगळीच गाणी नृत्यप्रेरक आहेत. या बॅण्डचे व्हिडीओ पाहिल्यास त्याची खात्री पटेल अन् त्याखाली असलेल्या हिट्सची संख्या मोजण्यास एकक, दशकांची परिमाणे अपुरी पडायला लागतील. कानांची चवबदल म्हणून हा बॅण्ड जसा ऐकायला हवा तसेच जपानी इलेक्ट्रॉनिक संगीतातील उत्तम गाणीही ऐकायला हवीत. पापरिका नावाच्या एका चित्रपटातील गाणी हा त्यासाठी पहिला पाडाव मानता येईल. या चित्रपटाची कथा स्वप्नांमधील जगताला महत्त्व देणारी असल्यामुळे तो परिणाम साधण्यासाठी ‘द गर्ल इन ब्याकोया’ हे गाणे तयार केले आहे. इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि समूह गायन यांचा अद्भुत मिलाफ या गाण्यात झाला आहे. आपल्याला जपानी शब्द समजत नसल्याने वाद्यसंगीत म्हणून जरी हे ऐकले, तरी आवडण्याची खात्री आहे. याच चित्रपटातील परेड साँग हे देखील आधीच्या गाण्याचे विस्तारित आणि चित्रपटातील दृश्यांना अधिक न्याय देणारे गाणे आहे.
जॉनी टो या हाँगकाँगच्या चित्रकर्त्यांने गेल्या दशकात काही सर्वोत्तम गँगस्टर चित्रपट बनविले आहेत. पैकी गँगस्टर्सच्या कारवायांना सांगीतिक मुलामा देणाऱ्या स्पॅरो नावाच्या चित्रपटातील संगीत आपल्या कानाचा आणि मनाचा पिच्छा बरेच दिवस सोडणार नाही, इतके सुंदर आहे. ‘पिकपॉकेट्स’ हे चिनी पारंपरिक वाद्य, शिटी आणि मानवी गुणगुणण्याच्या आधारे केलेले गाणे खासच आहे. पिकपॉकेट्स इन डिसगाइझ्ड हे आणखी एक अनोखे धून प्रकरण आहे. जॅझ आणि पारंपरिक चिनी संगीताचे एकत्रीकरण करून कानांना सुखावण्यासाठी या रचना तयार करण्यात आल्या आहेत. एण्ड थीम या नावाची अवघ्या दीड मिनिटांची रचना आहे. त्यातही ड्रम्सचा जो परिणाम साधला आहे, तो अनुभवायलाच हवा. आपल्याकडे दशकोनुदशके पाश्चात्य संगीताचा प्रभाव हा त्यांच्या चाली किंवा संगीत तुकडे पळविण्यापुरता मर्यादित राहिला. त्या धर्तीवर पाश्चात्त्यांच्या तोडीचेच ओरिजनल संगीत तयार करून त्यांना ऐकवण्याची मजल मारणाऱ्या पूर्वेकडच्या या पाश्चात्त्यांना कानात सामावून घेतल्यास ताज्या संगीत प्रवाहातील थोडेसे ज्ञान आपल्यालाही प्राप्त होईल.
viva@expressindia.com