शिक्षणव्यवस्था आणि प्रत्यक्ष जगणं यात तफावत असते असं प्रत्येकजण म्हणतो. दिल्ली विद्यापीठाने हे खोडून काढण्यासाठी साहित्याच्या सिलॅबसात काही बदल केलेत. यातल्या एका बदलाने ‘व्हायरलत्व’ पटकावलंय.
राजधानी दिल्ली म्हणजे लईच व्हायब्रंट. इथली विद्यापीठं आणि कॉलेजं तर अभ्यासापेक्षा निवडणुकांसाठी प्रसिद्ध आहेत. सिलॅबस, नोट्स, असाइनमेंट, परीक्षा यामधून डोकं वर काढायला फुरसत नाही अशी आपल्यासारख्यांची परिस्थिती. या मंडळींना कट्टे, चर्चा, परिसंवाद, भाषणबाजी, राडे अशा कृतिशील उपक्रमांना वेळ तरी कसा मिळतो याचे आम्हास कोण अप्रूप. साध्या कॉलेज इलेक्शनच्या सभेला तमाम बूमधारी मीडियानं जमावं म्हणजे विचार करा तुम्ही. प्रॉस्पेक्ट्स नामक माहितीपुस्तिकेत बहुतांशी कोर्सेससमोर व्यवसायाभिमुख असं नोंदलेलं असतं. अकॅडमिक कोर्सचा व्यवसाय कसा झाला हा अर्थ घ्यावा की कोर्स केल्यावर व्यवसाय कसा करता येईल याची पाठशाळा समजावी या द्विधा मन:स्थितीत आम्ही अनेकदा पडतो.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली विद्यापीठाने बी.ए. – इंग्रजी लिटरेचर अभ्यासक्रमाचा सिलॅबस बदलला. सिलॅबस बदल हा तांत्रिक मामुली बदल. बरं आम्ही पडलो ‘जर्नलिझम इज लिटरेचर इन हरी’वाले. आमची साहित्यिक फांदी वेगळी पडते. पण गावभर बभ्रा अर्थात सोशल मीडियावर व्हायरलत्व मिळाल्याने हा सिलॅबस बदल जाणून घेणं क्रमप्राप्त झालं. तो बदल पाहून आमच्या रोमारोमात सकारात्मकतेची लाट उसळली जणू. पॉप्युलर फिक्शन या सदराअंतर्गत आदरणीय चेतनजी भगत यांचं ‘फाइव्ह पॉइंट समवन’ अभ्यासक्रमात लागू करण्यात आलं आहे. आनंदातिरेक होईल असं पुढचं नाव म्हणजे जे.के. रोलिंग ताईंचं हॅरी पॉटर.
लेखक म्हणजे य:कश्चित जमात ही प्रतिमा पुसण्याचं मोलाचं काम चेतनजींनी केलं आहे. खादीचा कुडता, खांद्याला शबनम, त्यात लिखाणाचं बाड, दाढीचे खुंट वाढलेले, प्रकाशकांचे उंबरे झिजवून साभार पोच मिळालेला, व्यवहारी जगणं कठीण झालेला इसम म्हणजे लेखक महाशय असं चित्र खिळे ठोकून मनात पक्कं झालेलं. चेतनजींनी प्रयत्नपूर्वक प्रस्थापित समजाला धक्का दिला. आयआयटी दिल्लीचे मेकॅनिकल इंजिनीअर आणि आयआयएममधून एमबीए झालेला माणूस पूर्णवेळ लेखक होतो. किती धाडसाची गोष्ट! भिकेचे डोहाळे लागलेत का अशी टीका होऊनही ते लिहिते झाले. खात्यात बक्कळ पैसा होता म्हणून जमलं हे खरं असलं तरी बाकी पेशेही होतेच की ट्राय करायला. मुळात त्यांनी काय लिहिलं हे महत्त्वाचं नाही. कम्प्युटर प्रोगॅम्स लिहिण्याऐवजी ते ह्य़ुमन इंटरेस्ट स्टोरीज रचू लागले हा पेंडय़ुलम शिफ्ट किती आश्वासक. पॅकेज, फॉरिन हॉलिडे, लक्झरी कार, पेंटहाऊस यांच्याबरोबरीने त्यांनी प्लॉट, कॅरेक्टर्स, क्लायमॅक्स यांना प्राधान्य दिलं हे त्यांचं योगदान. साहित्यात होणारे बदल म्हणजे कोंबडी आधी की अंडं टाइप्स आहे. मैत्री, लव्ह-इश्क-मोहब्बत, रिलेशनशिप्सचे गुंते अशा जटिल मुद्दय़ांना चेतनजींनी लिखाणातून हात घातलाय. साहित्याचे बॉलीवूडीकरण केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. मला सांगा- जुहूला गेल्यावर ‘मन्नत’ समोर सेल्फी काढायचा मोह होतो की नाही तुम्हाला? मग झालं तर. कथेचा बाज, शैली या गोष्टी कमी-जास्त होत राहतात. पुस्तक लिहिण्यापेक्षा ते खपवण्याची कला किती कळीची आहे. चेतनजींनी ही रुजवात केली.
वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ किती मोलाचं पुस्तक आहे पण त्याच्यापेक्षा ‘माझं चीज कुणी हलवलं’ (हू मूव्ह माय चीज) हे भीषण भाषांतरित सेल्फ हेल्पचं पुस्तक जास्त खपतं. शिक्षणव्यवस्थेवर अचूक भाष्य करणाऱ्या ‘निशाणी डावा अंगठा’पेक्षा आपल्याला जपानी ‘तोतोचान’चं कौतुक असतं. न्यूनगंड बाजूला सारत विपणीय होण्याचं कसब त्यांनी अंगीकारलं. त्यांचं लिखाण आणि ते सदैव ट्रेण्डिंग असतात. जगण्याच्या समृद्ध अडगळीत रमण्यापेक्षा ते सतत झोतात राहतात. दग्धभू, व्यामिश्र अशा तरुणांना भोवळ येईल अशा जडजंबाळ जारगनऐवजी ते सैल, सोपी बोली भाषा वापरतात. बरं कथाही अशी गुंफतात की त्यातून चित्रपट निर्माण व्हावा. ‘थ्री इडियट्स’चं उदाहरण बघा. मराठीत रारंगढांगाची गोष्ट प्रभाकर पेंढारकरांनी खुबीने मांडलीय. या पुस्तकावर चित्रपट तयार होतोय असं ऐकलेलं. ऑडिओ बुक आलं पण चित्रपट काही थिएटपर्यंत अद्याप तरी पोहचलेला नाही.
इंग्लिश तसंच भाषिक लेखकांसाठी असा आयता डेमो दिला चेतनजींनी. आपली संस्कृती महान आहे, यांनी भ्रष्ट चित्रण केलंय असा वाग्बाण सोडला जातो. घरात शौचालय नाही पण स्मार्टफोन आणि गाडी आहे अशी गावं आहेत आपल्याकडे. कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारता राव! किंडल (मेणबत्ती नव्हे, पुस्तकं वाचण्यासाठीचं गॅझेट आहे) वापरणारा, ब्रँडेड कपडे परिधान करणारा, कारमधून फिरणारा, पंचतारांकित हॉटेलात वावरणारा लेखक किती छान वाटतो ना- लेखकरावाला कॉर्पोरेट रुपडं देण्यात चेतनजींचा वाटा सिंहाचा आहे. साहित्यातील ‘पॉप्युलर कल्चर’चा अभ्यास करायचा चेतनजींच्या साहित्याला वगळून पुढे जाता येणार नाही. मुंबईत रोहिंन्टन मिस्त्रींचं ‘सच अ लाँग जर्नी’ अभ्यासक्रमात होतं. राजकीय दबावामुळे ही जर्नी अभ्यासातून संपुष्टातच आली. फाइव्ह पॉइंट समवनचा समावेश केल्यावरही टीकेचे बाण सुटू लागले आहेत. पण तूर्तास दिल्ली विद्यापीठ ठाम आहे. वाचकाला फँटसीविश्वात घेऊन जाणाऱ्या रोलिंग ताईंच्या बरोबरीने चेतनजींच्या पुस्तकाचा समावेश व्हावा हा मोठाच सन्मान. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असं म्हणतात. त्यासाठी हा चेतनांक. .
viva@expressindia.com