हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
एखादं उत्पादन वर्षांनुवर्षे विकलं जात असतं पण त्या उत्पादनाला थोडा नावीन्याचा स्पर्श होताच निर्माण होतो एक ब्रॅण्ड. आइसक्रीम ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही पण त्याच आइसक्रीमला कोनमध्ये गुंडाळून चालता बोलता खायचं स्वातंत्र्य मिळणं हे वेगळेपण आहे. ‘कॉर्नेटो’ने नेमकं तेच केलेलं दिसतं.
फ्रोझन डेझर्ट वर्गातला युनिलिव्हर कंपनीचा एक मोठा ब्रॅण्ड म्हणजे ‘कॉर्नेटो.’ एक काळ असा होता जेव्हा आइसक्रीमसारखा थंडगार पदार्थ कोनमध्ये गुंडाळून देणं जवळपास अशक्य होतं. कारण आइसक्रीममुळे बाहेरचा कोन ओला होऊन जाई. पण १९५९ मध्ये ‘स्पाईका’ नामक इटालियन आइसक्रीम विक्रेत्याने ही आयडियाची कल्पना करून पाहिली. तेल,साखर, चॉकलेटच्या अचूक मिश्रणातून त्याने वॅफल कोन तयार करत आत हे थंडगार आइसक्रीम ठेवलं. तेच हे कॉर्नेटो. आइसक्रीम खाण्याच्या पद्धतीची गणितंच यामुळे बदलून गेली.
‘कॉर्नेटो’ या शब्दाचा अर्थ आहे छोटे शिंग. या नावाचा आणि आइसक्रीम कोनाचा संबंध आपण आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे जोडू शकतो. हे कोन २८ मिली ते अगदी २६० मिलीचा किंग कोन अशा वैविध्यतेसह उपलब्ध आहेत.
गंमत म्हणजे हा ब्रॅण्ड युनिलिव्हरकडून विविध देशांत विविध कंपन्यांशी हातमिळवणी करत विकला जातो. म्हणजे भारतात जसं ‘क्वॉलिटी वॉल्स कॉर्नेटो’ आहे तसं इटलीत ‘अलगिदा’, युकेमध्ये ‘वॉल्स’, आर्यलडमध्ये ‘एचबी’, स्पेनमध्ये ‘फ्रिगो’ ही नावं ‘कॉर्नेटो’ला जोडली गेली आहेत. या नावाप्रमाणेच विविध देशांत चवही बदलते म्हणजे दुधाचं आइसक्रीम ते व्हेजिटेबल फॅटवर बेतलेलं डेझर्ट असं वैविध्य आहे. स्ट्रॉबेरी, मिंट, चॉकलेट, नट्स, लेमन अशा विविध स्वादात हे आइसक्रीम मिळतं. ‘कॉर्नेटो’ सॉफ्ट मात्र तिथल्या तिथे विक्रेता तयार करून देतो. यातील कॉर्नेटो एनीग्मा हा प्रकार म्हणजे कुकी आणि क्रीम यांचं मिश्रणच! जगभरातील आबालवृद्धांना ‘कॉर्नेटो’ पसंत आहे.
आइसक्रीम खाणं हे कधीही आनंददायीच पण कपातलं आइसक्रीम वितळत जातंय या चिंतेत झटपट संपवावं लागतं. कोनमधलं आइसक्रीम खाताना तो स्वाद आणि थंडावा आत आत झिरपवायला किमान अवधी मिळतो. जिभेच्या टोकाने आइसक्रीम उचलून दातांनी कोनचा चावा घेत आपण जो काही अनुभव घेतो तो अवर्णनीय असतो.. आइस्क्रीमचा कमी होत जाणारा गोळा आणि कोनचा आकार यांच्यात संतुलन राखणं हे आणखी एक आव्हान! पण त्या कोनच्या शेवटाकडे मिळणाऱ्या चॉकलेटी तुकडय़ासाठी आपली काहीही करायची तयारी असते. एक प्रकारे ती आनंदाची सवारीच. त्यामुळे ‘कॉर्नेटो’ची टॅगलाईन अचूक आहे. एन्जॉय द राईड, लव द एन्डीग. चॉकलेटी वेटोळ्यातून तयार होणारा ‘कॉर्नेटो’ लोगोही या आनंदाच्या सवारीची ग्वाही देणारा.. भर उन्हाळ्यात हा गारेगार अनुभव घ्यायला मुहूर्ताची गरजच नाही.
viva@expressindia.com