हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
Rahul Gandhi Deekshabhoomi visit
राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट, अभ्यागत पुस्तिकेत लिहिला ‘हा’ संदेश… त्याची सर्वत्र चर्चा

सध्याच्या काळात जाहिरातबाजीशिवाय ब्रँडिंग किंवा बाजारपेठेत स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर बहुतांश वेळा ‘नाही’ असंच येईल. पण याला अपवाद ठरणारे काही ब्रॅण्ड्स आहेत. त्यातील एक म्हणजे फॅब इंडिया. हातमागावरील अस्सल भारतीय वस्त्रप्रावरणांसाठी सुप्रसिद्ध असा हा ब्रॅण्ड. या ब्रॅण्डची भारतीय मातीशी असलेली नाळ पाहता एका अभारतीय माणसाने हा ब्रॅण्ड निर्माण केला आहे यावर विश्वास बसत नाही. पण एका वेगळ्या निमित्ताने भारतात आलेल्या गुणग्राहक अमेरिकन व्यक्तिमत्त्वाकडून निर्माण झालेल्या या ब्रॅण्डची ही कथा.

जॉन बिसेल हे अमेरिकेतील ‘फोर्ड फाऊंडेशन’ या कल्याणकारी संस्थेसाठी काम करत होते. याच संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण लघुउद्योग विकास कार्यक्रमांतर्गत भारत सरकारचे साहाय्यक सल्लागार म्हणून ते भारतात आले. त्यानिमित्ताने भारतातील ग्रामीण भागातील हातमाग व्यवसाय, हस्तकला, कशिदाकारी यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला. सुती कापड जरी म्हटलं तरी राजस्थानपासून कर्नाटकापर्यंत किंवा आसामपासून कोलकात्यापर्यंत, आंध्पर्यंत या सुती, रेशमी किंवा हातमागावर विणलेल्या कपडय़ांची स्वत:ची अशी एक खासियत आहे हे जॉन यांच्या लक्षात आलं. पहिली दोन वर्षे या कापड कारागिरांसोबत काम करताना त्या ग्रामीण कारागिरांना अनुदान देत आपला माल निर्यात कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं. १९६० मध्ये याच ग्रामीण व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला तोच हा फॅब इंडिया!

सुरुवातीला दिल्लीमधल्या राहत्या दोन खोल्यांच्या घरात या व्यवसायाला सुरुवात झाली. कपडय़ांच्याही आधी भारतीय बनावटीच्या होम फर्निशिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. या दरम्यान एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरशी त्यांची गाठभेट झाली आणि फॅब इंडिया या वस्त्रोद्योगास सुरुवात झाली. आजारी आजीकडून वारसा हक्काने मिळालेले वीस हजार डॉलर्स त्यांनी या स्टार्टअपसाठी वापरले. फोर्ड फाउंडेशनसाठी केलेल्या कामामुळे त्यांचा कारागिरांशी उत्तम संपर्क होताच.  विविध राज्यांतील विणकरांना भेटत गुणवत्ता, सातत्य आणि उत्तम फिनिशिंग याबद्दलचे निकष त्यांनी अधोरेखित केले आणि काम करवून घ्यायला सुरुवात केली. पारंपरिक कलाकारांना त्यांनी उत्तम चालना दिली. दिल्लीत फॅब इंडियाचं पहिलं आउटलेट सुरू झालं. १९७५ मध्ये आणीबाणी काळात घरातून व्यवसाय चालवण्यावर आलेल्या र्निबधांमुळे जॉन यांनी स्वतंत्र ऑफिस थाटलं. १९७६ मध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने परदेशी नागरिकांच्या भारतीय व्यवसायातील समभागांवर बंधनं घातल्यामुळे जॉन बिसेल यांना त्यांचे खास मित्र मधुकर खेरा यांना व्यवसायात सामावून काही भाग द्यावा लागला. त्याचा व्यवसायावर मात्र काही परिणाम झाला नाही. विविध राज्यांतील हातमागावर आधारित वस्त्रोद्योगाला नवा स्पर्श मिळत राहिला. ६६ व्या वर्षी जॉन बिसेल यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विल्यम बिसेल यांनी व्यवसायाची धुरा स्वीकारली आणि व्यवसायाचा विस्तार केला.

आज २१ राज्यांतील जवळपास ४०,००० कारागिरांना फॅॅब इंडियाने सामावून घेतले आहे. दोन खोल्यांच्या घरात सुरू झालेला व्यवसाय २५० आउटलेट्समधून भारतात आणि भारताबाहेर विस्तारत गेला आहे. दुबई, बहारीन, दोहा, रोम, इटली, चीन अशा विविध देशांतील शहरांत हा ब्रॅण्ड भारतीय हातमाग कलेचा वारसा घेऊन पोहोचला आहे. या ब्रॅण्डची दोन खास वैशिष्टय़े जाणवतात. अशा कुठल्याही व्यवसायात हातमागावर विणलेल्या कपडय़ांच्या प्रत्यक्ष किमतीमधील फक्त ५% रक्कम त्या विणकराला मिळते, पण कारागिरांची समभागधारक पद्धती राबवत हेच प्रमाण फॅब इंडियाने २६% इतकं केलं आहे. खऱ्या अर्थाने भारतीय ग्रामीण कारागिरांना योग्य रोजगार यातून प्राप्त होतोय. आणि दुसरं वैशिष्टय़ म्हणजे टीव्ही, रेडिओ अथवा वर्तमानपत्रांतून जाहिरातबाजी न करता केवळ आणि केवळ गुणवत्ता तसंच मौखिक प्रसिद्धी या जोरावर गेली ५८ वर्षे हा ब्रॅण्ड यशस्वी ठरला आहे. असं उदाहरण विरळाच!

एका अभारतीय माणसाने भारतीय कारागिरांसाठी कोणताही गाजावाजा न करता चालवलेली ही चळवळ विशेष आहे. भारतीय हातमागाचा संपन्न अनुभव फॅबमधले कपडे साध्याशा पण सुंदर पद्धतीने देतात. हे कपडे भरजरी नाहीत. इथल्या कुर्ती, कॉटन किंवा सिल्क कुर्ते, शर्ट्स ‘साधेपणातील सौंदर्य’ दर्शवतात. काळानुरूप पलाझो, स्कर्ट्स यांची श्रेणीही इथे उपलब्ध आहे. पण एकूण सगळं कसं साधेपणात सौंदर्य शोधणारं! काही वर्षांपासून इथे पारंपरिक आर्टिफिशल ज्वेलरीसुद्धा उपलब्ध केली गेली आहे. त्याव्यतिरिक्त ऑर्गॅनिक फूड, बॉडी केअर अशा क्षेत्रांतही फॅब इंडियाने प्रवेश केला आहे.

भारतीय नसून तळागाळातील भारतीय कारागिरांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जॉन बिसेल यांचा हा ब्रॅण्ड म्हणतो, सेलिब्रेट इंडिया! खरंय.. हजारो वर्षांपासून भारतीय मातीत रुजलेल्या हातमाग कलेचा, त्या कारागिरांच्या कल्पकतेचा धाग्याधाग्यात गुंफलेला कलाविष्कार साजरा व्हायलाच हवा. फॅब इंडिया सेलिब्रेट्स इंडिया!!

viva@expressindia.com