हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
आपल्या ग्राहकांची गरज ओळखून त्यांना नेमकं ते देता येणं ही कुठल्याही चाणाक्ष ब्रॅण्डची नीती असते. म्हणजे बाजारात १०० साबण उपलब्ध असतील तर त्यात पिंपल्सवर काहीतरी परिणामकारक ग्राहकांना हवं आहे हे नेमकं ओळखून तसा साबण आणणारा हुशार ठरतो. असा हुशार पण उपयुक्त शाम्पू ब्रॅण्ड म्हणजे प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल कंपनीने आणलेला हेड अॅण्ड शोल्डर्स.
बाजारात नेमकी कशा प्रकारच्या शाम्पूची गरज आहे याचं सर्वेक्षण करताना प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल कंपनीच्या हे लक्षात आलं की ५०% लोकांना कोंडा किंवा डोक्याच्या त्वचेशी निगडित काही ना काही समस्या असतात. त्यावर उपाय म्हणून हा शाम्पू कंपनीने आणला. झिंक प्युरीथिऑन या मुख्य घटकाच्या वापरासह जवळपास २०० वेळा विविध चाचण्या करून तो बाजारात उपलब्ध केला गेला, तोच हा हेड अॅण्ड शोल्डर्स.
केसातील कोंडा खांद्यावर पडल्याने चारचौघात होणारी नामुष्की आणि त्यावरचा उपाय म्हणजे हा शाम्पू या अर्थाने हेड अॅण्ड शोल्डर्स हे नाव सार्थकी लागते. कंपनी वरील विश्वासामुळे हा शाम्पू ग्राहकांना खात्रीशीर वाटला. त्यात या उत्पादनाने ग्राहकांच्या मनातील अस्वस्थता व्यवस्थित हेरत आपले कॅम्पेन्स राबवले. खांद्यावरील कोंडा ही ओशाळवाणं करणारी गोष्ट आहे त्यामुळे ‘यू नेव्हर गेट सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन’ ही हेड अॅण्ड शोल्डर्सची सुरुवातीच्या काळातील टॅगलाइन खूप काही सांगणारी होती. कंपनी वरील विश्वास, ग्राहकांना नेमकं ते देणं आणि अचूक मार्केटिंग या जोरावर १९८१पर्यंत हेड अॅण्ड शोल्डर्स हा नंबर वन शाम्पू ठरला.
भारतात १९९७ साली या शाम्पूने प्रवेश केला. कंपनीच्या इतर उत्पादनांवरील विश्वासामुळे भारतातही या शाम्पूला यश मिळालं. २००० साली मात्र या ब्रॅण्डची यशस्वी घोडदौड थोडी मंदावली. त्या मागची कारणं ब्रॅण्डिंगचा अभ्यास करणाऱ्या मंडळींसाठी विचार करायला लावणारी आहेत. हेड अॅण्ड शोल्डर्स या ब्रॅण्डने तोपर्यंत स्वत:ची जवळपास ३० विविध प्रकारची उत्पादनं निर्माण केली. एकाच नावाच्या या इतक्या वैविध्याने ग्राहक गोंधळला. कधी कधी खूप सारे पर्याय मिळाले की आपल्याला त्यातलं काहीच नको अशा निर्णयाप्रत आणतात. तसंच काहीसं हेड अॅण्ड शोल्डर्सचं झालं. वैविध्याच्या अतिरेकाचा खपावर परिणाम झाला. त्यानंतर यात सुधारणा केली गेली.
आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना या कंपनीने कलाकार, खेळाडू, विविध क्षेत्रातील मंडळींचा मुबलक वापर केलेला दिसतो. भारतात करिना कपूर, सैफ अली खान, रणवीर सिंग हे या उत्पादनाचा चेहरा बनले आहेत. सध्याची हेड अॅण्ड शोल्डर्सची टॅगलाइन आहे ‘डॅण्ड्रफ केअर फॉर ग्रेट लुकिंग हेअर’.
वर्षांनुवर्षांच्या वापराचा चांगला अनुभव त्या उत्पादनाला रोजच्या वापराचा दर्जा देतो. हेड अॅण्ड शोल्डर्स हा अशा नियमित वापराच्या वर्गात मोडतो. दरवर्षी जवळपास २९ लाख युनिटचं उत्पादन हा ब्रॅण्ड करतो. ५८वर्षांत ग्राहकांना बांधून ठेवणं या ब्रॅण्डला शक्य झालं आहे. आपल्याला ओशाळवाणं करणारी उणीव कुणी दूर करतंय म्हटल्यावर आपलं त्या गोष्टीशी नातं जुळणं स्वाभाविक असतं. म्हणूनच हेड ते शोल्डर्स पसरणाऱ्या कोंडय़ाला पळवून लावणाऱ्या या शाम्पूशी आपलं नातं कायमचं जुळलं आहे.
viva@expressindia.com