हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
आपल्या सगळ्यांनाच गतिमान आयुष्य आपल्या हवंय. शहरी माणसाला घडय़ाळाच्या काटय़ावर धावायचंय तर ग्रामीण मंडळी दुर्गम भागातून मुख्य प्रवाहाशी जोडले जायला उत्सुक आहेत. या धावपळीत त्यांना साथ देणारं भूतकाळातील वाहन होतं सायकल आणि आताच्या काळात दुचाकी. सायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प. बाइकसाठी आपल्या कानांना अधिक सुपरिचित नाव हिरो होंडा असं आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुंजाल कुटुंब भाजीचा व्यापार करायचं. फाळणीनंतर ही मंडळी लाहोरहून आधी अमृतसर आणि नंतर लुधियाना इथं आली. सुरुवातीला सायकलच्या स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. नंतर सायकलनिर्मिती उद्योगात मुंजाल ब्रदर्स शिरले. त्या काळी सायकल व्यवसायात बिर्ला आणि हिंद सायकलचा दबदबा होता. पण मुंजाल बंधूंनी जर्मन सायकल चेनमेकिंगचा प्लँट टाकून आपला ब्रॅण्ड निर्माण केला. तीच ही ‘हिरो सायकल’
१९७५ दरम्यान मोपेडचा जमाना सुरू झाला आणि मुंजाल बंधूंनी ओळखलं की, सायकलसोबत दुचाकीचा व्यवसाय भविष्यात महत्त्वाचा ठरणार. त्या काळी टू व्हीलरमध्ये बजाजला पर्याय नव्हता. बजाजने स्कूटरच्या विश्वात स्वत:चं नाव भक्कम केलं होतं. अशा वेळी सायकल व्यवसायातून टू व्हीलरकडे वळण्यासाठी मुंजाल ब्रदर्सना तशा पद्धतीच्या व्यवसायाची पूर्ण माहिती आणि उत्पादनतंत्र अवगत असलेला व्यवसाय भागीदार आवश्यक वाटला. जगभरातील काही महत्त्वाच्या टू व्हीलरची त्या दृष्टीने चाचपणी झाली आणि मुंजाल बंधूंच्या हिरोला जपानच्या होंडा कंपनीची साथ मिळून १९८४ मध्ये निर्माण झालं, टू व्हीलरच्या दुनियेतील एक मजबूत समीकरण. हिरो होंडा मोटरबाइक्स. १९८५मध्ये हिरो होंडाची हण्ड्रेड सीसी मोटरबाइक जपानी तंत्रज्ञानाचा वापर आणि हिरो कंपनीचा मजबूत पाया घेऊन भारतीय रस्त्यांवर अवतरली आणि भारतीय टू व्हीलरच्या जगतात नवा अध्याय रचला गेला.
स्कूटर वापरणाऱ्या भारतीय जनतेला स्टायलिश बाइक्सकडे नेण्याचं बरंचंसं श्रेय हिरो होंडाकडे जातं. हिरो होंडा बाइकने अगदी सुरुवातीपासून कमी किमतीत स्वस्त प्रवासाची ग्वाही दिली. सुरुवातीची जाहिरातच होती, फिल इट, शट इट, फरगेट इट. एकदा इंधन भरा आणि मग चिंताच विसरा हा दिलासा दुचाकीचालकांना मिळाला. १९९३पर्यंत टू व्हीलर निर्यातीत हिरो होंडा कंपनी नंबर वन ठरली होती. २००१पर्यंत भारतासह जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होण्याचा मान हिरो होंडाने मिळवला. आणि मग अनेक भागीदारांत जे घडून येतं तेच इथेही घडलं. २०१० मध्ये होंडा कंपनीने हिरोसोबत असलेली आपली भागीदारी संपुष्टात आणली. तोपर्यंत हिरो कंपनी निश्चितच स्वबळावर उभं राहण्याइतपत सक्षम झाली होती. हिरो सायकल हा ब्रॅण्ड या दरम्यान अत्यंत प्रभावी झाला होता. जगातील सर्वात मोठा सायकल ब्रॅण्ड म्हणून अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. त्यामुळे होंडाने दुचाकी व्यवसायातून अंग काढून घेतल्यावरही हिरोने नव्याने सुरुवात केली. हिरो होंडाचं नामकरण झालं हिरो मोटोकॉर्प. २९ जुलै २०११मध्ये इंग्लंड-भारत यांच्या दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांदरम्यान हिरो मोटोकॉर्पच्या नव्या लोगोचं प्रकाशन झालं.
आज लुधियानाच्या आसपास हिरो मोटोकॉर्पचे ५ प्लांटस् आहेत. त्यात वर्षांला ७६ लाख युनिटनिर्मितीची क्षमता आहे. भारतातील सर्वात मोठा टू व्हीलर ब्रॅण्ड असणाऱ्या हिरोचा संपूर्ण दुचाकी व्यवसायातील वाटा ४६% इतका मोठा आहे. हिरो स्प्लेंडर, हिरो पॅशन, हिरो ग्लॅमर भारतीय रस्त्यांवर खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत.
हिरो आणि होंडाची भागीदारी संपल्यावर नुसतं हिरो तोंडी बसणं जरा कठीण जातंय. अगदी आठ र्वष उलटूनही जय-विरूसारखं हिरो होंडा ओठी येतंच. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पला नव्याने लोगो आणि टॅगलाइनचा विचार करावा लागला. नव्या लोगोमध्ये ‘एच’ हेच अक्षर लाल काळय़ा रंगात दिसतं. ‘कॅन डू’ स्पिरिटचं ते प्रतीक आहे. पूर्वीची ‘वुई केअर’ किंवा मधल्या काळात गाजलेली ‘देश की धडकन’ ही टॅगलाइन आता ‘हम में है हिरो’ हा विश्वास जागवतेय. ए.आर. रहमानने केलेली हिरोअॅन्थम अनेकांच्या लक्षात असेल.
व्यवसाय म्हटला की जोडय़ा जुळतात, तुटतात. त्याचा फायदा किंवा तोटाही होतो. पण या जोडगोळीतून वेगळं होऊनही जो ब्रॅण्ड मोठा होत राहतो तो खरा हिरो. या अर्थाने या ब्रॅण्डकडे पाहत नक्की म्हणता येईल..ये है देश की धडकन..
viva@expressindia.com