हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
गोळ्या, चॉकलेटं खाण्याचा अनुभव जादूई असतो. तोंडात विरघळणारं चॉकलेट वयाचे काटे फिरवून तुम्हाला लहान करतं. पण ज्यांना चॉकलेट म्हणजे निव्वळ चघळणं वाटतं त्यांच्यासाठी एक सोय म्हणजे किटकॅट. आतलं कुरकुरीत बिस्किट आणि वरचं चॉकलेट यांचं हे अनोखं समीकरण जगभरातील मंडळींच्या पसंतीस उतरलं आहे. याच सुप्रसिद्ध चॉकलेट ब्रॅण्डची ही कहाणी.
या चॉकलेटची कहाणी जुळते थेट १८व्या शतकातील एका क्लबशी. लंडनमध्ये साहित्य, राजकारण यांविषयी चर्चा करणाऱ्या मंडळींचा एक खास क्लब होता. त्या सुप्रसिद्ध क्लबचं नाव होतं किटकॅट. सुप्रसिद्ध शेफ क्रिस्टोफर कॅटलिंग तेथे उत्तमोत्तम खाद्यपदार्थ तयार करून खिलवत असे. १९११ मध्ये इंग्लंडमधील यॉर्क भागात राऊनट्रीज कन्फेक्शनरी कंपनीने जेव्हा त्यांचं नवं चॉकलेट आणलं तेव्हा त्यांनी त्या सुप्रसिद्ध क्लबचं नाव चॉकलेटला दिलं किटकॅट. त्यानंतर काही काळ किटकॅटची विक्री होऊन ते कमी प्रतिसादामुळे बंद पडलं. १९३५च्या दरम्यान, त्याचं पुन्हा उत्पादन सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात किटकॅटने आपल्या पाककृतीत थोडा बदल केला. अन्नाचा तुटवडा होता. त्यामुळे डार्क चॉकलेट वापरून किटकॅट बनू लागले. त्यामागचा हेतू हाच होता की डार्क चॉकलेटमुळे दीर्घ काळ भुकेची जाणीव होऊ नये. या काळात किटकॅटला चांगली पसंती मिळू लागली. युद्धानंतर किटकॅट आपल्या मूळ मिल्क रेसिपीकडे वळलं. १९७०पर्यंत हा ब्रॅण्ड बराच विस्तारला. १९८८ मध्ये नेस्टले कंपनीने किटकॅट विकत घेतलं. अपवाद अमेरिकेचा. आजही अमेरिकेत किटकॅटचे हक्क हर्शे नामक कंपनीकडे आहेत. फोर फिंगर्स बार असंच त्याचं दीर्घकाळ स्वरूप होतं. नंतर टु फिंगर्स बार असं छोटं सुटसुटीत रूपही आलं. देशागणिक आकारमान बदलत गेलं. जपानमध्ये हाफफिंगर बारसुद्धा मिळतं तर फ्रान्स, ऑस्ट्रेलियात बारा फिंगर बारचा फॅमिली पॅक मिळतो. काही देशांत किटकॅट आइसक्रीमसुद्धा उपलब्ध आहे. नेस्टलेनं भारत, चीन, मलेशिया या देशांत किटकॅटचं उत्पादन सुरू करून हा ब्रॅण्ड विस्तारला.
किटकॅट ऑरेंज, मिंट, चंकी असे विविध स्वाद जगभरात आवडीने खाल्ले जातात. या ब्रॅण्डचं वैशिष्टय़ म्हणजे १९५८ मध्ये किटकॅटने जी टॅगलाइन आणली तीच थोडय़ा फार फरकाने आतापर्यंत कायम आहे. ‘हॅव अ ब्रेक हॅव अ किटकॅट’, ‘ब्रेकटाइम एनी टाइम’ यातून किटकॅट म्हणजे क्षणभर विश्रांती हे छान ठसवण्यात आलं. चॉकलेट रॅपर आणि ग्राहक यांचंही नातं असतं. जांभळ्या रॅपरचं डेरीमिल्क किंवा चॉकलेटी मेलडी दुकानात गेल्यावर तुमच्या नजरेला ओळखीचं हसू देतं. तसंच किटकॅटचं आहे. ते लाल आवरण आणि आतला चंदेरी कागद आपल्याला बरोब्बर खुणावतो. हजारो चॉकलेट ब्रॅण्डमधून आपलं नाव समोरच्याला लक्षात ठेवायला लावणं आणि सातत्याने हे करत जगभर पसरणं सोपं नाही. ८३ वर्षांच्या वाटचालीत किटकॅटने हे साध्य केलं. त्यात त्याच्या आतील बिस्किटयुक्त कुरकुरीतपणा आणि वरचं दुधाळ चॉकलेटी आवरण याचा महत्त्वाचा वाटा आहे. चघळत्या जिभेला आतलं कुरकुरीत बिस्किट खाऊगिरीचा अनुभव देतोय न देतोय तोच चॉकलेटची मिठास त्यात विरघळते आणि हा कुरकुरीत गोडवा आपल्या मनाचा ताबा घेतो. हातातल्या कामातून त्या स्वादात मिसळणं हा ब्रेकच नव्हे काय? इसलिए किटकॅट ब्रेक तो बनता है बॉस!