हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
हे दिवस ‘आला उन्हाळा तब्येत सांभाळा’ अशा काळजीवजा आरोळ्या विविध माध्यमांतून ऐकू येण्याचे दिवस आहेत. त्यात खास उन्हाळ्याची म्हणून खरेदी करणारी, सुती कपडे, टोप्या अगदी आठवणीने आणणारी मंडळी असतात. या खरेदीच्या यादीतलं महत्त्वाचं नाव म्हणजे नायसिल. घामोळं आणि पहिला पाऊस यांचा जितका छत्तीसचा आकडा तितकंच नायसिलचं घामोळ्याशी अही-नकुल नातं. आज असंख्य प्रिकली हीट पावडर बाजारात उपलब्ध असल्या तरी भारतीयांसाठी घामोळ्यावरची आद्य पावडर नायसिलच. या उन्हाळानाशक ब्रॅण्डची ही कहाणी.
ब्रिटिश ड्रग हाऊसने सर्वप्रथम या पावडरची निर्मिती केली. मात्र त्यामागचा हेतू पूर्णत: वेगळा होता. अॅथलीट मंडळींच्या पायावर टाकण्यासाठी तसंच बेडसोअर्स झालेल्या रुग्णांची जखम लवकर भरून येण्यासाठी या पावडरीचा शोध लागला. १९६८ साली ग्लॅक्सो कंपनीने हा ब्रॅण्ड विकत घेतला. त्यानंतर घामोळंनाशक, शरीराची दरुगधी दूर करण्यासाठी उपयुक्त अशा अर्थाने या पावडरचा प्रचार सुरू झाला. पावडरीतला ‘क्लोरफेन्सीन’ हा घटक अत्यंत प्रभावी असल्याने ही पावडर खरंच रामबाण उपाय ठरली.
अनेकांना नायसिलची जुनी साधी डबी आठवत असेल. आकाशी निळसर रंग आणि त्यावरचं उभ्या रेषांचं झाकण. १९७० च्या आसपास नायसिलच्या जाहिरातींवरचं चित्र खूप प्रसिद्ध होतं. उन्हाने त्रासलेली स्त्री आणि तिच्या पाठीवर काटेरी निवडुंग. १९७३ साली चंदनाचा सुगंध नायसिलने आणला. तरुण शहरी मंडळींना आकर्षित करण्यासाठी १९८८ मध्ये लव्हेंडरचा सुगंध आला. नायसिलच्या जाहिराती नीट पाहिल्या तर लक्षात येतं की, हा ब्रॅण्ड इतका प्रभावी असल्याने त्यांनी सेलेब्रिटी चेहरा जाहिरातीत फारसा झळकवला नाही. घामोळ्याचा मुलांना अधिकतर त्रास होतो हे लक्षात ठेवून आई आणि मुलं यांच्याभोवती बऱ्याचशा जाहिराती फिरत राहिल्या. १९७० च्या आसपास या पावडरची किंमत ६ रु. ६६ पैसे अशी होती. १९९५ मध्ये हेंज इंडियाने हा ब्रॅण्ड विकत घेतला आणि १९९९ मध्ये इतर घामोळंनाशकांच्या तुलनेत पावडरची किंमत आणखी कमी केली. उन्हाळ्यातील हा स्वस्त आणि मस्त पर्याय लोकांच्या पसंतीस उतरला. इतर अनेक नवे ब्रॅण्ड येऊनही नायसिलने स्वत:चे स्थान अबाधित राखले आहे. प्रिकली हीट पावडर वर्गातला ४०% वाटा नायसिलकडे आहे. हा ब्रॅण्ड मार्केट लीडर आहे. ‘नंबर वन घमोरीनाशक’ ही नायसिलची टॅग लाइन यथार्थ आहे. वास्तविक हा वर्षभर चालणारा ब्रॅण्ड नाही. तो सीझनल आहे. एप्रिल ते जुलैला नायसिलचा विशेष खप होतो. हे जास्त आव्हानात्मक आहे. वर्षांचे ठरावीक महिनेच लोकांसमोर येताना लोकांच्या विस्मृतीत जाण्याचा धोका मोठा असतो; पण नायसिल याला अपवाद ठरावा. उन्हाळा आला की लोकांना नायसिलची आठवण होतेच. या ब्रॅण्डची उलाढाल मोठी आहे. भारतासह नेपाळ, नायजेरिया आणि मध्यपूर्व देशांतही हा ब्रॅण्ड जातो. अलीकडच्या काळात इतर ब्रॅण्डना टक्कर देत नायसिलने खूप नवनवे प्रकार बाजारात उपलब्ध केले आहेत. नायसिल डिओ फ्रेश स्किन टाल्क, गुलाबजल पावडर, नायसिल कूल हर्बल हे त्यापैकीच काही.
एसी, कूलरपेक्षा स्वस्त आणि मस्त नायसिलला पर्याय नाही. ही पावडर अंगावर शिंपडल्यावर आधी जाणवणारा खरखरीतपणा, मग तो विशिष्ट सुगंध आणि मग पसरत जाणारा थंड बर्फाळपणा म्हणजे उन्हाच्या तापत्या झळांचा तीव्रपणा कमी करणारा दिलासाच!
viva@expressindia.com