साठोत्तरी काळातील वीसएक वर्षे जगभरातील संगीतयुग हे काही अपवाद वगळता अस्तित्वाची ओळख वगैरे शोधणारे, वैफल्यग्रस्त पिढीची शोकग्रस्त अवस्था मांडणारे होते. त्यानंतर ऐंशी-नव्वदीच्या दशकातील संगीतभान हे बहुतांशी सादरीकरणाला महत्त्व देणारे होते. याच काळात मायकेल जॅक्सन नावाच्या वेगाने पसरणाऱ्या वादळाचा उदय झाला आणि बंडखोर मॅडोना प्रकाशझोतात आली. उपग्रह वाहिन्या येण्याआधी भारतातील सर्वसामान्य कानसेनांना या दोन नावांखेरीज फार नावे माहिती असण्याचे कारण नव्हते. पण एमटीव्ही आल्यानंतर पहिल्या पिढीने आपसूक संगीतदीक्षा घेतली. तेव्हा क्लासिक्स म्हणून वाजणाऱ्या सर्व गाण्यांत प्रेमगीतांचे स्थान सर्वाधिक होते. स्टीव्ही वंडर या अंध गायकाचे ‘आय जस्ट कॉल टू से आय लव्ह यू’ या गाण्याने १९८४ साली बिलबोर्ड यादी गाजविली. त्यानंतर बरोब्बर पाच वर्षांनी आपल्याकडे ‘मैने प्यार किया’ नावाचा चित्रपट आला. या चित्रपटाचे शीर्षकगीत आणि स्टीव्ही वंडरचे गाणे यांच्यातील अतोनात साम्य समजायला सर्वसामान्य भारतीयांना आणखी पाच ते सहा वर्षे लागली. पण तोवर प्रेमपटांचा आणि सुमार प्रेमगीतांचा इतका धुमाकूळ भारतीय चित्रसंगीतात झाला होता की प्रेमाबद्दल एखाद्याला शिसारी वाटावी. ‘याद रखियो, ये ढाई अक्षर प्यार के.’, ‘क्या तुम मुझसे प्यार करते हो?’, ‘प्यार अगर तुम करते हो?’, ‘तू मेरी जिंदगी है’, ‘नजर के सामने.’, ‘एक ऐसी लडकी थी.. जिसे मै प्यार करता था.’, ‘व्हॉट इज लव्ह, व्हॉट इज लव्ह, क्या है प्यार, क्या है प्यार’ ( हे हिंदीच गाणे होते बरं का). आरंभापासूनच संपूर्ण बॉलीवूड संगीत हे प्रेम किंवा प्रेमभंग गीतांच्या पायावर उभे राहिलेले आहे. या दोन घटकांत ‘दिल आना’, ‘दिल तुटना’, ‘दिल रूठना’, ‘दिल उभरना’ या मनोवस्थांची (किंवा विकारांची म्हणा) भर असते. ही सारी आपल्याकडची सिनेसंगीत बैठक आठवण्यास यंदाच्या आठवडय़ातील बिलबोर्ड यादीतील एक घुसळण कारणीभूत ठरली. जगभरातील बिलबोर्ड याद्यांवर ड्रेक याचे ‘गॉड्स प्लान’ सलग नवव्या आठवडय़ात प्रथम क्रमांकावरच्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानासाठी मात्र तीव्र स्पर्धा घडून त्यात सातत्याने बदल होत आहे. बिबी रेक्सा आणि कण्ट्री बॅण्ड फ्लोरिडा जॉर्जिया लाइन यांचे एकत्रित प्रेमगाणे ‘मेण्ट टू बी’ या गाण्याने यादीमध्ये झेप घेत या आठवडय़ात दुसरे स्थान पटकावले आहे. २०१३-१४ सालापासून लक्षवेधी कलाकार ठरलेल्या बिबी रेक्साने सातत्याने श्रवणीय आणि संस्मरणीय गाणी देण्यासाठी आटापिटा केला आहे. अनेक कलावंतांसोबत एकत्रित तयार केलेले तिचे दरएक गाणे ‘सुपर डय़ुपर’ हीट असते. या गायिकेने मार्टिन गॅरिक्स या डच डीजेसोबत केलेले ‘इन द नेम ऑफ लव्ह’ची तुलना वीस वर्षांपूर्वीच्या प्रेमगीताशी करता येणार नाही. फार भावूक आणि फार एकनिष्ठ नसणाऱ्या आजच्या व्यक्तिवादाने संपृक्त पिढी प्रेमाकडे कसे पाहते, याचा अंदाज करून देणाऱ्या शब्दांत हे गुणगुणाव्या वाटणाऱ्या चालीचे गीत आहे. कायगो-सेलेना गोमेझ (इट एण्ट मी) यांच्या गाण्यासारखा वाद्यमेळा आणि श्रवणानुभव या गाण्यातूनही मिळू शकतो. यादी करायची झाली तर इंग्रजी गाण्यांमध्येही तरल वगैरे भारतीय प्रेमगीतांशी साधम्र्य साधणारी गाणी आहेत. ऐंशी-नव्वदीच्या दशकापासून प्रेमाची सरळ आणि तिरकस अशा दोन्ही बैठकीतून मांडणी करणारी शेकडो गाणी आहेत. जॉय डिव्हिजन बॅॅण्डचे ‘लव्ह विल टिअर अस अपार्ट अगेन’ हे त्यातले एक. यातील गिटारचा सुरुवातीपासून गाण्याची सोबत करणारा चार कॉर्ड्सचा तुकडा या गाण्याचे सारे सौंदर्य आहे. पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आणि आज तीनेक दशके चिरतरुण राहण्यासाठी हा तुकडा कारणीभूत ठरला आहे. मग इतर संगीत आणि शब्द. गेल्या वर्षी आलेल्या ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या टीव्ही मालिकेत या गाण्याचा सुरेख वापर करण्यात आला होता. आपल्याकडे एमटीव्ही आले तेव्हा जगभरामध्ये बॉयबॅण्ड्सची चलती होती. बॅकस्ट्रीट बॉईज आणि बॉयझोन या दोन्ही बॅण्ड्सना त्यांच्या आरंभीच्या काळातच भारताची मोठी बाजारपेठ मिळाली. बॉयझॉनचे ‘बेबी कॅन आय होल्ड यू टुनाईट’ किंवा त्यातल्या रोनन केटिंगचे जुन्या गाण्याचा जीर्णोद्धार करणारे ‘व्हेन यू से नथिंग अॅट ऑल’ या गाण्यांना आपल्याकडे गॅदरिंग्ज आणि कॉलेजमधील संगीत जलशांमध्ये मोठे स्थान मिळाले होते. ब्रायन अॅडम्सच्या ‘लेट्स मेक लव्ह टू रिमेंबर’, ‘प्लीज फरगिव्ह मी’ आणि ‘हॅव यू एव्हर रिअली लव्ह्ड ए वुमन’ या गीतत्रयींनी १९९५ ते ९८ काळातील प्रेमवेडय़ांमध्ये खूप लोकप्रियता पटकावली होती. अलीकडच्या सगळ्या अभिजात प्रेमगीत संग्रहांमध्ये या गाण्यातील एक असतेच असते. सिक्सपेन्स नन द रिचर बॅण्डच्या ‘किस मी’ या गाण्याशिवाय प्रेमगीतांची यादी पूर्ण होऊ शकत नाही. ‘किस मी’ गाण्याच्या कैक आधी लिहिल्या गेलेल्या आपल्याकडच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्याची आठवण कुणाला आलीच तर आवर्जून सिक्सपेन्स नन द रिचर ऐकून कर्णतृप्त व्हा. हल्ली सर्वच जगातील प्रेमगीतांमध्ये सरधोपटपणा कमी होऊन प्रगल्भता वाढली आहे. तुम्ही आज रूढ असलेल्या अर्जित सिंगच्या पुनरावृत्त भावना, शब्द आणि गीततंत्रापासून मुक्त असला, तर पुढे दिलेल्या अ-सरधोपट प्रेमगाण्यांचा उत्तम आस्वाद घेऊ शकाल.
‘पॉप्यु’लिस्ट : अ-सरधोपट प्रेमगीतं!
ऐंशी-नव्वदीच्या दशकातील संगीतभान हे बहुतांशी सादरीकरणाला महत्त्व देणारे होते.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-03-2018 at 00:26 IST
Web Title: Article on pop music