मी आता बारावीला वाणिज्य शाखेत आहे. मला सी. ए. करायचं आहे. दहावीला अंसताना मी एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर काही कारणाने आमचं ब्रेकअप झालं. म्हणजे त्याने केलं. ब्रेकअपनंतर मी कोणाशीच जास्त बोलायचे नाही. पण गेले एक-दोन महिने माझी एका मुलाबरोबर खूप चांगली मैत्री झाली आहे. तो मला आवडतो. हे प्रेम आहे की आकर्षण? कळत नाहीय. आधीच एकाने विश्वास तोडला आहे, त्यामुळे यानेदेखील असंच केलं तर? हा विचार मनात येतो. या साऱ्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही, याबाबत मी काळजी घेते आहे. पण जर परिणाम झालाच तर? आमच्यात जे काही आहे हे खरं प्रेम आहे की आणखी काही ? मला काहीच कळत नाहीय. प्लीज हेल्प मी.
– प्रियांका

प्रियांका,
या अशा प्रश्नांमध्ये गुंतण्यापेक्षा पाटी संपूर्ण कोरी कर आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित द., परीक्षा जवळ आली आहे तुझी हे विसरू नकोस. हे बघ प्रियांका, आपण जेव्हा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा निसर्गातले, मानवी जीवनातले सर्व अनुभव कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच मिळणार आहेत. त्यासाठी घाई करून काहीही उपयोग नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी आपोआप होतील. सध्या तुझ्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास करून तुला मोठं व्हायचं आहे. आणि आयुष्यभराच्या साथीदाराचं म्हणशील तर तुलाच काय, सगळ्यांनाच समजूतदार साथीदार हवा असतो. हो ना? त्यानं फसवू नये, अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते. साथीदाराबाबत अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. पण मी तुला सांगू इच्छितो की, सर्व काही आपल्या मनासारखं होत नसतं. सगळंच जर मनासारखं झालं तर मग जगण्यातली मज्जाच निघून जाईल ना. अगं, तुझ्या जगण्यातून ही मज्जा तू जाऊन देऊ नकोस. मत्रीचं नातं जेव्हा आकर्षणापलीकडे जातं तेव्हा त्यात विश्वासही आपणच रुजवतो. विश्वासाच्या बळावर उभं राहिलेल्या नात्यांत फसवणुकीलाही थारा नसतो. ही नाती तात्पुरती नसतात. ज्या अर्थी तुझ्या नात्यात विश्वास डोकावलेला नाही, त्या अर्थी हे नातं कोणत्याही आणाभाकांपर्यंत पोहोचलेलं नाही.
नात्यांमध्ये कधी कधी सारे काही सुरळीत असताना आपण मुक्कामी पोहोचणार असं वाटत असतानाच अचानक नातं दुभंगलं जातं. ते स्वीकारण्याची तयारीही असावी लागते, कारण दोन वेगळ्या मार्गाना ओढून-ताणून नाही गं एकत्र ठेवता येत. म्हणून दहावीत असताना तुझी फसगत झाली, असं जरी तुला वाटत असलं, तरीही माझ्या मते अनुभवाने मात्र तू श्रीमंत झालीस. एकदा असा अनुभव आला म्हणून सतत वाईट अनुभवच मिळतील अशी अपेक्षा करू नकोस. एखाद्या नात्यात तुला विश्वासार्हता वाटली तर ती नक्कीच जप. पण तोपर्यंत भावनांना ताब्यात ठेव, काही अडचण येणार नाही. ऑल द बेस्ट!
मोकळं व्हा!
टेन्शन, द्विधा मनस्थिती किंवा एकटेपणा.. मनातील कुठल्याही शंका इथे विचारा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.