मंगळावर जीवसृष्टी आहे का इथपासून ते मंगळयानासाठी वापरलेल्या इंधनाच्या आणि यानाबरोबर पाठवलेल्या कॅमेऱ्याच्या विश्लेषणापर्यंत अनेक विषय व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावरून चर्चिले गेले. मंगळयान, चांद्रयान या आपल्या देशाच्या अवकाश मोहिमांविषयी माहिती थेट भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील वैज्ञानिकाकडून मिळाली. वैज्ञानिक आणि अभियंत्या मीनल रोहित यांनी प्रेक्षकांच्या अवकाश विज्ञानविषयक शंकांना उत्तरं दिली आणि अवकाशी झेप घेण्याची वेगळीच प्रेरणा दिली. उपस्थितांपैकी निवडक प्रतिक्रिया..

शब्दांकन : तेजल चांदगुडे, तेजश्री गायकवाड

छाया : प्राची परांजपे

एक संस्मरणीय अनुभव

लोकसत्ताच्या व्हिवा लाउंज कार्यक्रमात भारताच्या गौरवशाली ‘मंगळयान’ मोहिमेत सहभागी असलेल्या कुशल आणि कर्तृत्ववान मीनल रोहित यांना भेटण्याची आणि त्यांचा प्रवास उलगडून पाहण्याची संधी मिळणं हा अनुभव खूप संस्मरणीय होता. मी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची विद्यार्थिनी असल्याने कार्यक्रमादरम्यान गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलेल्या सगळ्या तांत्रिक बाबी मला आत्मसात करता आल्या. टेली मेडिसीन प्रोजेक्टमध्ये आलेल्या अडचणींवर त्यांनी कशी यशस्वी मात केली हे ऐकताना अक्षरश शहारा आला. इस्रोमधील कामावर असणारी त्यांची श्रद्धा, देशप्रेम, निष्ठा, आत्मविश्वास, कुटुंबाबद्दलचे प्रेम आणि साधेपणा वैशिष्टय़पूर्ण वाटला. जीवनात उच्च ध्येयाची आस असणाऱ्या माझ्यासारख्या तरुण पिढीसाठी मीनल रोहित आदर्श आहेत.

* संहिता भागवत

आकाशाएवढं स्वप्न मिळालं

सगळ्या तरुणांसाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे नेहमीच आकर्षणाचे विषय राहिले आहेत. अंतराळविज्ञान तर आम्हा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय, पण त्यातले नेमके अभ्यासाच्या दृष्टीने नि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्ग आज ‘इस्रो’च्या मीनल रोहित यांच्यामुळे समजले. मोठी स्वप्नं बघावीत आणि ती कशी पूर्ण करावीत याचा कानमंत्र आज मिळाला. भारताला अजून किती झेप घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण काय कॉण्ट्रिब्युट करू शकतो हे समजलं.

* वैदेही गावडे

वेगळ्या व्यक्तिमत्त्वाशी ओळख

शास्त्रज्ञ कसा दिसतो, अंतराळ वैज्ञानिक नेमकं काय काम करतात, या क्षेत्रात यायला किती संधी आहेत असे अनेक प्रश्न घेऊन मी कार्यक्रमाला आले होते. मीनल रोहित यांच्या रूपाने खूप वेगळ्या पर्सनॅलिटीला भेटण्याची संधी व्हिवा लाउंजमुळे मिळाली. शास्त्रज्ञ म्हणजे काय ते तर अगदी जवळून समजलं.

* गौरी महाडिक

अंतराळ वैज्ञानिकाची प्रथम भेट

एखाद्या अंतराळ वैज्ञानिकाला प्रत्यक्ष ऐकण्याची ही पहिलीच वेळ होती. मीनल रोहित या आपल्या देशाच्या तरुण स्त्री वैज्ञानिकाला ऐकून प्रेरणा मिळाली. त्यांनी ‘इस्रो’विषयी सांगितलेली माहिती ऐकून तिथे जाण्याची इच्छा निर्माण झाली. तिथे भरपूर संधी आहेत, देशासाठी काम करण्याचं ते माध्यम आहे हे मीनल मॅमकडून ऐकून नवा मार्ग सापडला.

* कृषी पांचाळ

प्रेरणादायी कार्यक्रम

व्हिवा लाउंजच्या आजच्या कार्यक्रमात ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञाला प्रत्यक्ष भेटायला मिळालं. खूपच प्रेरणादायी कार्यक्रम होता हा.  आपल्या देशाला अजून सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे मीनलमॅममुळे समजलं. यंग माइंड्सना त्यांनी घातलेली साद भावली. या क्षेत्रातील संधी किती आणि कोणत्या, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यासाठी ‘लोकसत्ता व्हिवा’ चे आभार.

* अनुजा  खिलारी  

अभिमान वाटला

आजच्या कार्यक्रमामुळे वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाला भेटण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. मीनल रोहित यांच्याकडे बघून आणि त्यांची कामाप्रती असलेली श्रद्धा बघून अभिमान वाटला. मीसुद्धा संशोधन क्षेत्रात काहीतरी करावं अशी इच्छा निर्माण झाली. देशाबद्दल प्रेम आणि अभिमान अशा भावना जाग्या झाल्या.

* वैष्णवी दळवी

खगोलशास्त्राची आवड

आणखी वाढली

लोकसत्ताच्या व्हिवा लाउंज कार्यक्रमात ‘इस्रो’च्या वैज्ञानिक येणार आहेत हे वाचल्यापासून उत्सुकता लागली होती. दहावीचं वर्ष असल्याने आता आपल्याला एवढय़ा मोठय़ा शास्त्रज्ञ असल्या तरी अगदी साधेपणाने आणि सोप्या शब्दांत त्यांनी त्यांचं काम समजावून सांगितलं. मंगळयान मोहिमेतली आव्हानं सांगून त्यांनी आपल्या देशाची कामगिरी सांगितली तेव्हा अभिमान वाटला. खगोलशास्त्र संशोधनात बऱ्याच संधी आहेत हे त्यांनी नमूद केल्यावर खगोलशास्त्राविषयीची रुची अधिक वाढली.

*  पूजा नाईक

अंतराळ कुतूहल वाढलं

मी या कार्यक्रमाला यायला फारच उत्सुक होते. ‘यूपीएससी’चा अभ्यास करत असल्याने ‘इस्रो’, ‘नासा’ या संस्थांबाबत जाणून घेणे हा माझा आजच्या कार्यक्रमाला येण्यामागचा हेतू होता. तो तर उद्देश पूर्ण झालाच, शिवाय मला एका वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी बोलता आलं, एका अंतराळ वैज्ञानिकाला प्रत्यक्ष ऐकता आलं. अंतराळविज्ञान विषयातल्या अनेक कुतूहलमिश्रित शंकांची उत्तरं मिळाली. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात येणारे अनुभव मीनल रोहित यांनी शेअर केल्याने शास्त्रज्ञ बनण्याच्या त्यांच्या प्रवासातून बरंच काही शिकता आलं.

* कोमल जावळे