आपल्याकडून सगळेच इंग्रजी सिनेमे पाहताना ते ‘हॉलीवूड’चे असल्याची गल्लत केली जाते. ब्रिटन आणि अमेरिकेसोबत सर्व खंडांमधील ९४ देशांमध्ये अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीची ओळख आहे. या देशांमध्ये बनणारे इंग्रजी सिनेमे, गाणी हे हॉलीवूडचे कसे असू शकतील? पण ही गल्लत दोन हजारोत्तर काळापर्यंत मोठय़ा प्रमाणावर केली जात होती. १९८१ साली एमटीव्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजू लागले आणि त्यातून सर्व खंडांमधील सिनेमा-गाण्यांना जगभर चमकायचे माध्यम मिळाले. ऑस्ट्रेलियामधील ‘मेन अॅट वर्क’ या बॅण्डचे ‘डाऊन अंडर’ हे गाणे एमटीव्हीमुळे इतके हिट झाले की, त्याच्या कैक सुंदर आवृत्त्या आज यूटय़ूबवर पाहायला मिळतात. ‘डाऊन अंडर’ हे मूळ गाणे बाळबोध चित्रीकरणातील असूनही म्युझिक व्हिडीओचा तो आरंभाचा काळ असल्यामुळे चालले. वयाने चाळिशीमध्ये पोहोचूनही वापरली गेलेली बासरी आजही गाण्याला ताजे ठेवते. ऑस्ट्रेलियन किंवा कांगारूंच्या देशातील गाण्यांची इथे आठवण होण्याची कारणे म्हणजे बिलबोर्ड ग्लोबल चार्ट लिस्टमध्ये व्ॉन्स जॉय या कलाकाराच्या (किंवा बॅण्डच्या) ‘वुई आर गोइंग होम’ या गाण्याच्या अस्तित्वामुळे. जागतिक पटलावरील याद्यांमध्ये ड्रेक याच्या ‘गॉड्स प्लान’ या गाण्याने दहाव्या आठवडय़ांतही आपला पहिला क्रमांक सोडला नाही. पण ऑस्ट्रेलियामध्ये बिलबोर्ड यादीसारखी आरिया ही देशी इंग्रजी गाण्यांची एक यादी दर आठवडय़ाला तयार होत असते. त्यात वेन्स जॉय या कलाकाराचे गाणे अल्बम प्रकाशित झाल्यापासून गेल्या महिन्याभरापासून पहिल्या क्रमांकावर आहे. वेन्स जॉयचे ‘मेस इज माइन’ हे गाणे गेल्या वर्षी थर्टीन रिझन्स व्हाय या नेटफ्लिक्स मालिकेमुळे बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. पण या कलाकाराची दोन अल्बममधील गानप्रतिभा ऐकण्यासारखी आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत निक ड्रेक या ब्रिटिश कलाकाराची आकुस्टिक गिटारवरची गाणी प्रचंड लोकप्रिय होती. निक ड्रेकच्या गाण्यांसोबत सुफियान स्टीव्हन आणि कैक गिटारपंडित कलाकारांचा प्रभाव वेन्स जॉयच्या दरएक गाण्यात दिसतो. ‘कॉल इफ यू नीड मी’, ‘सॅटरडे सन’, ‘बॉनी अॅण्ड क्लाइड’ ही त्याची गाणी खासच ऐकत राहावीत अशी आहेत. एकोणीसशे नव्याण्णवच्या कालावधीत भारतीय एमटीव्ही आणि इंग्रजी गाण्यांचा खुराक देणाऱ्या एफएम वाहिन्यांवर नॅटली इम्ब्रुलिया हिच्या ‘टॉर्न’ गाण्याचा प्रचंड मोठा वावर होता. एडनास्व्ॉप या ब्रिटिश अल्बमच्या मूळ गीतात गिटार कॉर्ड्सचा अधिक मारा ठेवीत तयार झालेल्या गाण्यामुळे नॅटली इम्ब्रुलिया ग्रॅमीपर्यंत पोहोचली. अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका अशी तिची ख्याती ऑस्ट्रेलिया बाहेर येऊन पोहोचली. नॅटली इम्ब्रुलियाची गद्याच्या आवेशात म्हटली जाणारी कित्येक गाणी त्यांचे देखणे व्हिडीओज आणि वापरलेल्या वाद्यमेळ्यासाठी ऐकली-पाहिली जातात. तिच्या ‘विशिंग आय वॉज देअर’ या गाण्याची चाल आपल्याकडे क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेरे जीवनसाथी’ चित्रपटातील ‘आओ ना, गले लगाओ ना’शी तंतोतंत जुळणारी आहे. दोन वेगवेगळ्या खंडांत वेगवेगळ्या कालावधीत जवळजवळ सारख्याच चालीची निर्मिती कशी झाली असेल, हा प्रश्न आहे. नॅटलीचे ‘राँग इम्प्रेशन’ आणि ‘दॅट डे’ हे पूर्ण गद्यात्मक गाणे ऐकून तिचे चाहते होण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरणार नाही. नॅटली इम्ब्रुलियाइतकीच कायली मिनोग या ऑस्ट्रेलियाई गायिकेचा लौकिक मोठा आहे. टोनी कलोट या अभिनेत्रीचे ऑस्ट्रेलियासोबत ब्रिटिश आणि अमेरिकी चित्रपटांमध्ये सातत्याने दर्शन होत असते. तिच्या ‘ब्युटिफुल ऑकवर्ड पिक्चर्स’ या अतिसंयत गाण्याला वैशिष्टपूर्ण सौंदर्य आहे. अत्यंत कमी वाद्यांत परिणामकारक गीताचा हा प्रकार आवडू शकेल. गे सॅबेस्टियन हा गायकही ऑस्ट्रेलियामधील ख्यातकीर्त गायक आहे. त्याचे ‘लाइक ए ड्रम’ हे गाणे खास उत्साहवर्धक आहे. त्याचप्रमाणे हिलटॉप हुम्ड्स हा दोन-तीन दशके गाजत असलेला आणखी एक बॅण्ड आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा