विनय नारकर viva@expressindia.com
बनारस.. भारतीय वस्त्रपरंपरेतील एक झगझगीत सुवर्णपान. अनेक शतकांपासून हे शहर आपली ही वस्त्रपरंपरा दिमाखात मिरवत आले आहे. शेकडो वर्षांत कित्येक राजघराणी होऊन गेली, सगळ्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांमध्ये टिकून राहणे सगळ्याच परंपरांना जमतेच असे नाही. वाराणसीची वस्त्रपरंपरा ही या शहरा इतकीच प्राचीन आहे.
काशी शहराच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकातल्या काही वर्णनांशी आजही शहराच्या काही भागाशी असलेले साम्य पाहून अचंबा वाटतो. वस्त्रपरंपराही या शहराने अशीच जपली आहे. भारतातील सात महत्त्वाच्या शहरांपैकी हे एक होते. या वैभवशाली शहरातून वस्त्रं, अत्तरे, हस्तिदंत अशा अनेक गोष्टींचा व्यापार चालायचा. संस्कृत, जैन, बौद्ध साहित्यांमध्ये इथल्या वस्त्रपरंपरेचे उल्लेख मिळतात. प्राचीन काळातही इथली वस्त्रे ऐपतदारांनाच पेलवायची. व्यापारी मार्गावरील मथुरा हे शहरही तिथल्या वस्त्रांसाठी प्रसिद्ध होते. पातंजलीने नोंदवले आहे की काशीची वस्त्रे मथुरेपेक्षा उत्तम दर्जाची व जास्त किमतीची होती.
काशीच्या वस्त्रांच्या सुवर्ण झळाळीचे तेज भारताबाहेरही पोहोचले होते. ‘काशी’चा शब्दश: अर्थ आहे चमकदार, लकाकणारा. कोण जाणे काशीला हे नाव इथल्या वस्त्रांच्या लकाकीमुळेही मिळाले असेल. या शहरातले विणकर साडय़ा, धोतर, उपरणे, ओढण्या, पटके, टोप्या, रुमाल, अंगोछा, शाली, कमरबंद, बिछान्यासाठी लागणारी वस्त्रे, विविध प्रकारच्या खेळांसाठी लागणारी वस्त्रे, हत्ती-घोडय़ांवर लागणाऱ्या झूल व अन्य वस्त्रे आदी प्रकार बनवायचे.
शिवलेल्या वस्त्रांचं आगमन भारतात मुख्यत्वे मुस्लीम शासकांसोबत झाले. सल्तनत काळात शिवलेल्या वस्त्रांची मागणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली. मध्य पूर्वेतून आलेल्या परंपरांचे प्रतिबिंब बनारसच्या वस्त्रांमध्ये उमटू लागले. मुघलांच्या येण्याने मात्र यामध्ये अमूलाग्र बदल झाले. उत्तम कला-कारागिरीचे शौकीन असणाऱ्या मुघलांना आपल्या शाही पोशाखांसाठी आणखी भरजरी वस्त्रांची गरज पडत होती. त्यातून जन्म झाला जरबाफ्त म्हणजे सोन्याने विणलेल्या ‘कमख्वाब’ या वस्त्राचा. हे वस्त्र पोशाखासाठी वापरता यावे म्हणून ताग्यांमधून विणले जाऊ लागले.
‘कमख्वाब’ या शब्दाचा अर्थ होतो, ‘जर एखाद्याने पाहिली नसेल तर तो स्वप्नातही ज्याचा विचार करू शकणार नाही अशी गोष्ट’..इतके तरल शायराना नाव मिळालेले वस्त्र कसे असेल? या वस्त्राचे सौंदर्य, दिमाख, नजाकत मुघल अभिरुचीला साजेसं होतं.
शायर इंशा म्हणतात,
‘‘गर कहीं शब को नजर ककुम ओ संजाब आया
हाथ मल मल के सहर हो गई, कम ख्वाब आया’’
ककुम आणि संजाब या वस्त्रप्रकारांच्या प्रतिमा पर्शियन काव्यात बऱ्याचदा वापरल्या जायच्या. असं म्हटलं जायचं की हे फक्त रात्री बघता येतात. शायर इंशा म्हणतात, ‘‘रात्री पहाण्यामुळेच याचं खरं स्वरूप माहीत नाहीए, स्वच्छ प्रकाशात बघा. कमख्वाबचं श्रेष्ठत्व दिसेल.’’
मिर्झा गालिबनी ऐशआरामाची परिसीमा सांगण्यासाठी कमख्वाबच्या प्रतिमेचा वापर केलाय..
‘‘यां सर-ए-शोर बेख्वाबी से था दिवार-जू
वां वो फ र्क-ए-नाज महव-ए-बालीशे-कमख्वाब था
शायर जोश मलिहाबादींनी नजाकत दर्शवण्यासाठी हीच प्रतिमा वापरली आहे.
दिन है फौलाद-ए-संग तेग-ए-आलम
रात कमख्वाब पंखुडी शबनम
आणखीही बऱ्याच शायरनी कमख्वाबचा उल्लेख केला आहे.
कमख्वाबला ‘किनख्वाब’ही म्हटलं जातं, चिनी भाषेत ‘किन’ म्हणजे सोनं. किनख्वाब म्हणजे ‘सोनेरी स्वप्न’. याला जरबाफ्त म्हणण्याचं कारण म्हणजे हे विणताना सोन्या-चांदीच्या जरीचा इतका मुबलक वापर व्हायचा की रेशमाची जमीनच दिसायची नाही. वैदिक साहित्यात काशीमध्ये विणल्या जाणाऱ्या ‘हिरण्य’ या वस्त्राचा उल्लेख सापडतो. त्याचेच आजचे रूप म्हणजे कमख्वाब असेही मानले जाते. सामान्यत: रेशमी वस्त्र विणताना त्यात तान्याचे (आडवे धागे) एक किंवा दोन स्तर असतात. कमख्वाबमध्ये रेशमाचे व जरीचे तीन ते सात स्तर असायचे.
कमख्वाबचे गरजेनुसार व डिजाइननुसार वेगवेगळे प्रकार बनायला सुरुवात झाली. यातला ‘अल्फी’ हा खास शेरवानीसाठी बनायचा. यात मीनाकारी असायची, सगळ्यात महागडा कमख्वाब हाच. चांदी आणि रंगीबेरंगी रेशम मिळून ‘ताशी’ विणलं जायचं. ‘अम्रू’ विणलं जातं जरीशिवाय. ज्यांच्या खिशाला कलाबतू (जरी) परवडायचं नाही त्यांच्यासाठी अम्रू असायचं. मुस्लीम पुरुषांना रेशमी वस्त्रे परिधान करण्याची परवानगी धर्म देत नाही. खास त्यांच्यासाठी रेशमासोबत सुती किंवा लोकरीचे धागे विणून ‘मश्रू’ विणले जाऊ लागले. यात रेशमाच्या धाग्यांचा शरीराला स्पर्श होणार नाही अशा प्रकारेही हे विणले जाते. मश्रूचा अर्थच ‘परवानगी’ असलेला असा होतो.
रेशमाचा एक आणि सुती एक धागा एकत्र विणून ‘संगी’ बनवलं जायचं. या संगतीने विणलं गेल्यामुळे हे नाव पडलं. पण हे मश्रूपेक्षा वेगळं असायचं. हे प्रकार विणणारे विणकरही वेगवेगळे असायचे. त्यांच्याकडे वंशपरंपरेने ते प्रकार विणले जायचे. त्यामुळे त्यांचे मोहल्लेही वेगळे असायचे. संगी विणणाऱ्या विणकरांमध्ये एक म्हण होती, ‘संगी बुने तंगी आवे, लडकन जाए नैनिहाले’. या विणकरांना मोबदला इतका कमी मिळायचा की त्यांना आपल्या मुलांना मामाकडे उपजीविकेसाठी पाठवावं लागायचं. ही कला नामशेष होणं स्वाभाविक होतं. बिछान्याच्या वस्त्रांसाठी, पडद्यांसाठी, पुस्तकांच्या वेष्टनासाठीसुद्धा कमख्वाबचा वापर होत असे.
घाटला, गुलबदन, नैनसुख, अतलस असे अन्य काही प्रकारही असायचे. भारताच्या बाहेरही किमख्वाबला बरीच मागणी असायची. त्या त्या देशांनुसार डिजाइन्समध्ये काही बदल केले जायचे. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्य प्रभावही या वस्त्रपरंपरांवर पडत गेला. विशेषत: फ्रेंच प्रभाव लक्षणीय होता. १८५१ मध्ये लंडन इथे झालेल्या ‘द ग्रेट एक्झिबिशन’ या जगभरच्या वस्त्रपरंपरांच्या प्रदर्शनात या कमख्वाबचा अद्भुत आणि अतुलनीय म्हणून विशेष सन्मान केला गेला. फक्त कमख्वाब विणणाऱ्या विणकरासच ‘कारीगर’ असे संबोधले जायचे. मुघल दरबाराकडून खास विणकरांना ‘नूर बाफ’ अशी पदवी दिली जात असे. फारसीमध्ये बाफ म्हणजे विणकर.
भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानं रद्द झाली. राजेरजवाडे सामान्य नागरिक झाले. अशा रइसी कलांचा आश्रय गेला. त्यामुळे त्यांचा ऱ्हास अटळ होता. कित्येक कारागिरी आणि बारकावे लुप्त झाले. पण आता नवश्रीमंत, सिनेतारक-तारकांना अशा वस्त्रांची गरज वाटतेय. बनारस अजूनही तळपतं आहेच.
कमख्वाब कायमच सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर राहाणार. किमख्वाबचं सोनेरी ख्वाब बघणाऱ्या सामान्य जनांना साहिर लुधियानवीच्या शब्दांनी दिलासा मिळू शकतो..
‘‘कितने हाथोंने बुना अतलस-ओ-कमख्वाब मगर
मेरे मलबूस की तकदीर में पैवंद रहे’’