गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ. सौंदर्याच्या संकल्पना आपापल्या परीने उलगडणाऱ्या काही अतरंगी व्हिडीओंविषयी.

कधी विचार केलाय, आपल्या डोळ्यांना एखादी गोष्ट का आवडते किंवा का नावडते? सुंदर गोष्टींकडे आपण का आकृष्ट होतो आणि कुरूप गोष्टींपासून का लांब पळतो? मानव इतिहास या सौंदर्य-कुरूपतेमधील फरक करण्याच्या आणि त्यानुसार एखाद्याविषयी ग्रह बनविण्याच्या प्रकारांनी भरून गेला आहे. मानवाच्या सौंदर्याच्या संकल्पना गेल्या साठेक दशकांत चित्रपट, टीव्ही मालिका आणि फॅशन वाहिन्या आदींनी पूर्ण बदलून गेल्या. त्यानंतर खेळ, सिनेमा आणि संगीत यातील सेलिब्रेटींनी घालून दिलेल्या पेहराव, केशरचना आणि राहणीमानाचे आदर्श दरएक पिढीमध्ये लोकप्रिय बनले. उदाहरणार्थ देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, आमिर-सलमान-शाहरुख- खान या प्रत्येक अभिनेत्याच्या गाण्यांचे व्हिडीओ आज पाहिलेत तर भारतीय पिढीच्या पेहरावाच्या बदलत चाललेल्या कैक छोटय़ा-छोटय़ा गोष्टी स्पष्ट होतील. या गाण्यांतील सोबत असलेल्या नायिकांचा पोशाख आणि सुंदर दिसण्यासाठीच्या संकल्पना कशा बदलल्या ते देखील लक्षात येईल.

सौंदर्य म्हणजे अमूक आणि कुरूपता ही अमूक-या दोन्ही सापेक्ष कल्पना असल्या, तरी आपल्या मेंदूत त्यांची नोंद अत्यंत थोडय़ा अवधीत होते. पॉप संगीतकार एखादे गाणे जेव्हा व्हिडीओद्वारे मांडतो, तेव्हा त्या गाण्यातील सौंदर्य सर्वार्थाने स्पष्ट होण्यासाठी व्हिडीओ दिग्दर्शकाकडे आग्रही राहतो. कारण गाण्याचा ‘थेट दिसणारा’ व्हिडीओ चांगला असेल, तेव्हाच ‘ऐकण्यासाठी’ गाण्यांचा आल्बम ग्राहक खरेदी करेल, हे आíथक गणित त्यामागे असते. एमटीव्ही पहिल्या दोन दशकांत रिअ‍ॅलिटी शोमध्ये अडकले नव्हते, तेव्हा प्रचंड मोठय़ा संख्येने गायक कलाकार आणि त्यांचे व्हिडीओग्राफर व्यक्त होत होते. ‘सौंदर्यआणि कुरूपता’ या विषयावर एका पिढीची ठळक मते प्रगट करणारी झालेली तीन गाणी आवर्जून पाहिली-ऐकली पाहिजेत.

जेम्स ब्लण्ट या गायकाची साध्या शब्दांतील गाणी फार आध्यात्मिक वगैरे असतात. ‘थ्री वाईज मॅन’ या गाण्यातील शब्दांना थेट बायबलमधील एका कथेशी जोडले जाते. अन् त्याच्या व्हिडीओजचेही कैक अर्थ काढले जाऊ शकतात. इथे ‘यू आर ब्युटिफूल’ हे गाणे महत्त्वाचे आहे. या व्हिडीओत जेम्स ब्लण्ट स्वत: बर्फवृष्टी होत असताना एका समुद्राजवळ गाताना दिसतो. गाण्यातील शब्दांनुसार त्याने अत्यंत सुंदर व्यक्ती पाहिली आहे. जिच्या अतिव प्रेमात तो पडला आहे. ती व्यक्ती सुंदर असूनही दुसऱ्या कुणाची असल्याने आपल्यासाठी अप्राप्य आहे. या वास्तवाला स्वीकारणाऱ्या (किंवा नाकारणाऱ्याही) व्यक्तीवर हे गाणे केंद्रित आहे. गाण्यातील दृश्य परिस्थिती वेगळी आहे. गाण्यामध्ये फक्त त्याचा चेहराच वेगवेगळ्या अँगलने दिसतो. तो वर्णन करीत असलेली सुंदर व्यक्ती दिसत नाही. प्रत्येकाने ती आपल्या मनात तयार करावी हा त्यामागचा हेतू. ती सुंदर व्यक्ती मिळणार नाही, या वास्तवाने व्यथित झाल्यानंतरचे पाऊल तो उचलतो. बर्फवृष्टीमध्ये त्याचा तऱ्हेवाईक पेहराव आणि गाण्यातील शब्दानुरूप वागणे, यांची विचित्र सौंदर्यसंगती लागली आहे.

ख्रिस्टिना अ‍ॅग्वेल्यूरा हिचा ‘आय अ‍ॅम ब्युटिफूल’ या गाण्याचा व्हिडीओही लेखाच्या विषयाला पुढे नेणारा आहे. आपल्या पेहराव-आचार-विचार आणि वागण्यामध्ये एखादी बैठक किंवा विचार असतो. लोकांना तो वेगळा वाटला की त्याला नावे ठेवणे सुरू होते. या गाण्यामध्ये ‘लोक काही म्हणोत, त्यांचे शब्द मला खाली आणू शकत नाही. मी सुंदरच आहे’ हे ठाम विधान आणि त्यासोबतीने व्हिडीओत येणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा या गाण्याचे सौंदर्य वाढविणाऱ्या आहेत. या व्यक्तींमध्ये एक काटकुळा तरुण पहिलवानबाजी करताना दिसतो, हाडाची काडे झालेली एक तरुणी वारंवार आरशात आपल्या कृशपणाला कवटाळताना दिसते तर एक  माणूस महिलांचे कपडे घालताना दिसतो. जे प्रचलित नाही, त्यांना कुरूप ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, हे विचारणाऱ्या गाण्याचा व्हिडीओही पुरता बंडखोर आहे.

शुगाबेब या बॅण्डची कीर्ती एमटीव्हीने भारतात पोहोचलेल्या इतर कोणत्याही अमेरिकी गर्लबॅण्ड्स इतकी नाही. पण त्यांनी तयार केलेले ‘अग्ली’ हे गाणे त्यांचे मास्टरपीस आहे. ‘सर्वच लोक सारखे असून, लौकिकार्थाने आपण जे भले-बुरे करतो, त्यावरून लोक आपल्यावर मत बनवतात.’ हे गद्यातील गाणे चालीमध्ये ऐकताना पहिले आश्चर्य दाटून येते. नंतरची आश्चर्ये त्यांच्या गाण्यात विविध चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती पाहून मिळतात. ‘मी जर कुरूप असेन, तर माझ्यावर कुरूपतेचा शिक्का मारणारे तुम्हीदेखील विचारांनी कुरूप आहात.’ हा गाण्याचा मथितार्थ शब्द आणि दृश्यांच्या ठोशांनी स्पष्ट केला आहे.

सौंदर्य आणि कुरूपतेचा विचारच करायचा असेल, तर सर्वच दृश्य माध्यमे आपली गुरू होण्यास इच्छुक आहेत. एमटीव्हीने दाखविलेले म्युझिक व्हिडीओजनी एक पिढी दृश्यसाक्षर झाली. आपल्याला मालिका आणि जाहिराती किंवा कोणतीही गोष्ट आवडण्या-नावडण्यामागेही सौंदर्याचे आणि कुरूपतेचे मानसशास्त्र अस्तित्वात असते. विचार केलात, की सारे स्पष्ट होऊ शकेल.

काही मस्ट वॉच व्हिडीओ लिंक्स

viva@expressindia.com