एखाद्या मुलीच्या ड्रेसिंग स्टाइलकडे आणि केसांकडे बघून किती सहजपणे आपण तिच्याबद्दल ठरावीक ग्रह करून घेतो! मुलीच्या दिसण्यावरून जजमेंटल होताना, तिच्यातील क्षमतांचा विचार आपण करतो का? अशा साचेबद्ध ठोकताळ्यांत बांधून गृहीत धरण्यामुळे बहुतांश स्त्रियांना मनस्ताप होतो, त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तिचा तो साधासा पंजाबी ड्रेस, तेल लावून केसांची बांधलेली साधी वेणी, डोळ्यांवरचा चष्मा तिला ‘काकूबाई’ करून टाकतो पण जेव्हा ती अस्खलित इंग्रजी बोलते किंवा मग सफाईदारपणे बाइक चालवते तेव्हा समोरचा आ वासून बघत राहतो. लेटनाइट पार्टीला जाणारी, केस मोकळे सोडणारी ‘ती’ पारंपरिक पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालत असेल तरीही आपल्याला आश्चर्य वाटतं. मुलींची त्यांच्या दिसण्यावरून ठरवलेली एक ठरावीक इमेज आपल्या मनात एवढी घट्ट रुतलेली असते की, त्याविरोधात काही दिसलं की आपल्याला लगेच असे धक्के बसतात. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ असं म्हणतात. पण ते इम्प्रेशन बरोबर असेलच असं नाही ना! ते पडताळून पाहण्याचे कष्टदेखील घ्यायला हवेत. कारण बऱ्याचदा हे फर्स्ट इम्प्रेशन एखादीच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवतं. तिच्या कुवतींवर आक्षेप घेतले जातात. वेशभूषा, केशभूषा आणि अंगी असलेले गुण याची एक प्रकारे विभागणी मनातल्या मनात केलेली असते आणि त्या अनुषंगाने मग आपण जजमेंटल व्हायला लागतो.
या जजमेंटल होण्याचा स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो, असा निष्कर्ष ‘निहार नॅचरल्स’च्या वतीने घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. निहार नॅचरल्ससाठी ‘निल्सन’ने देशभर केलेल्या या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, भारतातल्या ७३ टक्के स्त्रियांना असं वाटतं की, त्यांना त्यांच्या दिसण्यावरून आणि केशरचनेवरून जज केलं जातं आणि त्याचा त्यांच्या क्षमतांवर परिणाम होतो. समाजातील स्टिरिओटाइप मोडून आपली कार्यक्षमता सिद्ध करताना स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा संघर्ष जास्त कडवा असतो. त्यांना त्यांच्या कपडय़ावरून, दिसण्यावरून जास्त लक्ष्य केलं जातं. केवळ बाहय़रूपावरून कार्यक्षमता ठरवून कामाची संधीच दिली जात नसेल तर त्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता जास्त असते.
या सर्वेक्षणातून या ठोकताळ्यांविषयी गमतीशीर माहिती हाती आली. ६२ टक्के पुरुषांना असं वाटतं की, लांबसडक केस असणाऱ्या स्त्रिया या मुलांची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतात. पण केसांचा बॉब केलेली स्त्री स्वतंत्रपणे राहण्यास जास्त सक्षम आहे, असं बहुतांश पुरुषांना वाटतं. आता लांब केसांचा आणि मुलांना सांभाळायचा किंवा स्वतंत्र राहण्याचा काय संबंध? पण आपल्याकडे असे अनेक स्टिरिओटाइप मनात घट्ट बसलेले आहेत. त्यानुसार तिच्यातील क्षमताही गृहीत धरल्या जातात. तसं पाहता लांब वेणी, टिकली, पंजाबी ड्रेस या गोष्टी संस्कृतीशी जोडल्या जातात. मग ही पारंपरिक आणि ती आधुनिक ही विभागणी आपसूकच केली जाते.
या ठोकताळ्यांमध्ये बसवण्याचा प्रकार स्त्रियांच्या कामावर, कार्यक्षमतेवर आणि मग पर्यायाने आत्मविश्वासावर परिणाम करत असतो. सततच्या बोलण्याने, टीकाटिप्पणीने ती व्यक्तीसुद्धा स्वत:बद्दल तसाच विचार करू लागते. जसं आपल्याला आवडतं, रुचतं, ज्यात आपण कम्फर्टेबल असतो असे कपडे आपण परिधान करत असतो. त्यातून मग व्यक्तिमत्त्वाची झलकही दिसत असेल पण त्यावरून ही व्यक्ती अशीच असणार असं ठरवणं काही योग्य नाही. या देशपातळीवर झालेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष ध्यानात घेऊन मुंबईतल्या कॉलेजवयीन मुलांना त्यांच्या मनात मुलींच्या दिसण्यावरून काही स्टिरिओटाइप घट्ट रुजले आहेत का याविषयी चाचपणी केली.
सध्याची तरुण पिढीच्या पूर्वीच्या पिढीइतकी दिसण्यावरून जजमेंटल होताना दिसत नाही. तरीही मुलांना मनात काही साचेबद्ध कल्पना अजूनही दिसतात. घट्ट वेणी घातलेली, पंजाबी ड्रेसवाली मुलगी फाडफाड इंग्रजी बोलू शकणार नाही, असं त्यांना वाटतं. शॉर्ट ड्रेस, मेक-अप केलेल्या मुली म्हणजे आधुनिक, फटाकडय़ा असं त्यांना वाटतं. पण नव्या पिढीतील मुलींना या ठोकताळ्यांपुढे झुकून स्वतला बदलणं पटत नाही. मनाला रुचेल, सवयीचं असेल तसंच आम्ही वावरणार असं त्या स्पष्ट करतात. कुणी काही म्हणलं म्हणून स्वत:ला बदलण्यापेक्षा, मनापासून वाटेल तेव्हाच आणि तरच राहणीमान बदलणार, असं त्या सडेतोडपणे सांगतात. ल्ल
कितीही आदर्श उत्तर द्यायचं ठरवलं तरी कपडे, राहणीमान, बोलण्याचा लहेजा यावरून प्रथमदर्शनी माणसाची पारख केली जातेच. त्यातून मुलींबद्दल बोलायचं झालं तर जी मुलगी चापूनचोपून तेल लावून वेणी घालून, पंजाबी ड्रेसवर ओढणीला पिन लावून प्रेझेंटेशनला उभी राहते, ती कितपत हुशार असेल, कशी इंग्लिश बोलेल याबद्दल पहिल्यांदा मनात हलकीशी का होईना पण शंका येतेच.
– सर्वेश देशमुख
मी नेहमीच जीन्स घालते. पण त्यावर माझी नेहमीसारखी साधी वेणी असते, जी बघितल्यावर मला अनेक जण विचारतात.. तू एवढी मॉडर्न मुलगी आणि काकूबाईसारखी वेणी काय घालतेस? जरा केस मोकळे वगैरे सोडलेस तर ‘स्मार्ट’ दिसशील. प्रत्येक वेळी मला हेच वाटतं की, स्मार्ट दिसणं महत्त्वाचं आहे की स्मार्ट असणं, या प्रश्नाचं उत्तर मला काकूबाई म्हणणाऱ्या कोणीही आजपर्यंत देऊ शकलेलं नाही. मॉडर्न कपडे घालण्यापेक्षा मी विचारांनी मॉडर्न असण्याला जास्त महत्त्व देते.
– पूर्वा फडके
– राजस लिमये
– स्नेहा विद्वांस