गेल्या आठवडय़ात बिलबोर्ड यादीमध्ये ऐतिहासिक नोंद झाली. बिटल्स या ब्रिटिश बॅण्डच्या विक्रमाशी बरोबरी करणारी. या बॅण्डच्या एकाच अल्बममधील ९ गाणी साठच्या दशकात एकाच आठवडय़ात चांगल्या स्थानी गाजली होती. त्यानंतर मधल्या ६०-६५ वर्षांत गायकांच्या, संगीत प्रवाहाच्या आणि श्रोत्यांच्या कैक पिढय़ा येऊन गेल्या. पण तितकी मजल कुणाला मारता आली नाही. मिगोज या अफ्रो अमेरिकी हीप-हॉप बॅण्डने आपल्या ताज्या अल्बममधून या विक्रमाशी बरोबरी साधली.

भारतीय सिनेमांत हीप-हॉप म्युझिक सर्वात पहिल्यांदा लक्षणीय सादर करण्यात आले ते ‘ब्लफमास्टर’ या अभिषेक बच्चन अभिनित चित्रपटात. ‘एक मै और एक तू है’ नामक (राइट हिअर, राइट नाऊ) हे गाणे विशाल-शेखर यांच्या संगीतातून तयार झालेले शुद्ध देसी हीप-हॉप म्हणावे लागेल. त्याचे चित्रीकरणही तितक्याच ताकदीने करण्यात आले होते. आपल्याकडे तात्कालीन उडत्या चालींच्या लाटेत हे गाणे उठून वेगळे ऐकू येत होते. पण आपल्या परंपरेनुसार गाण्याला लोकाश्रय हा होळीपासून ते गणपतीपर्यंत उत्सवामध्ये नृत्य करण्यासाठी त्याचा वापर सार्वजनिकरीत्या वापरात झाला की मिळतो. तसा तेव्हा तो मिळाला, हीप-हॉप प्रयोग भारतीय संगीतात मिसळला, याची दखल त्रोटक संगीत समीक्षकांनी घेतली. तेव्हापासून कित्येक हीप-हॉप गाणी भारतीय सिनेसंगीतात आली. ताजी उदाहरणे, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’मधील  ‘लडकी ब्युटिफूल करगयी चुल’ किंवा स्वघोषित ‘बादशहा’ नावाच्या गायकाचे ‘डीजेवाले बाबू मेरा गाना चला दो’. भारतात यो यो हनीसिंग नावाचा चमत्कारी इसम तरुणाईच्या गळ्यातला आणि कानातला ताईत कसा बनला, त्याचे श्रेय त्याच्या पार्टी हीप-हॉप गाण्यांमध्ये आहे. असो. तर ही भारतीय उदाहरणे ऐकली तर हीप-हॉप संगीत म्हणजे काय याची कल्पना येईल.

१९७० च्या दशकात अमेरिकी आफ्रिकन कलावंतांनी हीप-हॉप चळवळ उभारली. प्रस्थापित कलेशी विद्रोह करत तयार झालेला हा प्रकार आज जगावर राज्य करतो आहे. गद्य-पद्याचे मिश्रण आणि उघडी-वाघडी शब्दरचना हे या गाण्यांचे वैशिष्टय़. ‘मिगोज’ या बॅण्डची नऊच्या नऊ हीपहॉप गाणी बिलबोर्ड यादीत स्थान पटकावून आहेत. निकी मिनाज, कार्डी बी यांच्यासोबत गायलेली काही गाणी आपल्या हीपहॉप अप्रिय कानांना ठीक वाटू शकतील. पण सगळीच नाही ‘मोटरस्पोर्टस्’, ‘गँग गँग’ आणि ‘वॉक इट, टॉक इट’ ही कानांना चवीसाठी द्यावीत अशी त्यांची काही गाणी. हीप हॉपचे इझी लिसनिंग व्हर्शन ऐकायचे असेल तर दोन सुंदर गाणी ताज्या याद्यांमध्ये आहे. ‘मेबल अ‍ॅण्ड नोट्स’ या गायकांचे ‘फाइन लाइन’ आणि ‘माय लव्हर’ यांनी हीप हॉप आणि पॉपमध्ये चांगली सीमारेषा आखली आहे. ‘फाइन लाइन’ हे गाणे सातत्याने ऐकावे लागेल, इतके त्यात माधुर्य आहे. ही ब्रिटिश जोडगोळी सध्या ब्रिटिश तरुणाईवर भुरळ घालत आहे. ‘जी इझी’ आणि ‘हेल्सी’ यांची एकत्रीकरण असलेली शुद्ध हीप-हॉप गाणीही वैशिष्टय़पूर्ण आहेत. या दोघा कलाकारांचे खास त्यांच्या गोरेपणात आहे. बहुतांश हीप-हॉप कलाकार कृष्णवंशी आहेत. ‘मेबल आणि नोट्स’मधील नोट्स हा कृष्णवंशीय आहे. पण जी इझी आणि हेल्सी गौरवर्णी असूनही उत्तम हीपहॉप संगीत सादर करत आहेत. त्यांचे ‘हीम अ‍ॅण्ड आय’ हे गाणे म्हणजे कुणीतरी तर्खडकरचे इंग्रजी भाषांतराचे खंड वाचायला काढलेत की काय असे वाटणारे असले, तरी उत्तम हीपहॉप गीत आहे. खूप हीपहॉप ऐकून कंटाळला असाल, तर ‘क्लीन बॅण्डीट’ या बॅण्डचे ‘आय मिस यू’ हे गाणे ऐका. आत्यंतिक धोपट शब्दरचना असली, तरी हे गाणे त्यात वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक वाद्यमेळ आणि ध्वनी प्रयोगांनी लक्षात राहू शकते. गेले कित्येक आठवडे हे गाणे बिलबोर्ड यादीमध्ये सन्मानाने झळकत आहे. बीबी रेक्सा ही गायिका आंतरराष्ट्रीय संगीत प्रवाहात २०१३ च्या काळात आली. आज तिची अनेक गायकांसोबत झालेली मिश्र गाणी ऐकण्यासारखीच आहेत. ‘मिण्ट टू बी’, ‘आय गॉट यू’, ‘नो ब्रोकन हर्ट’, ‘एफ. एफ. एफ’ ही त्यातली वानगीदाखल. केहलानी आणि जी इझीचे ‘गुड लाइफ’ हे गाणे सांगून आजची यादी संपवावी. हीप हॉप या याद्यांतील (अगदी पॉप असली तरी) बहुतांश गाण्यात अंतर्भूत आहे. आपल्याकडे शौक म्हणून थोडी आणि उगाच काही वेगळे ऐकतोय दाखविण्यासाठी इंग्रजी गाणी ऐकणारा वर्ग अधिक आहे. दोहोंसाठी कर्णसुख ही संगीताची पहिली कसोटी आहे, अन् त्या कसोटीवर हे हीप-हॉप यादीज्ञान पुरेसे म्हणावे लागेल.

  • Mabel – Fine Line (Lyrics) ft. Not3s
  • G-Eazy & Halsey – Him & I
  • Migos, Nicki Minaj, Cardi B – MotorSport
  • Clean Bandit – I Miss You feat. Julia Michaels
  • Bebe Rexha – Meant to Be
  • G-Eazy & Kehlani – Good Life
  • Not3s, Mabel – My Lover

viva@expressindia.com