आपल्याकडे बोलपट आल्यापासून चित्रपटांत गाणी ही खाण्यातील मिठाइतकी महत्त्वाची बनली. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गेली आठ-नऊ दशके ज्या नावाचा अद्यापही उल्लेख होतो, त्या पु.ल. देशपांडे यांना ‘ही कुणी छेडली तार’ या गुळाच्या गणपती चित्रपटामधील (१९५३) गीतामध्ये बेंजोलिन वाजवताना आवर्जून पाहावे. पुढे गिटारद्वारे नायिकेवर ‘इम्प’ मारणारे मिथुन चक्रवर्ती आणि ऋतिक रोशन फिके पडतील. मुद्दा हा की, आपल्याकडे सिनेमा हीट किंवा फ्लॉप ठरविण्यासाठी गाणी हा मुद्दा आवर्जून लागतो. या गाण्यांच्या आधारेच इथले ‘शोमन’, ‘परफेक्शनिस्ट’ किंवा ‘किंग’ वगैरे ठरतात. अमेरिकी-ब्रिटिश संगीतपटांखेरीज चित्रपटात वापरलेले संगीत हे नायक-नायिकेला म्हणण्यास तयार करण्याऐवजी चित्रपटदृश्यांचा परिणाम वाढविण्यासाठी केले जाते. चित्रपटातील कथेच्या परिस्थितीनुरूप गाणी किंवा पाश्र्वसंगीत ऐकू येते. नुकताच माव्‍‌र्हल कॉमिकचे सुपरहिरो रत्न असलेला ‘ब्लॅक  पँथर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यातील गाण्यांनी एक नवा विक्रम बिलबोर्ड यादीमध्ये रचला आहे. चित्रपटाची तिकीटबारी या सिनेमाने गाजवली आहेच. पण बिलबोर्ड यादीतील दोनशे गाण्यांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. ही यादी अल्बमच्या खपविक्रीवर आधारित असते. केंड्रिक लमार याची तीन गाणी असलेल्या ब्लॅक पॅँथर अल्बमला १६ फेब्रुवारीपासून उदंड प्रतिसाद लाभतोय. ‘ऑल द स्टार्स’, ‘किंग्ज डेड’ आणि ‘प्रे फॉर मी’ ही तिन्ही गाणी आपल्या भारतीय श्रवणकेंद्रांसाठी फारच अवजड आहेत. इलेक्ट्रॉनिक वाद्यगीतांची आवड असणाऱ्यांनाही ती पचतील अशातला भाग नाही. आपल्याकडे जी हळुवार प्रेमगीते ऐकायला मिळतात, त्या पठडीतली गाणी ऐकायची असतील तर त्यांनी ‘कॉल मी बाय युवर नेम’ या सध्या ऑस्कर स्पर्धक असलेल्या चित्रपटातील गाणी जवळ करावीत. सुफीजान स्टिव्हन्स या गायकाची सुंदर गाणी त्यात आहेत. ‘मिस्टरी ऑफ लव्ह’, ‘फ्युटल डिव्हायसेस’ ही गाणी आकाशातील ताऱ्यांसबह शांततेत ऐकणे म्हणजे संगीत सोहळा ठरू शकेल. सुफीजान स्टिव्हन्स या गायकाचे वैशिष्टय़ हे की त्याच्या प्रत्येक  गाण्यात वापरली गेलेली तंतुवाद्ये गाणे संपल्यानंतरही आपल्या शरीरामध्ये शिरून जातात. ‘ड्रायव्हिंग लेसन’ नावाचा एक अगदीच लोकप्रिय नसलेला चित्रपट आहे. यातील विशेष हा की हॅरी पॉटरमधून गाजणाऱ्या मुलांच्या त्रिकुटातील रुपर्ट ग्रिंट (रॉन) हा प्रमुख भूमिकेत आहे. यातील सर्वच गाणी लक्षात राहतील. पण ‘ऑल द ट्रीज ऑफ द फिल्ड’ हे गाणे डोक्यात कायमची वस्ती बनवेल. या गायकाचा खरा उत्कर्ष झाला तो ‘लिटिल मिस सनशाईन’ चित्रपटात वापरलेल्या गाण्यांनी. त्यातील ‘शिकागो’ या गाण्याला पुन्हा पुन्हा ऐकूनही कधीच थकायला होणार नाही. अमेरिकेतील शहरावरचे हे गाणे काय ताकदीचे आहे, हे आपण इतक्या दूर असूनही त्यातील भाव पकडू शकत असल्याने ऐकणे महत्त्वाचे आहे. शब्ददृष्टय़ा गाण्याने सौंदर्याची परिसीमा गाठली आहेच. पण वाद्यजुळणी -कोरस आणि तंतू-फूकवाद्यांची अजोड निर्मिती म्हणून या गाण्याला ऐकावे लागेल. आयुष्याच्या रोजच्या प्रवासात एखादे शहर आपल्यासाठी किती महत्त्वाचे असते, ते आपल्याला कसे घडविते आणि बिघडविते, याचा लेखाजोगा आपल्या मनात गोंदलेला असतो.  हे गाणे ऐकल्यानंतर तसा विचार करायला लावते म्हणून थोर आहे. रेजिना स्पेक्टर या गायिकेच्या ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’ या चित्रपटांतील ‘अस’ आणि ‘हिरो’ या गीतांना ऐकणे म्हणजे कानांवर सुखवर्षांव करणे आहे. एमिली या चित्रपटातील संगीत तुकडय़ांइतके छान जर ऐकले असेल, तर ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ चित्रपटातले ‘अलोन इन क्योटो’ एकदा अनुभवाच. लिटिल मिस सनशाईन या चित्रपटातच ‘देवोत्च्का’ या बॅण्डचीही गाणी आहेत. हा चित्रपट रोडमूव्ही या गटात मोडणारा असल्याने त्यातील प्रवासदृश्यांना साजेशी असलेली ‘टील द एंड ऑफ टाइम’ आणि ‘द विनर इज’ ही गाणी प्रवासात ऐकताना अद्भुत अनुभूती येऊ शकेल. ताज्या यादीची वहिवाट मोडणारी ही बहुतांश गाणी चित्रपटाच्या प्रदेशातील असली, तरी आपला श्रवणप्रवास बदलून टाकण्यासाठी एक पाऊल पुढे नक्कीच नेणारी आहेत.

Sufjan Stevens – Chicago

Sufjan Stevens – All the Trees of the Field will clap their Hands

DeVotchKa – Till the End Of Time

Regina Spektor – Hero

Regina Spektor – “Us”

Air – Alone In Kyoto

Kendrick Lamar, SZA – All The Stars

पंकज भोसले viva@expressindia.com