मध्यंतरी एक वाक्य तरुण मुलींमध्ये खूप प्रचलित झालं होतं, ‘व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन’. ती होती एका जाहिरातीची टॅगलाइन. ती अनेक तरुण मुलींनी अनेकांना ऐकवली होती. कदाचित या सूत्राला धरूनच ‘ गर्लियाप्पा’ची सुरुवात झाली असावी. वेब मालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या टी.व्ही.एफ.तर्फे मुलींसाठी सुरू करण्यात आलेलं वेब चॅनल म्हणजे गर्लियाप्पा. आतापर्यंत महिलांसाठी म्हणून टीव्हीवर अनेक मालिका झाल्या. नेहमीचे तेचतेच विषय आणि रटाळ प्रेझेंटेशन यामुळे ते रटाळ व्हायला लागले आणि त्या मालिकांशी आजची तरुण मुलगी रिलेट करू शकत नव्हती. यापेक्षा वेगळ्या, बऱ्याच बोल्ड स्टाइलमध्ये ‘गर्लियाप्पा’ वेब चॅनल सुरू झालं. दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या चॅनलला जवळजवळ एक लाख सबस्क्रायबर्स आणि ८६ हजार व्ह्य़ूज मिळाले आहेत. अशी काय खासियत असावी यामध्ये?
दर वेळेला स्त्रियांशी निगडित प्रश्न फार सीरियस पद्धतीने दाखविण्यात येतात. ‘गर्लियाप्पा’ची पद्धत थोडी वेगळी भासते. यामधील असलेलं ‘द पीरियड साँग’ असू देत नाही तर ‘व्हाय शुड हॉट गर्ल्स हॅव ऑल द फन’ गर्लियाप्पाचा जेंडर स्टिरीओटाइप, मासिक पाळीसंदर्भातील समजुती असे विषयच मांडते, पण पूर्णपणे वेगळ्या ढंगात. उपहासात्मक, अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने किंवा त्याला ब्लॅक कॉमेडीची वेगळी तऱ्हासुद्धा म्हणता येईल. हे विषय मांडताना भाषा, मांडणी याबाबत कुठलाही मुलाहिजा न बाळगता थेटपणे, बिनधास्त मांडणी यातून दिसते.
कल्पना करा.. एक मुलगी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत बसून ‘मॅरिटिअल रेप’सारख्या गंभीर प्रश्नावर चर्चा करत आहे. भारतात तरी हे शक्य नाही. हो ना? पण ‘गर्लियाप्पा’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये हे दाखवलंय. एपिसोडचं नाव आहे- ‘हाऊ आय रेप्ड युवर मदर’. कुठली मुलगी अशा प्रश्नांवर आपल्या संपूर्ण परिवारासोबत बसून चर्चा करेल? पण तसं यात दाखविण्यात आले आहे. विषय गंभीर पण मांडणीत विनोद आहे.आताच्या पिढीला समजेल अशा भाषेत संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश यामध्ये दिसतो. लेटेस्ट एपिसोडच्या या नावावरूनच ‘गर्लियाप्पा’चा बोल्ड अंदाज दिसून येतो.
त्यांच्या ‘व्हाय शुड हॉट गर्ल्स हॅव ऑल द फन’ या व्हिडीयोमध्ये तरुण वयातील सामान्य दिसणाऱ्या मुलींना असलेला कॉम्प्लेक्स, मुलांचे केवळ सुंदर मुलींकडे, (त्यांच्या भाषेत हॉट मुलींकडे) असलेले लक्ष, ते लक्ष वेधून घेण्यासाठी सामान्य मुलींचे प्रयत्न यावर दोन मुलींचे आणि एका मुलाचे संभाषण दाखविले आहे. ‘रामदेव करे तो अनुलोम विलोम, और रामदेवी करे तो गेम ऑफ थ्रोन्स’ या असल्या संवादांमुळे तरुण वर्ग या मालिकांकडे खेचला जातो. ‘द पीरियड साँग’ या व्हिडीओमध्ये मासिक पाळीच्या वेळेला मुलींना होणारे त्रास मांडले आहेत, पण मांडणी तशीच विनोदी, अतिशयोक्तीपूर्ण पण इंटरेस्टिंग आहे. गर्लियाप्पाच्या आतापर्यंत आलेल्या चारही व्हिडीओंमध्ये मुलींशी संबंधित एका तरी गोष्टीवर बिनधास्त भाष्य करण्यात आलंय. त्यात संवेदनशीलता आहे की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं.
व्हिडीओमध्ये भूमिका करणारी कलाकार मंडळी सगळी तरुण आहेत. त्यांनी दाखवलेले विषय अनेक मुलींच्या मनातले आहेत. त्या अर्थाने ही वेब मालिका रिअॅलिस्टिक आहे. पण बहुतांश तरुणाई आपल्या घरच्यांनी एवढय़ा मोकळेपणाने असे विषय अजूनही बोलत नाही. खुलेपणात एक बंधनाची पुसट रेषा अजूनही आहे. गर्लियाप्पासारखी चॅनल्स या रेषेला धडका देत आहेत. या बंडखोरीमुळेच कदाचित तरुणाईला ही चॅनेल्स आवडतात. गर्लियाप्पाचे चारच व्हिडीओ आतापर्यंत आले आहेत. त्यामुळे पुढे याला किती प्रतिसाद मिळतो ते सांगणं अवघड आहे. ‘टी.व्ही.एफ’ची लोकप्रियता बघता आणखी असेच भन्नाट आणि मनोरंजक व्हिडीओज बघायला मिळतील हे मात्र नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा