‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

दोनेक दशकांपूर्वीची लग्नाची वरात आणि आत्ताचा लग्न‘सोहळा’ यात गंमतशीर दिखाऊशौक बदल झाले असले, तरी बदलला नाही तो उत्सवाला बॉलीवुडी गाण्यांचा मुलामा देऊन केला जाणारा नर्तनसोस. वाजंत्र्यांचा ताफा घेऊन लग्नसमारंभाच्या ठिकाणापासून घरापर्यंत एकसुरी, हात वर, अंग वाटेल त्या अंशात फिरवत आणि पायांना आपल्या आवडत्या नायक-नायिकेच्या शैलीत थिरकवत बेभान नाचणारी वरात आता कालबाह्य़ होत आहे. विशिष्ट ड्रेसकोड, महिनाआधी इव्हेण्ट मॅनेजरने आखून दिलेल्या नृत्यदिग्दर्शकाच्या तालावर रंगीत तालीम करून लग्नामध्ये संगीत परफॉर्म करण्याचा ट्रेण्ड भारतातल्या सर्वच शहरांमध्ये वेगाने पसरत आहे. एकीकडे आपली लग्नसंस्था लवचीक होते आहे. लग्न साधेपणात उरकणारे शहाणपण विस्तारत आहे, तर दुसरीकडे आपल्या श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा दर्शनसोहळा अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी पैशाच्या राशी खर्च होत आहेत. हौसेला मोल नसते, हे मांडणाऱ्या पर्सनल व्हिडीओजचा साठा जेव्हा यूटय़ूबवर ओतला जाऊ लागला, तेव्हा आपल्या लग्नातील नृत्याची बरसात तेथे अपलोड करणाऱ्यांचाही भरणा वाढला. आता त्या व्हिडीओजनी प्रेरित होऊन आपल्या लग्नाची इव्हेण्टद्वारे आखलेली वरात, करवले-करवली यांचे बहारदार नृत्य आणि त्या नृत्याचे हाय डेफिनेशन कॅमेरावर चित्रीकरण आणि संकलन करून टाकण्याची फॅशन सध्या लागली आहे. भारताला तिसऱ्या जगातील राष्ट्र म्हणण्याची जराही शक्यता हे व्हिडीओ पाहून होणार नाही. अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत बॉलीवूड कलाकार कोटय़धीशांच्या लग्नामध्ये येऊन नाचायचे कोट-कोटी रुपये घेत असत. पैसे घेऊन वर ते वधू-वरांना आशीर्वादही देत. त्यापेक्षा निम्म्या खर्चात वधू-वर पक्षातील हौशा-गवशा, सुबक-ठेंगण्यांना हेरून त्यांना नृत्यशिक्षणाचा क्रॅशकोर्स द्यायचा आणि धम्माल उडवून द्यायची, हा इव्हेण्ट कंपन्यांचा सध्याचा फंडा आहे. कुणा राधिका-प्रियल यांच्या लग्नाच्या कार्यक्रमातला व्हिडीओ भारतीय गाण्यांवर चित्रित करण्यात आला आहे. सुरुवातीला त्यात एकच नृत्य करणारी महिला दिसते. पहिले गाणे संपताच शिताफीने इतर हौशी नृत्यांगना दाखल होतात आणि लग्नाला पूर्णपणे बॉलीवूड टच मिळताना दिसतो. या नृत्यासाठी कैक दिवस घेतलेली मेहनत लक्षात येते. दुसऱ्या एका लग्नाच्या व्हिडीओमध्ये याहून सराईत नृत्य सापडते. यातली गंमत म्हणजे, बायका आधी नृत्यहौस भागवतात आणि त्यानंतर आपल्या नवऱ्यांनाही नृत्यास भाग पाडतात. या नवऱ्यांपैकी काहीच हौसेने तर काही केवळ आपल्या पत्नीच्या आवडीला साथ देण्यासाठी आलेले असल्याचे स्पष्ट होते. बॉलीवूडच्या आपल्याला परिचित गाण्यावर यांचे नृत्य, त्यांच्या स्टेप्स, त्यातील गतिचूक लक्षात आली, तरी त्यातील धाडस आणि प्रयत्न यांनी गंमत वाटायला लागते. पुढे नाचणाऱ्या जोडप्याचे कौशल्य आणि पाठीमागे नाचताना इतरांच्या नृत्याकडे पाहत चुकणाऱ्यांचे हसू येत नाही. नृत्यशिक्षक आणि या केवळ आनंदासाठी नाचणाऱ्या व्यक्तींचे कौतुक वाटू लागते. ‘लडकी ब्यूटिफूल कर गयी च्चूल’ या आजच्या (बहुधा हिट्ट) गाण्यावर पाहिलेलं एक व्हिडीओसाँग पाहून हा म्युझिक व्हिडीओच आहे का, असा प्रश्न पडतो. यात नवरी नटवली आहे की नाचवली आहे कळायला मार्ग नाही. पण त्याचे कॅमेरावर्क पाहून थक्क व्हायला होते. नुसत्या व्हिडीओच्या देखणेपणावर केलेला खर्च पाहता, या लग्नातील खर्चाची आपण कल्पनाही करू शकत नाही. ‘काला चष्मा’ या पंजाबी गीतावर दिसणारे एक लग्नसंगीत नृत्य पाहिले, तर त्या कुटुंबातील वधू-वर दोन्ही पक्ष नृत्यघराणीच असल्यासारखे वाटू लागेल. अतिशय देखणे समूहनृत्य या गाण्यावर साकारण्यात आले आहे. रुचिका डान्स फॉर अमित अशा एका क्लिपमध्ये तर बॉलीवूड चित्रपटातीलच गाणे शोभावे इतके सुंदर नृत्य झाले आहे. ‘मेरे सय्या सुपरस्टार’ या गाण्यावर भला मोठा हौशी लग्नातील नातेवाईकांचा ताफा नाचताना पाहायला मिळतो. याच लग्नाच्या सोहळ्यामध्ये येणारे सर्व वराती नृत्याआधारेच प्रवेश करताना दिसतात. सारा माहौल बॉलीवूड चित्रपटांनाही फिके ठरविणारा दिसतो. कुणा रोहित आणि अंजलीच्या वेडिंग उत्सवाच्या व्हिडीओमध्येही उत्कट नृत्याला तितक्याच उत्कटतेने कॅमेऱ्याने कैद केले आहे. लग्नसोहळा ही व्यक्तिगत आणि अतिखासगी बाब असली, तरी आपला वेडिंग व्हिडीओ लाखो लोकांना पाहायला मिळावा अन् त्यासाठी तो अत्याकर्षकच असावा या भूमिकेतून अलीकडे यूटय़ूबवर वेिडग डान्स खूप मोठय़ा प्रमाणावर पडत आहेत. अन् त्याला मिळणाऱ्या हिट्स पाहिल्या तर म्युझिक व्हिडीओजहून काहींची संख्या अधिक आहे. पोटशूळ मिळविण्यासाठी नाही, तर खरोखरच बदलत्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे चित्र पाहण्यासाठी हे व्हिडीओज पाहता येऊ शकतील. लग्नसंस्था कधी नव्हे इतकी अशाश्वत बनण्याच्या काळात लग्नाळलेल्या लोकांना चार आनंदक्षणांसाठी एकत्रित पाहण्यातली गंमत मिळेल. उत्स्फूर्ततेच्या बाबतीत कोणत्याही बॉलीवूड कलाकारांना न जुमानणारी हौशी कलाकारांची ओळख होईल.

लग्नसोहळ्यातलं नाचकाम दाखवणाऱ्या काही लिंक्स-

viva@expressindia.com

Story img Loader