हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
कुठलाही ब्रॅण्ड यशस्वी करण्यासाठी आधी ग्राहकांची मानसिकता समजावी लागते. ती ज्याला उत्तम समजते तो उत्तम व्यवसाय क रू शकतो. भारतीय मानसिकता उमजलेला असा ब्रॅण्ड म्हणजे बिग बाजार. रिटेल साखळी क्षेत्रातलं हे बरंच मोठं नाव! प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव घेतला असो अथवा नसो, पण खूप साऱ्या जाहिरातींमुळे ग्राहकांना बिग बाजार माहिती असतंच.
‘फ्युचर ग्रुप’च्या माध्यमातून किशोर बियाणी यांनी हा ब्रॅण्ड भारतीयांच्या सेवेत रुजू केला. किशोर यांना परंपरागत व्यवसायाची पाश्र्वभूमी लाभली असल्याने व्यवसायाचं बाळकडू फार आधीपासूनच मिळत गेलं. त्यांचे आजोबा राजस्थानमधून मुंबईत कापडाचा व्यवसाय करण्यासाठी आले. त्यांच्या बन्सी सिल्क मिलच्या कामात तरुण किशोर लक्ष देत होते. एकीकडे एच. आर. महाविद्यालयात शिक्षण सुरू होतं, पण व्यवसायात भाऊ-वडील यांची संकुचित वृत्ती किशोर यांना खटकत होती. १९८३ मध्ये लग्न झाल्यावर फॅशनेबल कपडय़ांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. उत्पादकांना कपडे उपलब्ध करून देता देता त्यांनी स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. १९८७ मध्ये पुरुषांच्या ट्राऊ झर्स सकट रेडीमेड कपडय़ांच्या दुनियेत त्यांनी पदार्पण केलं. हा ब्रॅण्ड होता ‘पॅण्टालून’. त्याचा विस्तार किशोर यांनी केला. तो एक नामांकित ब्रॅण्ड ठरला, पण काही चुकीच्या व्यावसायिक निर्णयांमुळे बियाणी यांना ‘पॅण्टालून’ विकावं लागलं. सध्या त्याची मालकी आदित्य बिर्ला ग्रुपकडे आहे. पण ‘पॅण्टालून’ने किशोर यांना रिटेल क्षेत्राचा पुरेपूर अनुभव दिला आणि त्या अनुभवातून ‘बिग बाजार’चा जन्म झाला.
२००१ मध्ये कोलकाता येथे बिग बाजारचं पहिलं शोरूम उघडलं गेलं. विविध प्रकारच्या वस्तू एका छताखाली उपलब्ध झाल्या. ‘इससे सस्ता और अच्छा कही नही’ ही टॅग लाईन बोलकी होती. अल्पावधीतच बिग बाजार लोकप्रिय झालं. बिग बाजारसोबतच ‘फ्युचर ग्रुप’च्या ‘फुड बाजार’, ‘फॅशन बिग बाजार’ ( एफबीबी), ई-झोन, ब्रॅण्ड फॅक्टरी, होम टाऊन आणि सेंट्रल या ब्रॅण्डना देखिल पसंती मिळाली.
या लोकप्रियतेत ग्राहकांची मानसिकता ओळखणं हे कौशल्य महत्त्वपूर्ण ठरलेलं दिसतं. बिग बाजारमध्ये उपलब्ध वस्तूंमध्ये बरेचसे ब्रॅण्ड हे फारसे परिचित नसले तरी स्वस्त या वर्गात मोडणारे असतात. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘सबसे सस्ते तीन दिन’ किंवा महाबचत अशा योजना जाहीर करून ग्राहकांना बिग बाजार आकर्षित करतं. बिग बाजारच्या विविध शोरूमचं डिझाइन पाहिल्यास ते गर्दीला पूरक दिसतं. खरेदी करताना ग्राहक तिथेच गर्दी करतात जिथे आधीच घोळका जमलेला असतो. ही मानसिकता बिग बाजारने उत्तम ओळखली आहे. शिवाय इथे मिळणाऱ्या सवलतीसुद्धा ग्राहकांना आकर्षित करतात. एकेकाळी या सवलतींसाठी लांबच लांब रांगा लागायच्या. त्यामागचं तंत्र मात्र वेगळं असतं. १०५ रुपयांना खरेदी केलेली वस्तू साधारणपणे १४९ रुपयाला विकली जात असते. त्यात ऑफर देऊन तीच वस्तू १२९ रुपयाला विकताना ग्राहक आणि विकणारा दोघंही खूश राहतात. शिवाय बिग बाजारसाठी जागा खरेदी करताना बियाणी यांचा धोरणीपणा हादेखील या व्यवसायाच्या यशाचा महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या भागात बिग बाजार शोरूम सुरू करताना गरजेपेक्षा जास्तच जागा विकत घेऊन ठेवल्याने भविष्यात विस्तार करणं त्यांना सोपं गेलेलं दिसतं.
बिग बाजारचा ‘फॅशन बिग बाजार’ हा महत्त्वाचा ब्रॅण्ड. पूर्वी हलक्या दर्जाच्या कपडय़ांमुळे मर्यादित ग्राहक वर्गापुरता राहिलेल्या या ब्रॅण्डला फ्युचर ग्रुपने अधिक दर्जेदार केलं. असीन, कतरीना कैफ, महेंद्रसिग धोनी यांनी या ब्रॅण्डची जाहिरात केली. आणि हा ब्रॅण्ड स्वस्त ते महाग सर्व श्रेणीतील कपडय़ांसाठी नावाजला जाऊ लागला.
आज बिग बाजार २५६ स्टोअर्सच्या माध्यमातून भारतातील तळागाळातील भागापर्यंत पोहोचलं आहे. बिग बाजारची नवी टॅग लाइन, ‘नये इंडिया का बाजार’ नव्या पिढीला लक्ष्य करते. किशोर बियाणी यांचं एक सुप्रसिद्ध विधान आहे. ते म्हणतात, ‘आम्ही ते सारं नष्ट करण्यावर विश्वास ठेवतो, जे आम्ही निर्माण केलं आहे’. आधीची गणितं मोडून नव्याने गणितं मांडायचा हा डाव आतापर्यंत तरी यशस्वी ठरलेला दिसतो.
भारत ही ग्राहकांची पंढरी आहे. अफाट लोकसंख्येमुळे रिटेल चेन सुरू करणं ही उत्तम कल्पना असली तरी ती यशस्वीपणे चालवून दाखवणं कठीण असतं. बिग बाजारने छोटय़ा छोटय़ा क्लृप्त्यांमधून ते साध्य केलं आहे. एकदा का, इथे स्वस्त मिळतं हा समज झाला की, सवलतींचा ओघ आटूनही ग्राहक त्या ब्रॅण्डला चिकटून राहतात. नेमकं हेच बिग बाजारने साध्य केलं असल्याने हा एक यशस्वी ब्रॅण्ड न ठरता तर नवलच!
viva@expressindia.com