एकीकडे एमटीव्हीचा उदय होऊन संगीतकार-गायकांना सेलिब्रेटीपद मिळण्यासाठी वातावरण तयार झाले असताना अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ‘अल्टरनेटिव्ह रॉक’ची चळवळ तयार झाली होती. यातल्या कित्येक कलाकारांना मुख्य प्रवाहातील संगीतसम्राटांइतकी प्रसिद्धी-पैसा मिळाला नाही. गुणवत्ता असूनही म्युझिक कंपन्यांनी नाकारलेल्या आणि तरीही स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी असणाऱ्या कित्येक संगीतकारांनी तुटपुंज्या साधनांमध्ये स्वत:च आपले संगीत प्रकाशित आणि प्रसारित केले. लोकप्रिय गजबजत्या सिनेमा काळात आपल्याकडे तयार झालेली समांतर सिनेमांची किंवा प्रथितयश नियतकालिकांनी नाकारलेल्या लेखकांनी तयार केलेली लिटिल मॅगझिन चळवळीसारखीच ही बंडखोर कलावंतांची पिढी ऐंशीच्या उत्तरार्धात आपला स्वरझेंडा मिरवू पाहत होती. या गायक-कलावंतांना व्यवस्थेविरुद्ध आणि एकूणच कला-समाजात चाललेल्या दांभिकतेविरोधात राग होता. पंक रॉक हा शिव्या-ओव्यांच्या शब्दांनी भरलेला आणखी एक उपप्रकार अल्टरनेटिव्ह रॉक म्युझिकमध्ये अवतरला. यातल्या कुणालाही मायकेल जॅक्सन किंवा तत्कालीन रॉकस्टार बनता आले नसले, तरी त्यांच्यातूनच काही उत्तम बॅण्ड आणि संगीत तयार झाले. ‘आर.ई.एम’ नामक बॅण्ड या चळवळीतूनच लोकांना उमजला आणि म्युझिक कंपन्यांनी त्याला पुढे सर्वदूर पोहोचवला. १९९० नंतर अल्टरनेटिव्ह रॉक चळवळ खूपच जोमाने फोफावली. संगीत निर्मिती आणि प्रसारण इंटरनेटच्या माध्यमातून पसरविणे सोपे झाल्यानंतर या कलावंतांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या. अमेरिकी संगीत मासिकांच्या अल्प भरभराटीच्या काळात तरुण संगीत समीक्षकांची फौज तयार झाली. त्यांनी मुख्य धारेइतकेच अल्टरनेट रॉक संगीतातील उत्तम ऐकण्याची सवय लोकांना लावली. ‘पिचफोर्क’ या ऑनलाइन मासिकाने संगीत पत्रकारितेतील अंतिम शब्द अशी ओळख तयार केली. या मासिकाने अनेक अल्टरनेटिव्ह रॉक संगीतकारांची कारकीर्द सजवली. त्यातल्या काहींनी थेट ग्रॅमीपर्यंत मजल गाठली.
अल्टरनेटीव्ह म्युझिक म्हणजे ऐकण्यासाठी वेगळे असेल, असा समज करून घेऊ नये. यातील कित्येक कलाकार मोठय़ा संगीत कंपन्यांऐवजी, प्रसिद्धी यंत्रणेऐवजी थेट यूटय़ूबवर किंवा समाजमाध्यमांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे म्युझिक व्हिडीओ आपल्या एमटीव्ही किंवा व्ही चॅनल, व्हीएचवनवर झळकणे अशक्य आहे. तरी कानांना उत्तम अनुभव देण्याची अन् मनाला प्रसन्न करण्याची ताकद असलेले कित्येक कलाकार आपल्याला सहज सापडू शकतात. कर्ट व्हाइल या अमेरिकी कलाकाराची गाणी अलीकडे या प्रकारातील गाजत असलेली अगदी ताजी म्हणता येईल. पुढल्या महिन्यात या कलाकाराचा नवा अल्बम येत आहे. अन् दहा दिवसांपूर्वीच त्यातील ‘बझ्ॉकवर्ड्स’ हे अप्रतिम गाणे प्रकाशित झाले आहे. संपूर्ण गाणे हे समुद्रकिनारी बसून देखण्या लाटा अनुभवत असल्याची अवस्था आणून देणाऱ्या गिटारच्या कसबी वादनाने बसविण्यात आले आहे. या कलाकाराची आणखी बरीच गाणी उपलब्ध आहेत. पण कर्टनी बर्नेट या ऑस्ट्रेलियन गायिकेसोबत त्याने केलेले ‘कॉन्टिनेण्टल ब्रेकफास्ट’ हे गाणे आवर्जून ऐकावे. या दोघांनी फार सुंदर युगलगीते तयार केली आहेत. एनपीआर कन्सर्टसाठीचे त्यांचे लाइव्ह वादन आणि गायन यूटय़ूबवर सहज उपलब्ध आहे. बझ्ॉकवर्ड्स हे गाणे ऐकल्यानंतर या साऱ्यांची ब्राऊसिंग सैर अत्यावश्यकच बनते.
जंगो जंगो हा ब्रिटिश बॅण्ड २००९ साली तयार झाला. त्यांची गाणी ब्रिटनखेरीज इतर देशांत फार प्रचलित नाहीत. तरीही या वर्षी प्रकाशित झालेले स्विमिंग अॅट नाइट हे गाणे ऐकण्यासारखे आहे. त्यातील रेट्रो साऊंड कानांना सुखावणारा आहे.
बार्न्स कर्टनी (बार्नबी कर्टनी) याचे नाइन्टी नाइन हे गाणे त्या वर्षांतल्या आनंदाचे गमतीशीर स्मरणरंजन आहे. हा गायक जन्मला ब्रिटनमध्ये, वाढला अमेरिकेत आणि संगीत प्रवाहात येण्यासाठी परतला ब्रिटनमध्ये. याच महिन्यात प्रकाशित झालेल्या नाइन्टी नाइन गाण्यामुळे नव्याने तो अल्टरनेटीव्ह रॉकच्या वर्तुळात गाजतोय.
आपल्या सर्वसामान्य श्रोत्यांवर सिनेसंगीताचा पगडा इतका आहे, की नव्वदीच्या अखेरीस सुरू झालेल्या पॉप संगीताच्या पर्यायी पर्वाला अल्प काळातच आटोपते घ्यावे लागले. तरीही व्ही जॅमीन आणि एमटीव्हीच्या अनप्लग्ड कन्सर्ट्सनी अलीकडच्या काळात चांगले पर्यायी संगीत दाखल झाले आहे. यूटय़ूब माध्यमावर तरुणाई नव्या गाण्यांची वैविध्यपूर्ण व्हर्जन्स तयार करीत आहेत. त्यांनाही प्रस्थापितांइतकी नाही, तरी मान्यता पुढील काळात मिळण्याची शक्यता आहे.
म्युझिक बॉक्स
Kurt Vile – Bassackwards
Thom Yorke – Suspirium
Django Django – Swimming At Night
Barns Courtney – “99”
Ezra Furman – Unbelievers
Still Corners – The Trip
Slowdive – Star Roving
viva@expressindia.com