एकीकडे एमटीव्हीचा उदय होऊन संगीतकार-गायकांना सेलिब्रेटीपद मिळण्यासाठी वातावरण तयार झाले असताना अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ‘अल्टरनेटिव्ह रॉक’ची चळवळ तयार झाली होती. यातल्या कित्येक कलाकारांना मुख्य प्रवाहातील संगीतसम्राटांइतकी प्रसिद्धी-पैसा मिळाला नाही. गुणवत्ता असूनही म्युझिक कंपन्यांनी नाकारलेल्या आणि तरीही स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी असणाऱ्या कित्येक संगीतकारांनी तुटपुंज्या साधनांमध्ये स्वत:च आपले संगीत प्रकाशित आणि प्रसारित केले. लोकप्रिय गजबजत्या सिनेमा काळात आपल्याकडे तयार झालेली समांतर सिनेमांची किंवा प्रथितयश नियतकालिकांनी नाकारलेल्या लेखकांनी तयार केलेली लिटिल मॅगझिन चळवळीसारखीच ही बंडखोर कलावंतांची पिढी ऐंशीच्या उत्तरार्धात आपला स्वरझेंडा मिरवू पाहत होती. या गायक-कलावंतांना व्यवस्थेविरुद्ध आणि एकूणच कला-समाजात चाललेल्या दांभिकतेविरोधात राग होता. पंक रॉक हा शिव्या-ओव्यांच्या शब्दांनी भरलेला आणखी एक उपप्रकार अल्टरनेटिव्ह रॉक म्युझिकमध्ये अवतरला. यातल्या कुणालाही मायकेल जॅक्सन किंवा तत्कालीन रॉकस्टार बनता आले नसले, तरी त्यांच्यातूनच काही उत्तम बॅण्ड आणि संगीत तयार झाले. ‘आर.ई.एम’ नामक बॅण्ड या चळवळीतूनच लोकांना उमजला आणि म्युझिक कंपन्यांनी त्याला पुढे सर्वदूर पोहोचवला. १९९० नंतर अल्टरनेटिव्ह रॉक चळवळ खूपच जोमाने फोफावली. संगीत निर्मिती आणि प्रसारण इंटरनेटच्या माध्यमातून पसरविणे सोपे झाल्यानंतर या कलावंतांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या. अमेरिकी संगीत मासिकांच्या अल्प भरभराटीच्या काळात तरुण संगीत समीक्षकांची फौज तयार झाली. त्यांनी मुख्य धारेइतकेच अल्टरनेट रॉक संगीतातील उत्तम ऐकण्याची सवय लोकांना लावली. ‘पिचफोर्क’ या ऑनलाइन मासिकाने संगीत पत्रकारितेतील अंतिम शब्द अशी ओळख तयार केली. या मासिकाने अनेक अल्टरनेटिव्ह रॉक संगीतकारांची कारकीर्द सजवली. त्यातल्या काहींनी थेट ग्रॅमीपर्यंत मजल गाठली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा