टॉम अॅण्ड जेरीसारखी सतत सुरू असणारी भावा-बहिणींची खटय़ाळ भांडणं हा विषय घेऊन यूटय़ूब स्टार मिथिला पालकरनं केलेला व्हिडीओ सध्या गाजतोय. लिटिल थिंग्ज या नव्या वेबसीरिजचा हा पहिला भाग आहे.
‘रिमोट दे ना, माझं बेब्लेड सुरू झालं असेल’
‘नाही देणार, मला आत्ता पॉवरपफ गर्ल्स बघायचंय’
इथपासून सुरू झालेलं हे भावाबहिणीचं खटय़ाळ भांडण दोघंही वयाने कितीही मोठे झाले तरी सुरूच राहतं. फक्त पॉवरपफ गर्ल्स आणि बेब्लेडऐवजी हा ‘रिमोट’संघर्ष ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ यांच्यात सुरू होतो इतकंच ! ही चकमक नेहमी रिमोटवरूनच होते असं नाही, तर कोणी कुठलं काम करायचं, गेल्या वेळी ते काम कोणी केलं होतं, आईने मुळात ते काम कोणाला सांगितलं होतं अशा अनेक गोष्टींमधून ही मस्ती फेरफटका मारून येते.
रक्षाबंधनाच्या पाश्र्वभूमीवर सध्याची गाजणारी युटय़ुब स्टार मिथिला पालकर हिने वीर सिंग आणि ध्रुव सेहगल यांच्यासोबत बहीणभावाचं गोड नातं मिश्किलपणे दाखवणारा व्हिडीओ रिलीज केला आहे. तिच्या नवीन येऊ घातलेल्या ‘लिटल थिंग्स’ या वेब सिरीजचा हा पहिला एपिसोड आहे. सतत छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून होणारी तू तू मैं मैं तिने या व्हीडिओमधून खुमासदारपणे दाखवली आहे. बहिणीचा फोन खराब झाला म्हणून भावाचा जुना वापर असं सांगणारी आई आणि भावाला टी-शर्ट होत नाही म्हणून बहिणीला देऊन टाक सांगणारी आई नेहमीच या भांडणात न्यायाधीशाच्या भूमिकेत असते.
बहिणीच्या मैत्रिणींना ‘स्टॉक’ करणारा दादा आणि भावाच्या मित्रांशी गप्पा मारणारी बहीण हे नेहमीच एकमेकांवर लक्ष ठेवून असतात. बहीण जरा कुठे मित्रासोबत बाहेर जायला निघाली की, भाऊ त्या मित्राची शाळा घेतो म्हणून भावावर रागावणारी बहीण त्याच भावाबद्दल मित्र जरा काही उलटसुलट बोलला तर मात्र अजिबात ऐकून घेत नाही. आपली कोणती मैत्रीण आपल्याला ‘वहिनी’ म्हणून चालेल त्याचा अंदाज घेऊन स्वत:च्या मैत्रिणींना ‘भाई है वो मेरा, और इसलिये तेरा भी’ असं ठणकावून सांगणारी बहीण दादाच्या गर्लफ्रेण्डसोबत बाहेर फिरायला जायच्या प्लॅनला मात्र हिरिरीने मदत करते. बाहेरच्यांच्या विरुद्ध दोघांची अगदी लगेच युती होते. एकमेकांशी कायम टॉम अॅण्ड जेरीसारखे भांडत असतात. एकमेकांच्या खोडय़ा काढणं आणि दुसऱ्याला जास्ती ओरडा कसा मिळेल याची पूर्ण खबरदारी घेणं हे जणू एकमेव उद्दिष्ट असतं. काही बाबतींमध्ये दोघांनाही एकमेकांशिवाय पर्याय नसतो.
आईच्या वाढदिवसाला गिफ्ट काय द्यायचं हे भावाला कळतही नाही आणि ‘मी मोठं गिफ्ट देईन’ म्हणणाऱ्या त्याला ऐनवेळी लक्षातही राहत नाही. बहिणीने मेहनतीने शोधून, काही वेळा कस्टमाइज करून, घेतलेल्या गिफ्टवर मग नाइलाजाने दादाचंही नाव घालावं लागतं. तिला गाडी शिकायची असते, दादाशिवाय चांगलं ड्रायव्हिंग कोण शिकवणार! मग दादाला मस्का मारला जातो, मी गाडी ठोकणार नाही याचं अगदी मनापासून प्रॉमिस केलं जातं. आणि ती नक्की गाडी ठोकणार, बंद पाडणार हे दादालाही पक्क माहीत असूनसुद्धा तो तिला गाडी शिकवायला घेऊन जातो.
भांडणाचे किस्से काही कमी नसतात, मात्र मिथिलाच्या या व्हीडिओने या सगळ्याला पुन्हा उजाळा दिला. गिफ्ट दिलंच नाही, दिलेलं आवडलं नाही, हे तर माझ्याकडे आधीच होतं, हे आणि असे संवाद रक्षाबंधनाच्या निमित्ताने घराघरांतून ऐकायला मिळतील. येऊ घातलेल्या नवीन भांडणाची ही पूर्वकल्पना !
वेदवती चिपळूणकर