कॅफे म्हटलं की डोळ्यांसमोर येते एक प्रसन्न वातावरण असणारी जागा, सुंदरशा डिझायनर मगमध्ये दिली जाणारी गरमागरम वाफाळलेली कॉफी किंवा चहा नि त्याच्या सोबतीला खाल्ली जाणारी सँडवीचेस, सॅलड्स, ब्राऊनिज किंवा मग मनपसंत वॉफल्स. खरं तर तुमच्या कल्पनेतील कॅफे ही अशीच.. आपण नेहमी जातो अशी वास्तू. पण यामागे ‘पेट’ हा शब्द जोडला की, एक वेगळीच संकल्पना उभी राहते. मुंबईतल्या पहिल्या कॅट कॅफेला भेट दिलीत तर ही संकल्पना लक्षात येईल. सोडून दिलेल्या, जखमी मांजरांचं हे हक्काचं ठिकाण आहे. माऊवर प्रेम करणारी अनेक मंडळी, लहान मुलं या कॅट कॅफेला रेग्युलरली भेट देतात. पेट कॅफे ही मूलत: पाळीव प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची संकल्पना असली तरी त्याचे अनेक पलू आहेत. लोकांना प्राण्यांबद्दल प्रेम वाटावं नि जास्तीत जास्त प्रमाणात अशा प्राण्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना दत्तक घ्यावं हा देखील त्यामागचाच एक हेतू आहे.
‘पेट कॅफे’ ही आपल्यासाठी अगदीच नवीन संकल्पना आहे. पाळीव प्राण्यांबद्दल लोकांमध्ये प्रेम निर्माण करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या संरक्षणाच्या आणि संगोपनाचा दृष्टीने कार्य करणे हा या पेट कॅफेजचा हेतू आहे. आपल्या देशात नवीन असणारी हे पेट कॅफेची संस्कृती आशिया खंडातील जपान, सिंगापूरसाठी तशी फार जुनी आहे. सध्याच्या संकल्पनेनुसारचा सगळ्यात जुना पेट कॅफे १९९८ साली तवानमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. या परिसराला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे त्याला कालांतराने प्रेक्षणीय स्थळाचं रूप मिळालं. तवाननंतर बाकीच्या आशियायी देशांमध्ये ही पेट कॅफेची पद्धत सुरू झाली. जपानमध्ये घरांची जागा कमी असल्या कारणाने तर ही पेट कॅफे पद्धती त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्नामध्ये जगातला सगळ्यात पहिला कॅट कॅफे १९१२ मध्ये स्थापन करण्यात आला होता. मात्र १९१३मध्ये सुरळीत चालणाऱ्या या कॅफेची घडी महायुद्धात विस्कळीत झाली नि कालांतराने हा कॅफे काळाच्या पडद्याआड गेला. इंग्लंडसारख्या देशात मात्र प्राण्यांविषयक काम करणाऱ्या संघटनांचा अशा पेट कॅफेजना विरोध आहे. पाळीव प्राण्यांना हवं असणारं वातावरण अशा कॅफेमधून मिळत नाही, माणसांचा अशा ठिकाणचा वावर/हस्तक्षेप त्यांना आक्षेपार्ह वाटतो. इतर देशांच्या मानाने भारतामध्ये पेट कॅफे ही संकल्पना रुजू व्हायला तसा बराच काळ लागला.
अशा प्रकारचा पहिला मांजरींसाठीचा पेट कॅफे, ‘कॅट कॅफे स्टुडिओ’ या नावाने २०१०मध्ये मुंबईत वर्सोव्याला एका छोटय़ा बंगल्यात उघडला गेला. लोकांचा प्रतिसाद बघता आज त्यांच्याकडे ३० मांजरं आणि ३ कुत्रे एका खुशाल परिवारासारखे राहात आहेत. याशिवाय शेकडो मांजरींना या कॅफेच्या माध्यमातून हक्काचं घर मिळालं आणि अनेक मांजरींना जीवघेण्या संकटातून जिवदान मिळालं आहे. मृदू खोसला यांनी डॉक्टर चारू खोसला आणि जोसन मॉस यांच्या समवेत या कॅफेची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जसे पेट कॅफेजमध्ये मांजरांशी किंवा कुत्र्यांशी खेळायला किंवा त्यांची देखभाल करायला तासिका तत्त्वावर भेटीचे पसे घेतले जातात त्याप्रमाणे इथे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. कॅट कॅफे स्टुडिओसाठी छंद म्हणून काम करणारे अनेक तरुण आहेत. या स्टुडिओची मॅनेजर यशश्री काळे म्हणते, ‘‘मांजर हा मुळात एका जागी स्वस्थ बसणारा प्राणी नाही. या आमच्या ३० मांजरी घरभर इतक्या फिरत राहतात आणि दडून राहतात की, इतक्या मांजरींना शोधणं नि सांभाळणं कठीण होऊन जातं. पण त्यातही एक वेगळीच मजा आहे.’’ कॅट कॅफेच्या कार्यपद्धतीबद्दल ती सांगते, ‘‘आम्ही मुख्यत्वेकरून रस्त्यावरून उचलून आणलेल्या किंवा एखाद्या अतिप्रसंगातून रक्षण केलेल्या मांजरींना आमच्याकडे ठेवतो. त्यांचं रक्षण आणि संगोपन करणं हा आमचा उद्देश आहे. इथे आलेल्या लोकांनी मांजरींना दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करावं यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. मांजरीची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या सवयी, खाणं-पिणं याची योग्य माहिती आम्ही देतो. अनेक मांजरी आम्ही दत्तक दिल्या आहेत. इथे कॅफेमध्ये आलेल्या लोकांमध्ये प्राणी प्रेम बघून बरे वाटते. स्वत: पाळलेल्या मांजरींना कॅफेमध्ये घेऊन येण्याची मात्र आम्ही परवानगी देत नाही. कारण मांजर असा प्राणी आहे की, तो त्याच्या टेरिटरीबद्दल संवेदनशील असतो. आमच्या इथे असणाऱ्या या प्राण्यांना आणि बाहेरून आलेल्या त्या मांजरीला एकमेकांच्या संपर्कात त्रास होण्याची किंवा त्यांच्या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता असते.’’
पेट कॅफेमध्ये डॉक्टर्सची टीम या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी सज्ज असते. प्राण्यांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिलं जातं. पेट कॅफे म्हणजे आपल्यासाठी कॅफे आणि या प्राणीमित्रांसाठी निखळ सेवा नि प्रेम यांचं कॉम्बिनेशन असतं.
पेटफ्रेण्डली कॅफे
कॅट कॅफेमध्ये तुम्ही तुमच्या मांजरीला किंवा श्वानाला घेऊन जाऊ शकत नाही. पेटला घेऊन बाहेर जेवायला किंवा कॉफीला जाणार असाल तर आता त्यासाठीदेखील वेगळी सोय हल्ली आहे. पेटफ्रेण्डली रेस्टॉरंट्स आणि पेटफ्रेण्डली कॅफे ही संकल्पना मुंबई-पुण्यात दिसू लागली आहे. अशा पेटफ्रेण्डली कॅफेंमध्ये तुम्ही आपल्या पेटला बरोबर घेऊन खाण्या-पिण्याचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्यासमवेत तुमच्या या लाडक्या चार पायांच्या दोस्तांसाठी खास सोय तिथे असते. पेट सिटिंगही केलं जातं. ते आसपास निर्धोकपणे बागडू शकतात. बांद्र्याचं गोस्ताना, बेगल शॉप किंवा हर्लीज कॉर्नर ही अशाच पेट फ्रेंडली कॅफेजची काही उदाहरणं.
कॅट कॅफे स्टुडिओच्या सहसंस्थापक डॉ. चारू खोसला यांना एक मांजर फारच वाईट अवस्थेत मिळाली. ती जखमी होती. एक डोळा अक्षरश: बाहेर लोंबत होता. ती रक्ताने माखलेली होती आणि भुकेने व्याकूळ झाली होती. दुसऱ्या दिवशी आमच्या या लाडक्या अमिलियावर ऑपरेशन करून घेतलं आणि तिची काळजी घेत गेलो. आज ती अगदी सुदृढ आहे आणि आमच्या कॅट कॅफेचं अॅट्रॅक्शन झाली आहे .
– यशश्री काळे, व्यवस्थापक कॅट कॅफे स्टुडिओ, मुंबई