22प्रसिद्ध फूड ब्लॉगर समिना पटेल हिची पास्ताची रेसिपी जगात सर्वोत्कृष्ट ठरली. या टेक्नोसॅव्ही सुगरणीशी बातचीत.

जमाना किती बदललाय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे.. मला स्वयंपाकाची आवड आहे. मी स्वयंपाकघरात रमते असं म्हणणारी तरुण मुलगी ओल्ड फॅशण्ड ठरते हल्ली. स्वयंपाक यायलाच पाहिजे आणि प्रत्येक मुलगी सुगरणच असली पाहिजे ही अट असायची मागच्या जमान्यात. पण या बदललेल्या जमान्यातदेखील तरुण सुगरणी आहेतच आणि त्या अजिबात ओल्ड फॅशण्ड नाहीत तर चांगल्या प्रयोगशील आहेत, टेक्नोसॅव्ही आहेत आणि स्वयंपाक करणं ही बाईची जबाबदारी, कर्तव्य अशा भावनेतून नाही तर स्वयंपाक करणं, नवनवीन पदार्थ करून बघणं ही आवड म्हणून, छंद म्हणून जोपासत आहेत. समिना पटेल या २२ वर्षीय तरुणीची गोष्ट याचं मूर्तिमंत उदाहरण. आपल्या या छंदाला तिने ब्लॉगिंगचं कोंदण दिलं आणि समिना जगात प्रसिद्ध झाली. समिनाला नवनवीन पदार्थ करायची केवळ आवडच नव्हे तर त्याचं वेड आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘डेल माँटे’ या फूड कंपनीच्या इटालियन रेसिपी स्पर्धेमध्ये ‘फूड ब्लॉगिंग’च्या माध्यमातून सहभागी झालेल्या देशविदेशातील ब्लॉगर्समधून समिना पटेलची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. तिच्या ‘ऑरेंज बटर सॉस स्पगेटी विथ फेनेल इटालियन मेरिन्ग्यु किस’ या पास्ताच्या प्रकाराने तिला या स्पर्धेत सर्वोत्तम ठरविलं.
आजची पिढी स्वयंपाकात केवळ रसच घेत नाही तर प्रयोगांतून नवनवीन पदार्थ निर्माणदेखील करते. ‘मी केलेल्या पदार्थात माझ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे, त्याला माझा स्वत:चा वेगळा ‘टच’ असला पाहिजे’, असं समिनाला मनापासून वाटतं. ‘माझ्या रेसिपीवरून माझी ओळख पटली पाहिजे या निश्चयामुळे एकदा केलेली रेसिपी मी पुन्हा करत नाही.. असंही समिना सांगते. ‘कपकेक कन्फेशन्स’ हा फूड ब्लॉग सुरू करून या माध्यमातून तिने तिच्या छंदाला वाट मिळवून दिली आणि आता त्याच चिकाटीने तिला सर्वोत्कृष्ट ठरवलं आहे. समिनाशी गप्पा मारताना तिचा मनस्वी स्वभाव आणि तिचा छंदाकडे बघण्याचा प्रोफेशनल अ‍ॅप्रोच जाणवत होता. ‘डेल माँटेसारख्या मोठय़ा स्पर्धामधून आत्मविश्वास वाढायला मदत होते, कल्पकतेचा कस लागतो. प्रोफेशनल रेसिपीज ‘प्रेझेंटेबल’ असाव्या लागतात. त्याचा सराव होतो, प्रशिक्षण मिळतं, नवीन शिकायला मिळतं’, ती सांगते. आपण तयार केलेले पदार्थ नुसते बघून ते खाण्याची इच्छा समोरच्याला व्हायला हवी, असा त्या पदार्थाचा ‘लूक’ असावा, हा प्रोफेशनल कुकिंगचा मंत्र आहे, असं समिना म्हणाली.
फूड ब्लॉगिंग हा प्रकार अलीकडे चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. ऑनलाइन ब्लॉग वाचकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या संकल्पनेतून अनेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काही ‘करून दाखविण्यासाठी’ केवळ त्याचे चाकोरीबद्ध शिक्षण हा एकच मार्ग नसून अनेकविध पर्याय आजच्या तरुणाईसाठी खुले झाले आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी हल्ली गरज असते केवळ जिद्दीची, चिकाटीची आणि कामातल्या झपाटलेपणाची. समिना पटेलच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होतं.

viva.loksatta@gmail.com

Story img Loader