शेफ वरुण इनामदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या मनात नेहमीच एक विचार घोळत असतो. लोक पश्चिमधार्जिणे का आहेत? म्हणजे परदेशातलं ते सारं चांगलं, असा समज ते का बाळगून असतात? सातासमुद्रापलीकडून येणारी प्रत्येक गोष्ट कशी आहे? तिचा दर्जा काय? हे सारं पाहण्याची साधी तसदीही कुणी सहसा घेत नाही. हे असं करताना भारतीयांची मने कुठल्या तरी गंडाने भरलेली असतात. पण अगदी याउलट पाश्चिमात्यांचं असतं!! ते भारतीयांसारखा न्यूनाचा विचार करीत नाहीत. न्यून म्हणजे कमीपणा मुळांसकट उखडून टाकण्यासाठी ते प्रत्येक बाबीचा सूक्ष्म विचार करतात. बाहेरच्या देशातून जे काही त्यांच्या देशात जाईल त्याची छाननी अत्यंत काटेकोरपणे केली जाते. म्हणजे पूर्वापार त्यांच्या चित्तात, हा सकारात्मक अर्थाने छिद्रान्वेषी गुण मुरलेला आहे. पण हे सारे आव्हानात्मक वातावरण नेहमीच आनंददायी असते आणि या साऱ्या आव्हानांना पुरून उरण्याची तयारी प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवी.

अरब अमिरातीतील एका हॉटेलात बसून तुर्किश कॉफी पीत पीत मला हे सुचले आहे. काही महिन्यांपूर्वी मी व्हिएतनाममध्ये जागतिक कोको परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित होतो. मंचावर केवळ १५ जणांनाच आमंत्रित करण्यात आलेले होते. कोको क्षेत्रात भारताचे योगदान काय? याविषयी मला बोलायचे होते; पण मी भारतीय प्रतिनिधी म्हणून तिथे आलोय असे त्यांना कळाले आहे, तत्क्षणी ते सारे तोंडात मिठाची गुळणी धरून बसले.  मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही नव्याने भेटलो तेव्हा ते सारे जण उठून उभे राहिले. मग काय, आमची साऱ्यांची छानच गट्टी जमली! पण हे सारे का घडले तर एका गैरसमजातून. कदाचित माझ्यासाठी तीच एक गोष्ट माझ्या मनात कायम राहील. एक शेफ म्हणून माझ्यासाठी हे नित्याचे आहे; पण जागतिक स्तरावर वावरताना असे न्यूनत्व घेऊन का जायचे, कळीचा प्रश्न आहे. असो. पण काही गोष्टींना औषध नसते!!

आजच्या कथनाचे सार काय? तर अस्सलतेशी जराशीही तडजोड न करणारे अल्कोहोलच्या जगतातील काही जादूगार. या मद्य जादूगारांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले आहे. अल्कोहोलच्या क्षेत्राचे ते प्रमुख खांबच आहेत, असे म्हणावे लागेल आणि ‘मेड इन इंडिया’चेही ते बिनीचे शिलेदार आहेत. अल्कोहोल, वाइन, रम किंवा दारू हे विषय वर्ज्य असतानाही ‘अल्कोबेव्ह’ची संस्कृती वाढीस लावणारे भारतीय मी तुम्हाला या लेखात समजावून सांगणार आहे. गेल्या दशकात ‘दारूकामा’ची वाट खडतर होती. अशा अडथळ्यांच्या वाटेवर चालणे सुकर करणारे काही जण जमिनीवर पाय रोवून उभे होते. यालाच भारतातील अल्कोबेव्ह चळवळ म्हणतात. काहींनी ती यशस्वीपणे पुढे नेली. अल्कोबेव्ह उद्योगाच्या अजेंडय़ावर भलेही ‘मेड इन इंडिया’ नव्हता असेल, परंतु तरुण व्यावसायिकांनी भारतीय कारागिरीचे दर्शन जगाला घडविले. वाइन उद्योगाने भारतात पावले बळकट करण्यास बराच काळ घेतला. जगाच्या व्यासपीठावर भारतीय वाइनचं चांगलं नाव व्हावं यासाठी कंवल ग्रोव्हर आणि श्याम चौगुले हे दोघे पुढे आले. त्यांनी दर्जेदार वाइनचं स्वप्न सत्यात उतरवलं. भारतातील या उद्योगाने विस्तारत अनेक परदेशी नागरिकांना प्रेमात पाडले. बघता बघता ‘ग्रोव्हर ला शॉव्हीन रिझव्‍‌र्ह’ उभारले गेले. यानंतर कळस म्हणजे राजीव सामंत यांनी ‘सुला वाइनयार्ड’ उभारले. त्यामुळे आमच्या साऱ्यांच्या शब्दकोशात शेनीन ब्लाँ, शॉव्हिन ब्लाँ झिनफान्देल आणि मेर्लो, असे काही नवे शब्द जोडले गेले. वाइनच्या उद्योगाची वेल वाढत गेली. सुला, ग्रोव्हर झम्पा, फोर सिझन्स, फ्रॅटेली, रिव्हेलीओ, चारोसा, गुड ड्रॉप, योर्क, व्हॅलोन, एसडीयू, क्रस्मा अशा काही मोजक्या ब्रँड्सनी बाजारात नाव कमावलेले आहे.

व्हिस्कीच्या साम्राज्यात पाऊल टाकल्यास समजेल की, कसौलीतील ‘सोलान नंबर वन’ ही भारतीय परंपरेतील धान्यापासूनची व्हिस्की आहे. त्यानंतर ‘मॅकडोवेल’ची सिंगल माल्ट; परंतु ही व्हिस्की काही काळापुरतीच निर्मितीच्या क्षितिजावर उभी होती. त्यानंतर जिच्या अस्तित्वाविषयी कोणालाही फारसं काही माहीत नाही. अशा अमृत सिंगल माल्ट व्हिस्कीने अनेकांच्या गळ्यांना सुखद अनुभव दिला आहे. या ‘अमृत’नेच भारताला व्हिस्की निर्मितीत जगाच्या नकाशावर आणून ठेवले. सुरिंदर कुमार यांच्या ध्येयासक्त प्रयत्नांमुळेच भारतीय जलसुवर्णाला अर्थाला ‘अमृता’ला जागतिक स्तरावर अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

त्यानंतर पॉल जॉन येतो. त्याच्या सिंगल माल्टची अनुभूती सर्वाना येते. यालाच ‘पॉल जॉन ब्रिलियन्स’ आणि ‘एडिटेड’ म्हणतात. मायकेल डिसुझा हे त्यातील एक आघाडीचं नाव म्हणता येईल. आपल्या कामात सतत गुंतून राहायचं. सतत प्रयोग करीत राहायचं आणि ते करताना स्वत:ला कधीच प्रसिद्धीच्या झोतात येऊ द्यायचं नाही; पण कामात स्वत:ला असं झोकून द्यायचं, की त्यातून अस्सल सोनंच बाहेर पडेल. ‘ग्रेट इंडियन सिंगल माल्ट’चं सारं श्रेय एकटय़ा मायकेल यांना जातं, यात शंका नाही. अलीकडेच त्यांच्या प्रतिभेतून जन्माला आलेला ब्रँड म्हणजे कन्या. राशींमधील ‘कन्या’ ही एक राशी, तिचंच नाव त्यांनी व्हिस्कीला दिले. त्यानंतर मंगलयानाचा गौरव म्हणून ‘मार्स ऑर्बिटर’ हा नवा ब्रँड त्यांनी बाजारात आणला. असं ऐकलंय की, रामपूर सिंगल माल्टसुद्धा बाजारात येण्याच्या बेतात आहे. यापेक्षा आनंदाची आणखी कोणती गोष्ट असेल!!

प्रतीक चतुर्वेदीची पुण्यातील ‘डूलॅली’ सुकेतू तालुकदार आणि ‘ब्र्य़ूमास्टर’ ऑलिव्हर शॉफ यांनी तर बीअरमधील नवनिर्मितीत भर घातली. याचा आता इतिहास बनला आहे. बंगळूरु, गुरगाव, पुणे, मुंबई आणि आता कोलकात्यात आणि हैदराबादेतही या बीअरची सुरुवात झाली आहे. ‘ब्र्य़ूड् बीअर’मध्ये बेल्जियन वीट, आयरिश रेड एल, हेफेवेइजन, आयपीए, स्टॉट, बेल्जियन ट्रिपल आणि डार्क एल अशा काही निवडक ब्रँड्सची नावे येथे घेता येतील. ‘गेटवे’ ब्र्य़ूविंग कंपनीचाही यात मोठा वाटा आहे. ज्यांची स्वत:ची ब्रेवरीज नाही, अशा पब्ज आणि टॅप रूम्सनाही ही बीअर विकण्यात येते.

जीनच्या इतिहासातही असंच काहीसं आहे. देशी वनस्पतींच्या आधारे जीनची निर्मिती करण्यात अनेकांच्या हातांमध्ये कलादेवता वास करीत होती. तरीही सध्या जीनमध्ये म्हणावं तितकं निर्मितीचं वेड पसरलेलं नाही. यासाठी एका दूरदृष्टीची गरज असते. ती या क्षेत्रातील अनेकांकडे नाही; पण वैभव सिंह आणि आनंद विरमणी यांनी स्वत:कडील ज्ञानाचा आणि उपलब्ध स्रोतांचा वापर करून जीनचा व्याप वाढविण्याचा वसा घेतला आहे. भारतीय वनस्पतींचा वापर करून ‘ग्रेटर थान’ आणि ‘हिमालयीन ड्राय जीन’ हे दोन ब्रँड बाजारात आणले आहेत. राहुल मेहरा हे बीअरमधील यशस्वी उद्योजक समजले जातात; परंतु त्यांनीही आपला मोहरा जीनकडे वळवला आहे. त्यांनी ‘स्ट्रेंजर अँड सन्स’ हा ब्रँड अनीश भसीन यांच्या साथीने ‘स्वामी’ या पेयाची भर घातली आहे. जीनच्या क्रांतीतील हे आणखी एक पाऊल आहे.

गोव्यातील फेणीनेही आपलं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. ‘मॅक अँड सेड्रिक वाझ’ यांचा लेम्ब्रान्सा हा त्यातील एक ब्रँड आहे. पिंपातील आणि गाळीव फेणी म्हणून या ब्रँडचा बोलबाला आहे. पाच वर्षे जुन फेणी ही सर्वात चविष्ट आणि घशाला मुलायम आणि आनंद देणारी असते. हन्सेल वाझ यांच्या काझुलो या फेणीनेही अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आहे.

डेसमंड नाझारेथ याच्याही कल्पकतेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे वाढविण्यात आलेल्या वनस्पतींच्या आधारे डेसमंड याने स्पिरिट कमावण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याचं हे एक प्रकारचं धाडसच म्हणावं लागेल. ‘कहासा’ प्रकारातील रम ही उसापासून तयार केली आहे. नागपूर संत्र्यापासूनची ‘संत्रा दारू’ याच वेळी मोहाच्या फुलांपासून अस्तित्वात आलेली मोहाची दारू. गौतम मेनन हे केरळात ‘वाइल्ड टायगर’ नावाची जागतिक स्तरावरील रम उत्पादित करीत आहेत. भारतातील वाघांची घटती संख्या रोखली जावी आणि या अमूल्य जीवाचे संवर्धन व्हावे, या संकल्पनेतून गौतम यांनी हा ब्रँड बाजारात आणला आहे. सध्या ही रम निर्यात केली जाते. अगदी जुन्या ‘ओल्ड मंक’ रमचा सर्वात धाकटा भाऊ शोभेल अशा ‘वाइल्ड टायगर’चे स्थान आहे. म्हणूनच ‘अल्कोबेव्ह’च्या क्षितिजावरील या चमकत्या ताऱ्यांनी भारतीय मद्यनिर्मितीचे अंगण प्रकाशित केले आहे यात शंका नाही.

अनुवाद : गोविंद डेगवेकर

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chef varun inamdar article about indian alcobev industry