नाताळ-नवीन वर्षांच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेक तरुण चमू गडकोटांवर, जंगलात, नदीकिनारी, समुद्राच्या किनारी बॅकपॅक टूर काढतात. या टूरमध्ये फिरण्यासोबतच निरनिराळी खवय्येगिरी असते. अनेक खादाड चमू बार्बेक्यूचं सामान सोबत घेऊन ३१ डिसेंबरच्या रात्री नदीकिनारी बार्बेक्यू पार्टी करतात. तर काही कबाब फेस्टिव्हल भरवतात. आपापल्या परीने मौज करत मिळेल त्या सामग्रीत पेटपूजा करतात. अशाच भ्रमंतीला निघालेल्या भटक्यांना वाटेत पुरेशा सामग्रीत जिव्हा तृप्त मिळण्यासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी सोप्या पद्धतीत बार्बेक्यूच्या तर काही कबाबच्या रेसिपी पेश केल्या आहेत.
पात्रानी पनीर
साहित्य : पनीरचे पातळ ब्रेडच्या आकाराचे तुकडे ४ नग, सातपाटी मसाला १ वाटी, लिंबू १, मीठ चवीनुसार, लवंग ५-७, खोबऱ्याचे तेल ४ चमचे (खोबऱ्याचे तेल आवडत नसल्यास पर्यायी तेल वापरावे.), केळीचे पान व अॅल्युमिलियम फॉइल गरजेप्रमाणे.
कृती : पनीरला मीठ व लिंबू चोळून ठेवणे. सातपाटी मसाला सँडविचप्रमाणे दोन तुकडयांमध्ये भरून लवंगा टोचून घ्याव्यात. असे तयार झालेले पनीरचे तुकडे केळीच्या पानात गुंडाळून वरून अॅल्युमिनियम फॉइल गुंडाळावी व मंदाग्नीत खरपूस शेकावेत. केळीचे पान व अॅल्युमिनियम फॉइल काढून अशी शेकलेली पनीरची सँडविचेस खायच्या वेळी तव्यावर थोडेसे तेल टाकून परतून घ्यावे व कापून खावे. केळीच्या पानामुळे पदार्थाला वेगळाच स्वाद येतो.
पनीर टिक्का
साहित्य : पनीर १ पाव, दह्य़ाचा चक्का २ वाटय़ा (दही कापडामध्ये बांधून त्याचे पाणी काढून घेणे याला चक्का म्हणतात), मिरची, कोथिंबीर, आलं व हिरवा लसूण (बारीक वाटलेला) १ वाटी, धने पावडर २ चमचे, जिरे पावडर २ चमचे, कसुरी मेथी २ चमचे, मीठ चवीला, सरसोचे तेल २ चमचे.
कृती : सर्व जिन्नस चक्क्यामध्ये मिसळून एकजीव करावेत. असा तयार झालेला मसाला पनीरचे तुकडे घालून त्याबरोबर छोटे छोटे कांदे, टोमॅटो, शिमला मिरचीसुद्धा घालावी. सळईत क्रमाने पनीर, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची असे लावून तंदूरवर किंवा ग्रीलरवर मंद आचेवर शेकावेत. वरून व्हिनेगर शिंपडावे. चाट मसाला घालावा.
व्हेज काठी कबाब
साहित्य : मिक्स भाज्या किसलेल्या १ वाटी, पनीर किसलेलं अर्धी वाटी, उकडलेला बटाटा १ नग, जायफळ पावडर पाव चमचा, जिरे १ चमचा, चाट मसाला १ चमचा, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, कसूरी मेथी १ चमचा, तिखट चवीनुसार, कोथिंबीर ४ चमचे, तेल ४ चमचे, सूप स्टीक्स ५-६ नग, आमचूर पावडर १ चमचा, ब्रेड क्रम्स अर्धी वाटी.
कृती : सगळ्या भाज्या एकत्र करून त्यात पनीर व बटाटा मिक्स करून ठेवा. फ्रायपॅनमधे तेल घालून जिरे फुटल्यावर आलं-लसूण पेस्ट, कसूरी मेथी, जायफळ, आमचूर पावडर, तिखट, मीठ, साखर इत्यादी घालून फोडणी तयार करावी व ही फोडणी भाज्यांच्या मिश्रणात घालावी. कॉर्नस्टार्चच्या मदतीने सूप स्टीक्सवर हे मिश्रण लावा. नंतर अशा तयार झालेल्या स्टीक्स ओला हात लावून ब्रेड क्रम्सवर घोळवून मंद आचेवर डीप फ्राय करा. यासोबत चटणी व कचुंबर खायला द्या.
रोटी शोटी कबाब
साहित्य : पनीर २०० ग्रॅम, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, हिरवी मिरची ४-५, कोिथबीर ४ चमचे, चाट मसाला १ चमचा, जिरे १ चमचा, कणीक १ वाटी, इनो १ चमचा, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, हिरवी चटणी ४ चमचे, दही अर्धी वाटी, बटर २ चमचे.
कृती : सर्वप्रथम पनीर कुस्करून ठेवा. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोिथबीर घालून त्यामध्ये पनीर, चवीनुसार मीठ, साखर घाला. हा मसाला कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने एका काडीला लावून लांबट गोळा तयार करा. कणकेमध्ये मीठ, इनो घालून चाळून घ्या. नंतर यात थोडे तेल व पाणी घालून घट्टसवर भिजवून घ्या. याची पोळी लाटून त्यावर मधोमध पनीरची काडी ठेवा. पोळी दुमडून त्याची दोन्ही टोके जुळवून असे तयार कबाब मंद आचेवर शेकून घ्या. सव्र्ह करतेवेळी आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करून बटर लावा. तयार दही व कचुंबरबरोबर सव्र्ह करा.
धुव्वेदार अननस
साहित्य : अननस १ नग, दही १ वाटी, हळद पाव चमचा, धने-जिरे पावडर १ चमचा, चाट मसाला १ चमचा, कोळसे, अल्युमिनियम फॉइल.
कृती : दह्य़ात सर्व मसाला घालून ठेवा. नंतर त्यात अननसाच्या फोडी घालून अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा. त्यानंतर अननसाच्या फोडी एका सळईला लावून घ्या. माठात कोळशाचे निखारे घालून त्यामध्ये अननसाच्या फोडी लावलेल्या सळया घालून वरून अॅल्युमिनियम फॉइल लावून वाफवून घ्या.
काकोरी कबाब
साहित्य : मटणाचा खिमा पाव किलो, तळलेल्या कांद्याची पेस्ट अर्धी वाटी, घट्ट दही अर्धी वाटी, पपईची पेस्ट अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, वाळलेली गुलाबाची पाने ८-१०, गुलाबजल १ चमचा, तिखट चवीनुसार, लवंग पूड अर्धा चमचा, वेलची पूड अर्धा चमचा, केशर चिमूटभर, धणे-जिरे पावडर १-१ चमचा, काजू पेस्ट अर्धी वाटी.
कृती : दही, पपई, खिमा व कांद्याची पेस्ट एकत्र करून ७-८ तास ठेवा. त्यानंतर त्यात तळलेल्या कांद्याची पेस्ट बेसन व इतर मसाले टाकून छान मळून घ्या. सळईला लावून मंद आचेवर शेका.
पत्थर का गोश्त
साहित्य : मटण ३०० ग्रॅम, दही १०० ग्रॅम, धणे पावडर १ चमचा, जिरे पावडर १ चमचा, बडीशेप पावडर १ चमचा, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, गरम मसाला १ चमचा, कोथिंबीर पाव वाटी, साजूक तूप ५० ग्रॅम.
कृती : हा एक हैद्राबादी प्रकार आहे. यामध्ये चपटय़ा दगडाला किंवा फरशीला गरम करून त्यावर मटण शिजवतात. सर्वप्रथम ३०० ग्रॅम मटण घेऊन त्याला ठोकून मऊ करा. त्यामध्ये १०० ग्रॅम दही, धणे-जिरे पावडर १-१ चमचा, बडीशेप पावडर १ चमचा, चवीनुसार हळद, तिखट, मीठ, १ चमचा गरम मसाला, बारीक चिरलेला कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र करून २-३ तास मॅरिनेट करून ठेवा. यामध्ये ५० ग्रॅम साजूक तूपही घाला. नंतर ज्या फरशीवर हे शिजवायचे आहे ती स्वच्छ करून धुऊन घ्या. त्यावर थोडे तूप लावून मटणाचे तुकडे पसरवा. मंद आचेवर सराटय़ाच्या साहाय्याने शेकून गरम गरम खायला द्या.
स्मोक एग
साहित्य : उकडलेली अंडी ४ नग, (सिमला मिरची, कांदे, टोमॅटो, बारीक तुकडय़ांमध्ये १०० ग्रॅम), मदा ५० ग्रॅम, कॉर्नस्टार्च २५ ग्रॅम, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस १ चमचा, बेकिंग पावडर १० ग्रॅम, तेल ५० ग्रॅम.
कृती : सर्वप्रथम अंडय़ाचे चार तुकडे करावे. मद्यात कॉर्नस्टार्च, बेकिंग पावडर, मीठ घालून त्याचे घट्ट मिश्रण तयार करावे. या मिश्रणात अंडय़ाचे तुकडे बुडवून मंद आचेवर तळून घ्यावे. सव्र्ह करतेवेळी फ्रायपॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे घालावे. जिरे फुटेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी असू ज्यावी. नंतर सिमला मिरची, टोमॅटो, कांदे घालून थोडा वेळ परतावे. फ्लेम मोठी असल्यामुळे टोमॅटोच्या पाण्यामुळे थोडी आच पकडल्यासारखी होईल. त्यानंतर तळलेले अंडय़ाचे तुकडे घालून थोडी कोिथबीर टाकावी व मोठी फ्लेम करून थोडा वेळ परतावे. नंतर याला पोळी किंवा गार्लिक सॉसबरोबर खायला द्यावे.
संयोजन साहाय्य : मितेश जोशी viva@expressindia.com