चोकर म्हटलं की, पारंपरिक पद्धतीचा सोन्याचा गळाबंद दागिनाच बहुतेकांना ज्ञात असतो. पण सध्या मात्र वेस्टर्न टाइपचे चोकर फॅशनमध्ये दिसतायत. गळ्याला घट्ट बिलगून असणारा हा नेकलेस विविध घटकांपासून बनवला जातो. उदा. मेटल, गोल्ड, प्लास्टिक, सिल्व्हर, लेदर इ. आताच्या काळात हा चोकर नेकलेस जरी इन असला तरी त्याचे महत्त्व मात्र इतिहासकाळापासून आहे.
सध्या हाय फॅशन असणाऱ्या या नेकलेसचा अर्थ वेगवेगळ्या काळासाठी वेगवेगळा होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बॅलेरिना आणि हाय क्लास सोसायटीमधील स्त्रिया उच्च प्रतीच्या चोकरचा वापर करत असत. मात्र हाच चोकर एकोणिसाव्या शतकातच प्लेन, थिन, लाल किंवा काळ्या रंगाचा रिबिनीच्या रूपात स्त्रियांच्या गळ्यात दिसला, थोडय़ा वेगळ्या संदर्भासहित. त्यावेळी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना ओळखण्यासाठीची खूण म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. ओलम्पिआच्या चित्रात आपल्याला याचा संदर्भ पाहायला मिळतो. १९३०च्या दशकात काळ्या रंगाचे विणलेले चोकर किंवा रिबीन हे समलिंगी संबंध जपणाऱ्या स्त्रियांच्या गळ्यात दिसून येई. एकोणिसाव्या शतकातच हा दागिना इंग्लंडमध्ये दाखल झाला तो जाड चोकरच्या रूपात. त्याच्यामागची गोष्टही मोठी गमतीदार आहे. एकदा राणी अॅलेक्झांड्राच्या गळ्याला काही तरी खरचटले होते. त्याची खूण तिच्या गळ्यावर उमटली होती. ती खूण लपवण्यासाठी तिने अशा प्रकारचे जाड चोकर गळ्याभोवती लपेटले. मग काय राणीने घातल्यावर तिथे या चोकरच्या फॅशनची एकच लाट आली. सत्तर आणि नव्व्दच्या दशकात पुन्हा एकदा स्त्रियांच्या गळ्यात चोकर पुन्हा दिसू लागले. एकोणिसाव्या शतकात वेगवेगळ्या रूपात, कमी-अधिक प्रमाणात फॅशनमध्ये असलेला चोकर आता मालिका-चित्रपटांमधून घराघरात परिचयाचा झाला आहे.
गळ्यातला पट्टा या अर्थाने पूर्वी कधी तरी त्याचा वापर वारांगनांची ओळख म्हणून करण्यात आला असला तरी आता या पट्टय़ाला दागिना म्हणून फॅशनचा परीसस्पर्श झाला आहे. अगदी लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत प्रत्येकाला हव्या त्या स्वरूपात आणि हव्या त्या किमतीत चोकर उपलब्ध आहेत. पंधरा रुपयांपासून ते पाचशे,पाच हजार रुपयांपर्यंत आपल्याला परवडेल अशा किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाइन्सचे चोकर सहज मार्केटमध्ये आढळतात. काही चोकर अगदी साधे सुंदर असतात. तर काहींना पेण्डन्ट लावलेले असते. सिक्वेन्स, स्टड्स, मोत्यांचे चोकरदेखील पाहायला मिळतात.
सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या प्रसिद्ध शो ‘रोडीज’मधील अँकर गॅली हिच्या गळ्यातील थीन लाइन वेस्टर्न चोकर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याने त्याची मागणी बाजारात वाढली आहे. तसे पाहायला गेले तर तीन-चार वेळा गुंडाळून हव्या त्या पद्धतीने गाठ बांधून सोडून दिला तरी हा चोकर खुलून दिसतो, पण तरीदेखील त्या गाठ बांधण्याच्या पद्धतीत फरक असतो. त्या पट्टय़ाची वेगळी क्वॉलिटी, प्रकार असतात. त्यावरून तो परिधान करणाऱ्याच्या गेटअपमध्ये एक वेगळा लुक जाणवतो. ‘रोडीज’चीच माजी अँकर बानी हिनेदेखील चोकर हा फ्लोज गिट्टिंग नेकलेस अनेकदा वापरलेला आहे आणि तिचेही अनेक चाहते असल्याने साहजिकच तिची स्टाईल अनेकांनी फॉलो केली. हल्ली अनेक सेलेब्रिटीज इव्हेंट्समध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये, फॅशनशोजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चोकर घालताना सर्रास पाहायला मिळतात.
गळाबंद असा एकच पट्टा हे त्याचे मूळ स्वरूप. मात्र हल्ली नुसत्या एका पट्टय़ाऐवजी काही जण दोन ते तीन लेयर घालणे पसंत करतात. त्यांच्यासाठी खास मल्टिलेयर चोकरही बनवण्यात आले आहेत. म्हणजे चार-पाच दागिने न घालता एकच चोकर घातला की काम फत्ते. सगळ्यात स्वस्त आणि कुठेही सहज उपलब्ध असलेले चोकर म्हणजे प्लॅस्टिक वायर चोकर. वायर्स एकमेकींत गुंतवून जाळीदार अशा प्रकारची नक्षी असलेले चोकर सध्या खूपच कॉमन झाले आहेत. प्लॅस्टिक चोकर नंतर थोडय़ा बऱ्या किमतीत पण सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत येते ते म्हणजे वेलवेट चोकर. या वेलवेट चोकरमध्ये मध्यभागी मोठे पेण्डन्ट असते किंवा मोती, स्टड्स यांचा वापर करून त्या चोकरची शान वाढवली जाते. त्यात मग हत्ती, चंद्र, कासव, सूर्य, घुबड अशी वेगवेगळ्या प्राण्यांची किंवा अन्य आकारांची पेण्डन्ट उपलब्ध असतात. वेलवेटला कटवर्क करून लेस चोकरसुद्धा बनवता येतात. त्यानंतर नंबर लागतो तो लेदर चोकरचा. लेदर म्हणजे सर्वात महाग असा सर्वाचा समज असतो. त्याचप्रमाणे लेदर चोकर हे थोडय़ा हेवी रेंजमध्ये असते, परंतु हे चोकर घातल्यावर जो लुक येतो त्याची बातच न्यारी.
पॅन्टला लावलेल्या बेल्टप्रमाणे दिसणारे हे लेदर चोकर गळ्याभोवती घालतात. काही चोकरमध्ये गोल रिंग, हार्ट रिंग अशा विविध डिझाइन्सच्या रिंग्स अशाच केलेल्या असतात आणि हे लेदर चोकर कोणालाही होतील अशा अॅडजस्टेबल साइजमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे त्याला सहज पसंती मिळते. चोकर हे गळ्याभोवती घट्ट बसते त्याचप्रमाणे कॉलरदेखील गळ्याभोवती घट्ट बसते. अशाच कॉलरचा भास होण्यासारखा कॉलर पॉलिमर चोकरदेखील बाजारात उपलब्ध आहे म्हणजे कॉलर नसलेल्या टॉपवर असा चोकर घातला की आपोआप कॉलर असल्याचा भास होईल. याव्यतिरिक्त भरलेले चोकर हवे असल्यास कोन्चो चोकर घ्यावे. प्लेन पट्टय़ावर मोठेमोठे स्टड्स कमी अंतर सोडून जवळजवळ लावण्यात आलेले असतात. या चोकरचा लुक भरीव असल्याने प्लेन ड्रेसवर हे चोकर उठून दिसतात.
चोकरचे काळानुरूप बदलत गेलेले महत्त्व एवढे आहे की, आता ही स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली नाही. पुरुषही चोकर नेकलेसचा वापर करताना दिसून येतात. पुरुषांसाठी वेगवेगळ्या डिजाइन्सचे चोकर बनवण्यात येतात. ‘लंडन कलेक्शन मेन्स २०१७’मध्ये पुरुषांच्या चोकर या दागिन्यावर भर दिलेला आढळून आला. त्यानंतर पुरुष सेलेब्रिटीजदेखील सिम्पल, सोबर आणि युनिक चोकरकडे वळताना दिसतायेत. या चोकरचे फॅड इतके वाढले आहे की टॉपला जॉइंट असे काही चोकर डिझाइनर्सने आपल्या कलेक्शनमध्ये बनवले आहे. त्यामुळे कपडे घेताना त्याबरोबर चोकर आपोआपच येते, ते वेगळे घेण्याची गरज भासत नाही किंवा काही ड्रेसच्या कापडाचेच चोकर बनवण्यात आलेले दिसतात. स्ट्रेचेबल, हूक्सवाले, काही जड, काही हलके, काही महाग, काही स्वस्त अशा वेगवेगळ्या प्रकारांत सध्या फॅशनमध्ये दिसणारे हे चोकर येत्या काळात आणखी नव्या स्वरूपात समोर आले तर नवल वाटायला नको!
viva@expressindia.com